
सामाजिक व सांस्कृतिक अभ्यासकांच्या मते आई एकवीरा ही बहुजनांचे कुलदैवत असल्याने ती हिंदू धर्मातील आदिदेवतांपैकी एक आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अर्थात सीकेपी, दैवज्ञ ब्राह्मण या समाजातील लोकही तिला कुलदेवता मानतात. खानदेशाची कुलस्वामिनी अशी मान्यता असलेल्या एकवीरा देवीचे धुळे शहरातील प्रसिद्ध मंदिर हे हजार वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. खानदेशातील २५१ कुलांची कुलदेवी असलेली ही देवी जागृत व नवसाला पावणारी आणि हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हिंदू धर्मानुसार पृथ्वीवरील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे माहुरची रेणुका माता. आई एकवीरा ही या रेणुकामातेचेच रूप आहे. रेणुका आणि एकवीरा या दोन्ही देवता मूळ पार्वतीचे अवतार मानल्या जातात. ‘सह्याद्रीखंडा’तील रेणुकामाहात्म्यात या देवीबद्दल आख्यायिका अशी की देव व असूर संघर्षात असुरांनी देवांचा पराभव केला. तेव्हा त्रस्त झालेले देव विष्णूला शरण गेले व दैत्यविनाशासाठी अवतार धारण करण्याची विनंती करू लागले. तेव्हा विष्णूने सांगितले की मी जेव्हा अदितीच्या गर्भात जन्म घेईन तेव्हा मी द्विजरूपाने दानवांचा विनाश करीन. एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून ती मी पवित्र यज्ञात दक्षिणा म्हणून ब्राह्मणांना दान करीन. सर्वकामप्रदायिनी अशी अदिती ही माझी माता भूतलावर एकवीरा या विख्यात नावाने जन्म घेईल.
यानुसार पुढे अदितीने रेणुकेच्या रूपाने अवतार घेतला व ती एकवीरा या नावाने प्रसिद्ध झाली. रेणुकेस पाच पुत्र झाले. त्यांपैकी परशुराम हा विष्णूचा अवतार होय व त्याने २१ वेळी पृथ्वी निःक्षत्रिय केली. एकवीरा देवीच्या नामोत्पत्तीबद्दल अशीही लोककथा सांगितली जाते की रेणुका देवी ही
परशुराम या एकुलत्या एक वीर पुत्राची आई असल्याने तिला एकवीरा असे नाव पडले. परंतु एकवीरा हे नाव विष्णूने आधीच देऊन ठेवलेले असल्याचे सह्याद्रीखंडात म्हटलेले आहे.
खानदेशाचा भाग असलेले धुळे हे पूर्वीचे पैठण ते भडोच या व्यापारी मार्गावरील एक छोटे गाव होते. इ.स. ९०–९५ या काळात लिहिण्यात आलेल्या ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ या ग्रंथात या मार्गाचा उल्लेख आहे. या गावावर पहिल्या शतकात सातवाहनांची सत्ता होती. त्यानंतर चौथ्या शतकात खानदेशातील स्वामीदास, भुलुंददास, रुद्रदास या सत्ताधीशांच्या ताब्यात हे गाव होते. यानंतर येथे चालुक्य, राष्ट्रकूट तसेच यादवांची सत्ता होती. इ.स. १३१८मध्ये दिल्लीचा सुलतानन फिरोजशाह तुघलक याने ठालेनेर आणि करवंडीचा सुभा मलिक राजा फारूखी याला दिला. धुळे हे या सुभ्यात होते. फारूखी, तसेच त्याच्या नंतर आलेल्या मोघल व मराठा सत्तेच्या काळात धुळ्याला महत्त्व प्राप्त झाले. १८१९मध्ये इंग्रज मुत्सद्दी व सेनापती कॅप्टन ब्रिग्ज याने धुळ्यास जिल्हा मुख्यालय बनवले व या गावाचा विस्तार केला. एकवीरा
देवीचे मंदिर जुन्या धुळ्याच्या देवपूर भागात, पांझरा नदीकाठी वसले आहे.
