पुणे जिल्ह्यात लोणावळ्यापासून जवळच असलल्या वेहेरगाव कार्ला येथील डोंगरावर राज्यात प्रसिद्ध असलेले एकविरा देवीचे पुरातन मंदिर आहे. एकवीरा आईच्या या स्थानाशेजारी पुरातन कार्ला लेणी आहेत. पुरातत्त्व विभागाने हे सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित केले आहे. देशातील सर्वात मोठे बौद्ध चैत्यगृह असलेल्या या लेण्यांची निर्मितीही प्राचीन काळातीलच आहे. ही देवी राज्यातील अनेक कोळी व आगरी समाजातील भाविकांची कुलदेवता आहे.
या देवीची अख्यायिका अशी, वनवासात असताना पांडव येथे आले होते. तेव्हा आई एकवीरा देवीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी तिने या ठिकाणी मंदिर बांधण्याची इच्छा प्रकट केली. मात्र हे कार्य एका रात्रीत करावे लागेल, अशी अटही घातली. एवढ्या उंच अवघड डोंगरावर एका रात्रीत मंदिर बांधणे, शक्यच नव्हते. पण पांडवांनी स्थानिकांच्या मदतीने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले आणि एकवीरा आईची इच्छा पूर्ण केली. त्यांची भक्ती पाहून आई एकवीरा प्रसन्न झाली आणि अज्ञातवासात तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही, असे वरदान तिने पांडवांना दिले. त्या वरदानामुळे वनवासानंतरचा पांडवांचा अज्ञातवास यशस्वीपणे पूर्ण झाला. तेव्हापासूनच हे स्थान जागृत म्हणून स्थानिकांकडून पुजले जाते. हे स्थानिक लोक म्हणजे त्याकाळातील आगरी, कोळी आणि समुद्रावर अवलंबून असलेला इतर समाज.
हिंदू धर्मानुसार पृथ्वीवरील साडे तीन शक्तीपिठांपैकी एक म्हणजे रेणुका माता. आई एकवीरा ही या रेणुकामातेचेच रूप. त्यातही रेणुका आणि एकवीरा या दोन्ही देवता मूळ पार्वतीचे अवतार. जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा एकमेव चिरंजीवी पुत्र म्हणजे परशुराम. त्यामुळे परशुराम या एकुलत्या एक वीर पुत्राची आई म्हणून एकवीरा, अशी या नावामागची कथा सांगितली जाते. सामाजिक, सांस्कृतिक अभ्यासकांच्या मते आई एकवीरा ही प्रामुख्याने कोळी, आगरी, कुणबी यांसारख्या बहुजनांचे कुलदैवत असल्याने हिंदू धर्मातील आदिदेवतांपैकी ती एक आहे. काही प्रमाणात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अर्थात सीकेपी, दैवज्ञ ब्राह्मण या समाजातील लोकही तिला कुलदेवता मानतात. या रेणुका मातेची मंदिरे भारतासह नेपाळमध्येही आढळतात.
या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या वास्तूरचनेची मूळची तीन पश्चिमाभिमुख मंदिरे आहेत. ही तिन्ही मंदिरे एका ओळीत असून त्यापैकी दोन मंदिरे पूर्ण आहेत, तर तिसरे अपूर्ण आहे. प्रत्येक मंदिराभोवती मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांची मंदिरे आहेत. महामंडप, वर्षामंडप आणि गोपूर अशी या मंदिराची वास्तूरचना आहे. गाभाऱ्यात तांदळा अर्थात मुखस्वरूपातील शेंदूर लावलेली आईची मूर्ती आहे. तिच्याकडे पाहताना देवी आपल्यालाच पाहत असल्याचा भास होतो.
मंदिरात दोन देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. एक मुख्य एकवीरा देवी आणि डाव्या बाजूला जोगेश्वरी देवी. जोगेश्वरी ही काळ भैरवनाथांची बायको आणि काळभैरवनाथ हा एकवीरा आईचा भाऊ असे नाते मानले जाते. डोगर चढताना अर्ध्या टप्प्यावर देवीच्या पवित्र पावलांची चिन्ह असलेले मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी तब्बल पाचशे पायऱ्या चढाव्या लागतात. डोंगरावर स्थित एकवीरा आईच्या मंदिरातून आजुबाजूच्या निसर्गाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
मंदिराबाहेर शमीचं मोठे झाड आहे. या वृक्षाखालीच शमीदेवतेचे मंदिर आहे. देशातील शमीदेवतेचे हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. दसऱ्याला येथे मोठ्या संख्येने भाविक पूजा करायला येतात आणि शमीदेवतेचा आशीर्वाद घेऊन सीमोल्लंघन करतात.
आई एकवीरा देवीच्या मंदिरात नियमित पूजा, आरती आणि अभिषेक होतो. दररोज पहाटे ५ वाजता एकवीरा आईची पुजा सुरू होते. गुलाबजल, अत्तर, गोमूत्र शिंपडून मंदिर परिसर स्वच्छ, सुगंधित, पवित्र केला जातो. पहाटे ५.३० वाजता काकड आरती केली जाते, सकाळी ६.३० वाजता अभिषेक होतो. पौर्णिमा-अमावस्येच्या आदल्या दिवशी अर्थात चतुर्दशीला देवीला पंचामृताचा अभिषेक करून स्नान घातले जाते. सकाळी सहा ते रात्री ८.३० पर्यंत भाविकांना एकवीरा आईचे दर्शन घेता येते.
अश्विन किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने येथे गर्दी करतात. पण तसे पाहायला गेले तर वर्षभर कोळी आणि आगरी समाजातील भाविकांची गर्दी असतेच. एकवीरा आई आदिशक्ती म्हणून तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये पशुबळींचीही प्रथा आहे. सर्वसाधारणपणे देवीचा नवस फेडताना कोंबड्या-बोकडाचे बळी दिले जातात. आईला सामिष नैवेद्य दाखवून तो प्रसाद कुटुंबातील सदस्य मोठ्या श्रद्धेने ग्रहण करतात. मंदिराजवळ भाविकांच्या निवासासाठी अनेक धर्मशाळा व हॉटेल आहेत. पायथ्यापासून गडापर्यंतच्या पायऱ्यांना संरक्षक लोखंडी रेलिंग लावण्यात आल्या आहेत. संकटाला धावून येणारी, नवसाला पावणारी आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मंदिराला भेट देतात. विशेष म्हणजे तिच्या नावाने लोकसंगीताने भारलेली शेकडो गाणी लोकप्रिय झालेली आहेत.