एकमुखी दत्त मंदिर

रविवार कारंजा, पंचवटी, नाशिक, जि. नाशिक


नाशिकमधील रविवार कारंजा येथील गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर ‘प्रति गाणगापूर’ अशी ओळख असलेले एकमुखी दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर साधारणतः ३५० वर्षें जुने असल्याचे सांगितले जाते. अहिल्यादेवी होळकर पूल आणि यशवंत महाराज मामलेदार समाधीपासून जवळच मंदिराचे स्थान आहे. हे जागृत देवस्थान असून एखाद्या व्यक्तीला कसलीही बाधा झाली असेल, तर या एकमुखी दत्ताची उपासना केल्यावर ती निघून जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की नाशिकमधील सद्गुरू वामन सखाराम बर्वे महाराज हे दत्तात्रयांचे निस्सीम भक्त होते. अनेक वर्षे साधना केल्यावर श्रीदत्त त्यांना प्रसन्न झाले व स्वप्नदृष्टांत देऊन ‘मी गोदावरीच्या पात्रात एकमुखी षड्भुज स्वरूपात आहे. माझी प्रतिष्ठापना कर’, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी बर्वे महाराजांनी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्वप्नदृष्टान्ताप्रमाणे जेथे मूर्ती शोधून काढण्याची आज्ञा झाली होती, त्या स्थळी त्यांनी गोदावरीच्या पात्रात डुबकी मारली. तेथे त्यांना तळाशी दत्ताची वालुकामय मूर्ती सापडली. ती मूर्ती ते आपल्या घरी घेऊन आले व आपल्या निवासस्थानाशेजारीच म्हणजे आता जेथे मंदिर आहे तेथेच त्यांनी मंदिर बांधून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. अनेक वर्षे सेवा केल्यानंतर कालांतराने सद्गुरू बर्वे महाराज मंदिरालगतच समाधीस्थ झाले. या मंदिरात दत्तसंप्रदायातील अनेक साधू-संत, थोर व्यक्ती दर्शनास येऊन गेल्याचे जुन्या कागदपत्रांत उल्लेख आहेत. सद्गुरू रामचंद्र महाराज बर्वे यांनी २०० वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे.
गोदा घाटाकडून पायऱ्या चढून मंदिर प्रवेश करताना कमान लागते. या कमानीच्या दोन्ही बाजूला रक्षकांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. एकमुखी दत्ताचे मंदिर छोटेखानी व मातीचे असून गर्भगृह व सभामंडप अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहातील एकमुखी दत्तात्रयाच्या मूर्तीला सहा हात आहेत. त्यांत कमळ, त्रिशूळ, शंख, चक्र, रुद्राक्षांच्या माळा आहेत. दत्तमूर्तीच्या बाजूला अनुसया आणि महालक्ष्मी या देवींच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहात चांदीचे नक्षीकाम असून मंदिराला छोटासा कळस आहे.

गोदावरीच्या तीरावर व काहीसा उंचावर असल्यामुळे मंदिराच्या परिसरातून संपूर्ण पंचवटीचा भाग नजरेच्या टप्प्यात येतो. मंदिराशेजारी औदुंबर वृक्ष आहेत. तसेच गणपती, राम, मारुती, काळभैरव, सप्तशृंगीमाता यांची छोटी मंदिरे आहेत. याशिवाय येथे अनेक साधू-संतांच्या समाध्या आहेत. येथे दरवर्षी गुरुप्रतिपदा मोठ्या उत्साहात साजरी होते. त्यावेळी मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येते. या दिवशी निघणाऱ्या पालखी सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती असते. दत्त जयंतीनिमित्त दहा दिवस येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यामध्ये लघुरुद्राभिषेक, गुरुचरित्र पारायण, विश्वकल्याणार्थ श्री दत्तयाग, श्री दत्तयाग पूर्णाहुती, श्री सत्यदत्त महापूजा व गोपालकाला आदींचा समावेश असतो.

याशिवाय नवरात्रोत्सव, दीपावली या काळात भजन, पारायणे, सप्ताह असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या मंदिरात दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी आरती केली जाते. याशिवाय नित्यनेमाने येथे गुरुचरित्राची पारायणे होत असतात. येथे दररोज दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अन्नदान केले जाते. धार्मिक कार्यासोबतच दत्तजयंतीला येथे रक्तदान शिबिर, तसेच गोरगरिबांना अन्नदान असे सामाजिक कार्यही केले जाते. सध्या मठाधीपती मयुरेश बर्वे हे या मंदिराचा कार्यभार पाहतात. या मंदिरात दर्शनासाठी व गुरुचरित्राच्या पारायणासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

उपयुक्त माहिती:

  • नाशिक एसटी बस स्थानकापासून ३ किमी, तर नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून १० किमी अंतरावर
  • नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • नाशिक महापालिका बसचीही सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • संपर्क : मयुरेश बर्वे गुरुजी मो. ९५४५०३५२०३
Back To Home