या मंदिराची नेमकी उभारणी कधी झाली याचा इतिहास अज्ञात असला ते चारशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. सुमारे २५० वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता व त्यावेळी त्यांनी येथे पाण्याची सोय व्हावी म्हणून पायविहिर बांधली होती, असे सांगण्यात येते. धुळे जिल्हा गॅझेटियरच्या सुधारित आवृत्तीतील नोंदीनुसार, पूर्वी हे मंदिर साधे दुमजली होते व त्यावर भक्कम लाकडी उतरते छत होते. इंग्रज सरकारतर्फे येथील नंदादीपसाठी वार्षिक २९ रुपये वर्षासन देवस्थानास मिळत असत, असेही सांगण्यात येते. मंदिराच्या व्यवस्थापनाकरीता १९५५ मध्ये विश्वस्त संस्था नोंदणीकृत झाल्यानंतर १९६७ आणि १९८७, १९८८ मध्ये या मंदिराचा टप्प्याटप्प्याने जीर्णोद्धार करण्यात आला.
या जीर्णोद्धारित मंदिराला सुमारे दहा फूट उंचीची दगडी तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दुमजली स्वागतद्वाराच्या दोन्ही बाजूस चौथरे व त्यावर अष्टकोनी आणि वर निमुळत्या होत गेलेल्या दीपमाळा आहेत. दोन्ही दीपमाळांच्या बाजूला गजराज शिल्पे आहेत. मंदिराचे प्रांगण जमिनीपासून काही फूट उंचावर असल्याने स्वागतद्वारातून ११ पायऱ्या चढून प्रांगणात प्रवेश होतो. स्वागतद्वारास दोन्ही बाजूस असलेले चौकोनी नक्षीदार स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. स्तंभांवर तुळई व त्यावरील छतावर कठडा असलेला नगारखाना आहे. नगारखान्याच्या चारही कोनांत प्रत्येकी दोन गोलाकार स्तंभ, त्यावरील उतरत्या छतावर मध्यभागी दोन थरांचे चौकोनी शिखर व त्यावर कळस आहे.
प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूस भिंतीत पहारेकरी कक्ष आहेत. येथून मंदिराच्या पेव्हर ब्लॉक लावलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडपाचे छत दोन्ही बाजूस उताराचे आहे, तर गर्भगृहाच्या छतावर सुमारे तीस फूट उंच षट्कोनी शिखर आहे.
शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे. सभामंडपास तीन प्रवेशद्वारे आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल, समोर जमिनीवर कूर्ममूर्ती व ललाटबिंबावर असलेल्या देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे व त्यात हवा व उजेड येण्यासाठी गवाक्ष आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर देवीचे वाहन सिंहाची मूर्ती आहे.
गर्भगृहाची दर्शनी भिंत नक्षीदार रजतपटल आच्छादित आहे व त्यावर नवदुर्गा नक्षी आहे. सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूस सूर्यद्वार व चंद्रद्वार आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वारावर नक्षीकामाने सुशोभित अशा एकावर एक तीन ललाटपट्टया व त्यातील ललाटबिंबांवर अनुक्रणे गणपती, ओम् चिन्ह व किर्तीमुख आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर देवीची सायुध, सालंकृत, अष्टभुजा शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे. देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व छत्र आहे. समोर दोन्ही बाजूस पितळी गज शिल्पे आहेत. उजव्या बाजूला गणपती व डाव्या बाजूला तुकाई देवीची मूर्ती आहे.
मंदिराच्या प्रांगणात असलेल्या रथकक्षात पितळी रथ आहे. येथे रथास तगतराव असे म्हणतात. या रथावर अष्टकोनी मनोरा व त्यावर देवी देवतांच्या प्रतिमा आहेत. यात्रेच्या वेळी हा तगतराव मंदिराभोवती फिरवला जातो. याशिवाय प्रांगणात शितला देवी, खोकला देवी, भगवान परशुराम, मारुती, विठ्ठल–रखुमाई, महालक्ष्मी, काळभैरव, महादेव आदी मंदिरे व भक्त निवासाची मोठी इमारत आहे. येथे भक्तांची उत्सव काळात राहण्याची व्यवस्था केली जाते. प्रांगणात पायऱ्या असलेली एक विहीर आहे.
मंदिरात चैत्र नवरात्री व आश्विन नवरात्री हे मुख्य वार्षिक उत्सव साजरे होतात. दोन्ही नवरात्रौत्सवात प्रत्येकी दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दहाही दिवस मंदिरात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात. याशिवाय दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, महाशिवरात्री, हनुमान जयंती, मकर संक्रांत आदी उत्सवही साजरे होतात. चैत्रोत्सव व दर पौर्णिमेस येथे देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात.