गजानन महाराज जन्मस्थान स्मारक मंदिर

श्रीक्षेत्र थळ, ता. मोताळा जि. बुलडाणा

ईश्वराच्या आराधनेतून मानवाला सन्मार्गावर आणण्याचे महान कार्य करणाऱ्या थोर संतांमध्ये शेगावच्या गजानन महाराजांचे स्थान महाराष्ट्रातील आध्यात्मिक जगतात अढळ आहे. ‘गण गण गणात बोते’ हा महामंत्र देणाऱ्या गजानन महाराजांचा जन्म नेमका केव्हा आणि कुठे झाला याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी अनेकांच्या मते बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील थळ हे त्यांचे जन्मस्थळ आहे. या श्रीक्षेत्र थळ येथे गजानन महाराजांचे स्मारक मंदिर उभारण्यात आले आहे. गजानन महाराजांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराच्या उजवीकडे गजानन महाराज तसेच गोमाजी महाराजांची छोटी मंदिरे आहेत. गजानन महाराजांच्या प्रकट दिनी आणि पुण्यतिथीदिनी (ऋषीपंचमी) ही दोन्ही मंदिरे कळसापासून पायऱ्यांपर्यंत तासनतास डोलताना दिसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल अधिकृत ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला तरी, श्री गजानन महाराज जन्मस्थान प्रतिष्ठान आणि स्थानिक परंपरेनुसार थळ हेच त्यांचे जन्मस्थान मानले जाते. शेगाव संस्थान मात्र महाराजांच्या पूर्वश्रमीबद्दल अज्ञात अशीच भूमिका घेते. या मंदिराचे संस्थापक असलेल्या दादा पांडे यांनी गजानन महाराजांच्या थळ येथील जन्मस्थळाबाबत जनजागृती केल्याचे मानले जाते. त्यांनी या कार्यासाठी विदर्भातून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकात दोन वर्षे लेखमालाही चालवली होती. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार, थळ गावातील भवानीराम साबळे यांच्या कुटुंबात गजानन महाराजांचा जन्म झाला. त्यांचे नाव गणोजी असे ठेवण्यात आले होते. गजानन महाराजांना जन्मतःच अष्टसिद्धी प्राप्त होत्या. गजानन महाराज बालपणापासूनच दिगंबरावस्थेत असत. कुणी कपडे घालण्यास दिल्यास ते कपड्यांच्या चिंध्या करून त्या गावातील बाभळीच्या झाडावर लटकवत असत. गजानन महाराजांच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांना नुराई नावाची बहीण झाली. एके वर्षी माता-पित्यांचा निरोप घेऊन गजानन महाराज गावातील उंचावरील मारुती मंदिरात गेले. या मंदिरात काही नागवे साधू आले होते. त्यांच्यासोबत गजानन महाराजांनी गाव सोडले असे मानले जाते.

२३ फेब्रुवारी १८७८ रोजी माघ वद्य सप्तमीच्या दिवशी गजानन महाराज शेगाव येथे प्रकट झाले. तेव्हा महाराजांचे वय १८ ते २५ होते. दिगंबरावस्थेत असलेले गजानन महाराज गावातील देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते वेचून खात असताना, तसेच नंतर गाई-गुरांसाठी ठेवलेल्या हौदातील पाणी पिऊन निघून गेल्याचे गावातील बंकटलाल आणि दामोदर या व्यक्तींनी पाहिले. बंकटलाल यांनी गजानन महाराजांना आपल्या घरी नेले. त्यानंतर गजानन महाराजांनी शेगावसह राज्यभरात अनेक ठिकाणी लीला केल्या. ८ सप्टेंबर १९१० रोजी ते शेगाव येथे समाधिस्थ झाले. मोताळा तालुक्यातील रोहिणीखेडजवळ अजिंठाच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले थळ हे छोटे गाव आहे. या गावात गजानन महाराजांच्या साबळे कुटुंबाचे वंशज आजही वास्तव्यास आहेत. या गावापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. दादा पांडे यांच्या प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या या मंदिरासाठी गजानन महाराजांच्या साबळे कुटुंबाचे वंशज रामजी लक्ष्मण साबळे यांनी सात एकर जागा दिली. पांडे यांनी आणखी एक एकर जागा विकत घेऊन हे मंदिर उभारले. ३० ऑगस्ट २०१० रोजी येथे गजानन महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मंदिराच्या कमानीतून आत आल्यावर प्रशस्त परिसर लागतो. येथून काही पावलांवर मंदिर आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या परिसरात येण्यासाठी काही पायऱ्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात, मध्यभागी गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात मोठ्या संगमरवरी चौथऱ्यावर गजानन महाराजांची संगमरवरी दगडात घडवलेली सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीवर फेटा आहे. मूर्तीसमोर त्यांची छोटी मूर्ती तसेच पादुका ठेवण्यात आल्या आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूस, काही अंतरावर गजानन महाराज आणि श्री गोमाजी महाराजांची छोटी मंदिरे आहेत. पूर्वी रामजी लक्ष्मण साबळे यांनी या परिसरात गजानन महाराज आणि श्री गोमाजी महाराजांची छोटी मंदिरे बांधली होती. गजानन महाराजांच्या मंदिरात त्यांची काठी तर गोमाजी महाराजांच्या मंदिरात त्यांच्या पादुका होत्या. मात्र, नव्या मंदिराच्या बांधकामात ही मंदिरे मध्ये येत होती, त्यामुळे श्री गजानन महाराज जन्मस्थान प्रतिष्ठानने गजानन महाराजांच्या मंदिराच्या उजवीकडे, योग्य अंतरावर नवी मंदिरे उभारून गजानन महाराजांची मूर्ती, त्यांची काठी तसेच गोमाजी महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून या नव्या मंदिरांत प्रतिष्ठापित केल्या. पत्र्याचे छत असलेल्या या मंदिरांजवळ छोटे शिवलिंगही आहे.

दर गुरुवारी, गजानन महाराजांच्या प्रकट दिनी तसेच पुण्यतिथीदिनी (ऋषीपंचमी) श्रीनामाचा आणि दिंड्यांचा गजर झाल्यावर ही दोन्ही मंदिरे कळसापासून पायऱ्यांपर्यंत तासनतास डोलतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा करण्यात येते. येथे माघ वद्य सप्तमीला गजानन महाराजांचा प्रकट दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त विदर्भातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि परिसरातील गावांतून दिंड्यांचेही आगमन होते. प्रकट दिनानिमित्त येथे सात दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. याशिवाय गजानन महाराजांची पुण्यतिथी रामनवमी, जन्माष्टमी आणि दत्तजयंतीनिमित्तही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • मोताळा येथून १८ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून २९ किमी अंतरावर
  • मोताळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

गजानन महाराज जन्मस्थान स्मृति मंदिर

श्री क्षेत्र थल, ताल. मोटाला जिला. बुलढाणा

Back To Home