पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे फिरंगाई मातेचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. आदिमाता, आदिशक्तीच्या साडेतीन पीठांनंतर येणाऱ्या ५१ पीठांत या क्षेत्राचा समावेश होतो. इच्छापूर्ती व भाविकांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण करणारी देवी, अशी या देवीची ओळख आहे. तिला ‘आईसाहेब’ नावानेही संबोधले जाते.
या देवीची आख्यायिका अशी की तुळजापूरच्या तुळजाभवानीचे प्रतिरूप असलेली ही देवी येथील उदोजी आणि दुर्गोजी यांच्या भक्तीवर प्रसन्न झाली व काही मागणे असेल तर मागा, असे तिने त्यांना सांगितले. हे दोघेही देवीच्या भक्तीत आकंठ बुडालेले असल्याने त्यांनी धन, संपत्ती या कशाचीच मागणी न करता देवीला आपल्यासोबत आपल्या गावी येण्याची विनंती केली की ज्यामुळे देवीची अखंड सेवा करता येईल. देवीनेही आपल्या भक्तांची मागणी मान्य करून त्यांच्यासोबत येण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यांना मागे वळून न पाहता पुढे चालत राहण्यास सांगितले. कुरकुंभच्या माळावरून खाली येत असताना त्यांनी उत्सुकतेपोटी मागे वळून पाहिले आणि देवी तेथेच अंतर्धान पावली. ज्या ठिकाणी देवी अंतर्धान पावली त्या ठिकाणी म्हणजेच गावापासून जवळच असलेल्या टेकडीवर या देवीचे प्राचीन मंदिर आहे. याशिवाय कुरकुंभ या गावातही देवीचे मंदिर बांधण्यात आले. हे नवीन मंदिरही ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने असल्याचे सांगितले जाते. अग्रभागाकडे वक्र असणाऱ्या तलवारीला ‘फिरंग’ असे म्हणतात. ही तलवार धारण करणारी देवी म्हणून देवीला ‘फिरंगाई देवी’ असे नाव पडले, असे सांगितले जाते.
फलटणचे संभाजी राजे नाईक निंबाळकर यांनी १७६० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. टेकडीवरील मंदिरात जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. मंदिराभोवती दगडी तटबंदी असून प्रवेशद्वाराच्या बाजुला नगारखाना आहे. मुख्य प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूस मारुती, तर उजव्या बाजूस गणेशाची स्थापना केलेली आहे. मंदिराच्या मंडपाबाहेर दीपमाळ असून त्यावर शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरात प्रवेश करताना सभामंडपात मध्यभागी देवनागरी लिपीत लिहिलेला एक शिलालेख पाहायला मिळतो. गर्भगृहासमोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. गर्भगृहात फिरंगाई देवीची सुबक मूर्तीं विराजमान आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालताना मंदिराच्या बाजूला काळभैरवनाथ व जोगेश्वरीचे मंदिर दिसते. मुख्य मंदिराच्या मागील बाजूसही प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराशेजारीच विठ्ठल-रुमिणी मंदिर आहे.
२०१९ मध्ये फिरंगाई देवीच्या भंग पावलेल्या तांदळा स्वरूपातील मूर्तीच्या जीर्णोद्धारास परवानगी मिळाली होती. त्यानुसार तांदळा स्वरूपातील देवीची शिळा काढल्यानंतर एक फूट खोलीवर एक मोठी व दोन लहान अशा तीन शिळा आढळून आल्या. यात मोठी शिळा मध्यभागी असणारी महालक्ष्मीची, दक्षिणेची लहान शिळा महाकालीची, तर उत्तरेकडील लहान शिळा ही महासरस्वतीची आहे. या त्रिगुणात्मिका फिरंगाई देवीच्या शिळांवर तीन नाग कोरलेले दिसतात.
मंदिरात दररोज तीन वेळा देवीची आरती होते. दर महिन्याच्या पौर्णिमेला पालखी निघते. आषाढी एकादशीला भीमा नदीपर्यंत दिंडी काढली जाते. वैशाख पौर्णिमेला कुरकुंभ गावची यात्रा भरते. येथील नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतो. हा उत्सव दसऱ्यानंतरही पुढे येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत सुरू असतो. या वेळी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. देवीला नवस केल्यावर खरूज, नायटा पूर्णपणे बरा होतो, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.