
मातृदेवता एल्लम्मा देवी ही सृजनाचे प्रतिक आहे. लज्जागौरी, एकवीरा, जोगळाई, भूदेवी, मातंगी, यमाई, सातेरीदेवी ही एल्लम्मा देवीचीच रूपे मानली जातात. अनेक ठिकाणी देवीची वारुळाच्या रुपात पूजा केली जाते. या देवीचे पुजारी गळ्यात कवड्यांच्या माळा घालतात. या सर्व गोष्टी एल्लम्मा ही सृजनशक्ती मातृदेवता असल्याचे सिद्ध करतात. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात एल्लम्मा देवीची अनेक मंदिरे आहेत. धुळे शहरातील एल्लम्मा मंदिर हे त्यांपैकीच एक प्रसिद्ध मंदिर होय. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
एल्लम्मा व रेणुका ही एकाच देवीची दोन नावे आहेत. कर्नाटकातील सौंदत्ती हे देवीचे मूळपीठ असल्याचे मानण्यात येते. तेथील मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मात्र प्रसिद्ध इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मते, एल्लम्मा देवीचे मूळपीठ आंध्र प्रदेशातील आलमपूर हे आहे. त्याच प्रमाणे अलंपूर, एलापूर, एलमापूर हे त्या ग्रामनावाचे विविध पर्याय हे
एल्लम्मापूर या नावाची उच्चारसुलभ परिवर्तने आहेत असे त्यांचे मत आहे. एल्लम्मा देवीची आख्यायिका अशी की जमदग्नी ऋषींच्या आज्ञेने परशुरामाने आपल्या आईचे व तिला मिठी मारलेल्या मातंगीचे शीर धडावेगळे केले. नंतर शीर जोडताना रेणुकेच्या धडाला मातंगीचे व मातंगीच्या धडाला रेणुकेचे शीर जोडण्यात आले. तेव्हापासून एक एल्लम्मा व दुसरी मरीआई म्हणून ओळखली जाऊ लागली.
एल्लम्मा देवीचे मंदिर धुळे–मालेगाव मुख्य रस्त्यालगत आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपास समोरील बाजूने एक व उजव्या बाजूला दोन, डाव्या बाजूला एक व मागील बाजूला एक अशी एकूण पाच प्रवेशद्वारे आहेत. उजव्या व डाव्या बाजूच्या प्रवेशद्वारांला स्तंभशाखा व त्या शाखांवर तोरण आहेत. द्वारशाखा व तोरणांत असलेल्या पानाफुलांच्या नक्षी सोनेरी रंगात रंगवलेल्या आहेत. बंदिस्त स्वरुपाच्या सभामंडपात (गूढमंडप) पुरेसा प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात दोन्ही बाजूला भिंतीत प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभ आहेत. येथील छताला नवसाच्या अनेक पितळी घंटा टांगलेल्या आहेत. वितानावर पुष्प नक्षी आहे. सभामंडपात मध्यभागी सजीव वृक्ष असून वृक्षाचे खोड व फांद्या छतातून वर गेलेल्या आहेत. वृक्षाच्या बुंध्यालगत जोगते समूहाच्या गुरूंची (परशुराम मामा) समाधी आहे. जोगतिणी व जोगते या देवीचे पुजारी असतात.
या पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास काचा लावलेल्या पारदर्शक लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात नक्षीदार वज्रपिठावर मध्यभागी रेणुका देवीची चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या हातात त्रिशूल, डमरू, पाश व पद्मफुल आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीत मध्यभागी पाचफणी नाग, त्याच्या भोवतीने व्याल तोरण, वर कीर्तीमुख व बाजूने पर्ण–पुष्प नक्षी आहे. प्रभावळीच्या वर मध्यभागी छत्र व दोन्ही बाजूला ध्वजपताका आहेत. वज्रपिठावर उजव्या बाजूला एल्लम्मा देवीची मूर्ती उंची वस्त्रे व अलंकार यांनी सजवलेली आहे. वज्रपीठावर डाव्या बाजूला देवीचा ‘जग’ (परडीतील मूर्ती) आहे.
सभामंडपाच्या छतावर चहुबाजूंनी बाशिंगी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील चौकोनी व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या चारही बाजूंना सिंह शिल्पे व देवकोष्टकात देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. प्रांगणात सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वारालगत मातंगी मातेचे लहानसे काचबंद मंदिर आहे. बाजूला नागशिल्पे असलेले मंदिर आहे. त्याशेजारी जमदग्नी ऋषींची मूर्ती असलेले लहानसे मंदिर आहे. प्रांगणात होम कुंड व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत.
कीच किंवा रांडव पौर्णिमा (मार्गशिर्ष पौर्णिमा) हा एल्लम्मा देवीचा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी जोगते समूह हजारोंच्या संख्येने या मंदिरात उपस्थित राहतात. आपापल्या समूहाचे ‘जग’ घेऊन ते समूहाने मंदिरात येतात. रेणुका देवीचे रूप असलेले जोगते व जोगतीनी यावेळी प्रतिकात्मक रितीने जमदग्नी ऋषींचा मृत्यू व माता रेणुकेचे वैधव्य आपला चुडा फोडून व्यक्त करतात. तीन दिवसांचा दुखवटा पाळून पुन्हा नव्याने देवाशी लग्न लावले जाते. यावेळी नवे जोगते व जोगतिणी विधीपूर्वक समूहात सहभागी करून घेतल्या जातात.
चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री व आषाढ मास, दीप अमावस्या आदी उत्सव मंदिरात साजरे केले जातात. प्रत्येक उत्सवाच्या वेळी देवीची पालखी मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. सर्व सण व उत्सवांचे वेळी जागरण, गोंधळ, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवांच्या वेळी परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवीची खणा नारळने ओटी भरून साडी चोळीचा आहेर दिला जातो. नवसाचे मणी मंगळसूत्र, बांगड्या व पाळणे देवीस अर्पण केले जातात. मंगळावर. शुक्रवार, पौर्णिमा व अमावस्या आदी दिवशी भाविकांची मंदिरात जास्त गर्दी असते.