नांदगाव शहराचे ग्रामदैवत म्हणून येथील एकविरा देवी मंदिर प्रसिद्ध आहे. शाकंभरी आणि लेंडी नदीच्या संगमावर स्थित असलेल्या या मंदिरातील एकविरा देवीची मूर्ती तब्बल ११ फूट उंचीची आहे. मुख्य मंदिरासमोर ३१ फूट उंचीची भव्य दीपमाळ हेही येथील वैशिष्ट्य आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे हे प्राचीन मंदिर आहे. जागृत व भाविकांच्या नवसाला पावणारी, अशी या देवीची ख्याती आहे.>
मंदिराची आख्यायिका अशी की १७व्या शतकात ब्रम्हानंद महाराज यांना देवीने स्वप्नदृष्टांत देऊन जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करावयास सांगितले. त्यानुसार महाराजांनी पेशव्यांना सांगितल्यावर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. संपूर्ण आखीव दगडांमध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असून आजही हे मंदिर भक्कम आहे. नांदगाव रेल्वेस्थानक व बसस्थानकापासून पायी अंतरावर असलेल्या एकविरा देवी मंदिराच्या चारही बाजूने तटभिंती आहेत. पूर्वेकडील तटभिंतीला असलेल्या प्रवेशद्वाराजवळ कमान असून तेथून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. संपूर्ण मंदिर प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसविल्यामुळे हा परिसर स्वच्छ व टापटीप दिसतो. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरासमोरच एक उंच दीपमाळ असून त्याखाली एक गणेशाचे मंदिर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला ही दीपमाळ व मंदिर परिसर दिव्यांनी उजळविला जातो. दर्शनाला जाण्यापूर्वी या गणेशाचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरात प्रवेश होतो. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराला दोन घुमट आहेत. मंदिराच्या सभामंडपात विविध देवदेवता व साधुसंतांची चित्रे रेखाटली आहेत.
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात एकविरा देवीची मूर्ती आहे. या मूर्तीला १८ भुजा असून त्यांत विविध आयुधे आहेत. ही देवी वाघावर स्वार आहे. देवीच्या पायाखाली शुंभ व निशुंभ राक्षस आहेत. सप्तशृंगीनिवासिनी देवीप्रमाणेच या देवीचे रूप दिसते. गाभाऱ्यात आधी सहा फुटांची मूळ जुनी मूर्ती होती, परंतु त्या जागेवर ही नवी मूर्ती बसविण्यात आली आहे. एकविरा देवीच्या बाजूला रेणुका माता व गणेशमूर्ती आहे. एकविरा देवीची चैत्र महिन्यात तीन दिवस यात्रा भरते. यावेळी पालखीत देवीचा तांदळा व मुकुट ठेवून गावातून मिरवणूक काढली जाते. यावेळी कुस्तीचे फडही रंगतात. तसेच नगर पालिकेसमोरील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. (यामध्ये बारा बैलगाड्या बैलांशिवाय एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यात अनेक लहान मुले बसतात व भाविक या गाड्या ओढत मंदिरापर्यंत नेतात) यावेळी मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येते.
शारदीय नवरात्रोत्सवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ९ दिवस येथे उत्सव साजरा केला जातो. यावेळी मंदिरात घट बसविले जातात. या काळात अनेक स्त्री-पुरुष मंदिरात घटी (देवीच्या सानिध्यात राहून पूजाविधी करणे, देवीचे गुणगाण, स्तोत्र, मंत्रोच्चार, सप्तशतीचे पठण आणि महत्त्वाचे म्हणजे नऊ दिवस देवीच्या नावाचा जप करणे) बसतात. या नऊ दिवसांत देवीला नऊ पैठण्या नेसविल्या जातात. रोज नवनवीन शृंगार केला जातो. एकविरा देवीचे रूप रोज बदलते व रोज तीनही रूपांमध्ये देवीचे दर्शन होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. उत्सवकाळात देवीला विविध सोन्या-चांदीची आभूषणे व मुकुट परिधान करविला जातो.
ग्रामदेवता असलेल्या या देवीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण झाल्याचे अनेक भाविकांचे म्हणणे आहे. देवीची पूजा-अर्चा करण्याचा मान येथील गुरव घराण्याकडे आहे. देवीची रोज पूजा-अर्चा करून आरती केली जाते. मंगळवार व शुक्रवारी विशेष पूजेचे आयोजन केले जाते. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना एकविरा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.