
भारतात बाराव्या ते तेराव्या शतकात महानुभाव पंथाचा उदय झाला. जातीभेद झुगारून, चातुर्वर्ण्य नाकारून, स्री व शूद्रांना एकसमान मानणाऱ्या या पंथाचा उदय महाराष्ट्रात झाला असला तरी त्याचा प्रसार भारतभर झाला होता. त्यामुळे या पंथाचे मठ, आश्रम व देवालये भारतात सगळीकडे आढळतात. या पंथात श्रीकृष्ण प्रभू, श्रीदत्तप्रभू, चक्रपाणी महाराज, गोविंदप्रभू व चक्रधरस्वामी हे प्रमुख अवतार मानले जातात. यापैकी श्रीदत्तप्रभू यांचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावात आहे. येथील एकमुखी दत्तमूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीचे हे मंदिर सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे आहे. येथील वार्षिक जत्रोत्सवाची परंपरा १८व्या शतकापासून आजतागायत अखंड सुरू आहे. महानुभाव पंथात मूर्तिपूजा निषिद्ध मानली गेली असली तरी येथील पंचधातूच्या मूर्तीचे अष्टांग दर्शन घेण्याची प्रथा आहे. येथील दत्त तीन मुखांऐवजी एकमुखी आहे. त्याबाबत असे सांगितले जाते की महानुभाव पंथात श्रीदत्तास श्रीकृष्णाचा दुसरा अवतार मानला जातो. त्यामुळे तो ब्रह्म–विष्णू–महेश नसून तो एकमुखाचा श्रीकृष्ण आहे. त्यामुळे या मंदिरात एक मुखी दत्तात्रयांच्या पंचधातूची अष्टांग पुजा केली जाते. या मंदिराचा जिर्णोद्धार पाथूरकर घराण्यातील गोपीराज महानुभाव यांनी केलेला आहे.
गावापासून सुमारे शंभर फूट उंच टेकडीवर असलेल्या मंदिराची पायथ्याशी मोठी प्रवेश कमान आहे. कमानीतून पुढे आल्यावर मंदिराची आवारभिंत व प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. भाविकांच्या सुविधेसाठी येथे स्टेनलेस स्टीलच्या नळ्या लावून दर्शनरांगेची व्यवस्था केलेली आहे. मंदिरासमोर महानुभाव पंथाचे पांढरे निशाण फडकत असते. मंदिरास लागून मुखमंडपाच्या उजव्या बाजूला प्राचीन गोलाकार दीपमाळ आहे. या दीपमाळेवर वरच्या बाजूला जाण्यासाठी आतून गोलाकार
जीना आहे. चार नक्षीदार स्तंभांवर ऊभे असलेला मुखमंडप दुमजली आहे. वरील मजल्यावर नगारखाना व छतावर घुमटाकार शिखर, त्यावर आमलक व कळस आहे. मुखमंडप व नगारखान्यास चारही बाजूंनी चंद्राकार कमानी आहेत.
मंदिराच्या सभामंडपास समोरील बाजूने तीन व उजव्या व डाव्या बाजूस प्रत्येकी एक अशी एकूण पाच प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार लाकडी चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रकाश व हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. त्यावरील द्वारशाखा पानाफुलांच्या नक्षीने सुशोभित आहेत. स्तंभशाखांवर उभ्या धारेच्या नक्षी आहेत. स्तंभात पायाकडे कुंभकमळ नक्षी व शीर्षभागी चौकोनी कणी आणि त्यावर महिरपी कमान आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस नक्षीदार दीपकोष्टके आहेत.
गर्भगृहात वज्रपिठावर काचेच्या मखरात एकमुखी दत्ताची पंचधातूची
सिंहासनारूढ मूर्ती आहे. देवाच्या उजव्या हातात गदा व डाव्या हातात कमंडलू आहे. मूर्तीच्या अष्टांगावर व मखरासमोर पवित्र मृदावस्तू आहेत. या आठ वस्तूंना ‘विशेष’ असे म्हटले जाते. या विशेषांना स्पर्श करून दर्शन घेतले जाते. मूर्तीच्या मागील प्रभावळीवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणा मार्ग व गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूला दारे आहेत.
मंदिराच्या छतावर चहुबाजूने सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावरील कठड्यावर आठ व्याघ्रशिल्पे आहेत. चारही कोनांवर चार मेघडंबरी व त्यावरील आमलकावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर मध्यभागी पाच थरांचे गोलाकार शिखर आहे. प्रत्येक थरात बारा देवकोष्टके व त्यात देवप्रतिमा आहेत. शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
दत्तजयंती हा मुख्य वार्षिक उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संध्याकाळी महाआरती करून सजवलेल्या पालखीत एकमुखी दत्ताची मूर्ती बसवली जाते. पालखी उचलण्याआधी पुन्हा महाआरती होते. सर्व भाविक आपल्या हातातील प्रज्वलीत निरांजनाने देवास ओवाळतात. यावेळी हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघतो. पालखी ग्रामप्रदक्षिणेला निघते तेव्हा ढोल ताशांचा व तुतारीचा आवाज घुमतो. सर्व भाविक पालखीसोबत ग्रामप्रदक्षिणा करून मंदिरात परततात. या उत्सवासाठी राज्यभरातून व शेजारील राज्यातील लाखो भाविक येथे येतात. उत्सवाच्या वेळी येथे भरणारा घोड्यांचा बाजार विशेष प्रसिद्ध आहे. घोडे खरेदीसाठी येथे देशभरातून व्यापारी येतात.
मंदिरात देवाला उपाहार म्हणजेच जेवण दाखवण्याची प्रथा आहे. देवाला दाखवलेले जेवण नंतर भाविकांना वाटले जाते. येथे तुरदूड म्हणजे पाच नारळ एकावर एक रचून, त्यांच्या भोवती तुरीची रोपे बांधून, दुड तयार केली जाते व ती देवास अर्पण केली जाते. तसेच एका कोऱ्या फडक्यात नारळ बांधून तो नारळ मंदिरात बांधून नवस करण्याची प्रथा आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर ते फडके सोडून त्यातील नारळ फोडले जातात. देवास अवसरची म्हणजे पानावर खडीसाखर, लवंग सुपारी, बदाम, मनुका, चारोळ्या, बत्तासे या जिनसा घालून केलेला विडा व सोबत नारळ–अगरबत्ती अर्पण करण्याची प्रथा आहे.