दुर्गादेवी मंदिर

दुर्गानगर, मलकापूर, ता. मलकापूर, जि. बुलडाणा

मलकापूर शहराला प्राचीन इतिहास लाभला आहे. येथील प्राचीन तटभिंतीला लागूनच दुर्गादेवीचे मंदिर वसले आहे. शहरातून वाहणाऱ्या नळगंगा नदीच्या तीरावर बाणरूपाने प्रगट झालेली ही दुर्गामाता अनेक वर्षांपासून या नगरीचे संरक्षण करत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. शहराची ग्रामदेवता असलेल्या या देवीला ‘बडी माता’ असेही संबोधण्यात येते. या देवीची मनोभावे सेवा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, या श्रद्धेतून भाविक दूरदूरवरून येथे दर्शनासाठी येतात. अनेक दाम्पत्ये येथे अपत्यप्राप्तीसाठी देवीला साकडे घालतात. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान या मंदिराच्या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या मंदिरामुळे या भागाला दुर्गानगर हे नाव पडले आहे.

आदिशक्तीचे परमोच्च रूप म्हणून देवी दुर्गेची उपासना केली जाते. मार्कंडेय पुराणातील ‘देवी माहात्म्य’ म्हणजेच ‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथानुसार, जेव्हा महिषासुर नावाच्या असुराने वरदान मिळवून स्वर्गलोकावर ताबा मिळवला आणि देवांना पराभूत केले, तेव्हा असुरांच्या नाशासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासह सर्व देवतांनी आपल्या शरीरातील ‘तेज’ अंश बाहेर काढले. या एकत्रित तेजातून एका अत्यंत तेजस्वी शक्तीचा, म्हणजेच देवी दुर्गेचा आविर्भाव झाला. हिमालयाने तिला सिंह (वाहन) दिले, विष्णूने सुदर्शन चक्र, शंकराने त्रिशूळ, तर इतर देवतांनी आपापली अस्त्रे देऊन तिला रणचंडिका बनवले. यानंतर देवीने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध करून त्याचा वध केला. म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असे संबोधले जाते.

महाभारतातील ‘विराट पर्वा’मध्ये अज्ञातवासाच्या यशासाठी धर्मराज युधिष्ठिराने आणि ‘भीष्म पर्वा’मध्ये युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी विजयासाठी अर्जुनाने देवी दुर्गेची स्तुती केल्याचा उल्लेख आहे. तसेच, ‘श्रीमद्देवीभागवत’ या ग्रंथात तिला ‘भुवनेश्वरी’ आणि सृष्टीची निर्माती म्हटले आहे. वेदांमध्येही, विशेषतः ऋग्वेदातील ‘देवी सूक्त’ (वागांभृणी सूक्त) हे शक्तीच्या उपासनेचे मूळ मानले जाते. यात देवी स्वतःला ‘मीच विश्वाची राणी आणि ईश्वराची शक्ती आहे’ असे सांगते.

मलकापूर शहरामध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यामध्ये राजे नेमिवंतांचे श्रीराम मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, गौरीशंकर मंदिरांचा समावेश आहे. येथील दुर्गादेवी मंदिर त्यापैकीच एक होय. या गावाभोवती १७२९ मध्ये मुहम्मद मलीखान याच्या काळात बांधलेली तटबंदी आजही अस्तित्वात आहे. याच तटबंदीला लागून हे देवालय उभे आहे. जुन्या शहरातील दुर्गानगर परिसरात वसलेल्या या देवीबाबतची आख्यायिका अशी की प्राचीन काळी मुघलांच्या दडपशाहीला कंटाळून राजस्थानमधील एका समाजाने तेथून स्थलांतर केले आणि त्यांनी येथे आसरा घेतला. त्यापैकी अनेक जण नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल झाले. येथील अनेक जण नंतर रघुनाथराव आणि दौलतराव शिंदे यांच्या लष्कराचाही भाग होते. या समाजातील एका व्यक्तीला अनेक वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवाच्या काळात रात्रीच्या वेळी या ठिकाणी लखलखीत प्रकाश दिसला. त्याने जवळ जाऊन पाहिले असता, दुर्गामातेच्या रूपातील देवीचा बाण त्याच्या दृष्टीस पडला. त्यानंतर त्याने आवाज देऊन ग्रामस्थांना जागे केले. त्यावेळी येथे जमलेल्या लोकांना देवीचा बाण जमिनीतून वर येत असल्याचे दिसले. त्यापैकी अनेकांनी तिथे खोदण्याचा प्रयत्न केला. मात्र, देवीचा बाण पूर्णपणे बाहेर काढण्यात त्यांना अपयश आले. कालांतराने येथे देवीचे मंदिर उभारण्यात आले. पूर्वी हे मंदिर छोटेखानी होते. कालौघात या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार करण्यात आला.

सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. महिरपी कमानीच्या आकाराचे प्रवेशद्वार असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस असलेल्या द्वारस्तंभांवर गुलाबपुष्प, स्वस्तिक आणि कलश आदी मंगलप्रतीके कोरण्यात आली आहेत. सभामंडपात गर्भगृहासमोर एका छोट्या चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. सभामंडपातील वितानावर काचेची मिनाकारी सजावट आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची प्रतिमा विराजमान आहे. दोन्ही बाजूला मंगलकलशाची चित्रे आहेत. गर्भगृहात मोठ्या वज्रपिठावर देवीचा बाण आहे. त्यावर चांदीचा मुखवटा बसवण्यात आला आहे. मूर्तीमागे प्रभावळ आणि मूर्तीच्या मागे दोन्ही बाजूंना दोन तलवारी आहेत.

मंदिराच्या सभामंडपावर सोनेरी रंग दिलेले घुमटाकार शिखर आहे. गर्भगृहावरील उंच शिखरावर देवकोष्टके व मंगलकलश कोरलेले आहेत. त्यावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे. मंदिर परिसरातील पिंपळवृक्षाखाली हनुमानाचे मंदिर आहे. त्यामागे शिवलिंग आहे. परिसरात शीतलामाता तसेच भैरवनाथाचीही मंदिरे आहेत.
नवसाला पावणारी ही देवी भाविकांना रिक्त हस्ते माघारी पाठवत नाही, अशी अनेकांची श्रद्धा आहे. देवीसमोर नवस बोलणारे अनेक भाविक येथे नारळाचे तोरण बांधतात. नवसपूर्तीनंतरही ते येथे दर्शनासाठी येतात. अनेक दाम्पत्ये अपत्यप्राप्तीसाठी देवीला चांदीचा पाळणा अर्पण करतात. अपत्य झाल्यावर बाळाला देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या चरणी आणले जाते. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. शेकडो भाविक या कालावधीत देवीचे दर्शन घेऊन तिची ओटी भरतात. या काळात नऊही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अष्टमी व नवमीच्या दिवशी येथे होम-हवन संपन्न होतात.

उपयुक्त माहिती:

  • मलकापूर बस स्थानकापासून १.६ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ४६ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून मलकापूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापासून ५० मीटर अंतरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८६६८६८७४०२, ८६०५८४९२०९

दुर्गा देवी मंदिर

दुर्गानगर, मलकापुर, ताल. मलकापुर, जिला. बुलढाणा

Back To Home