दोधेश्वर मंदिर, दोधेश्वर,

ता. सटाणा, जि. नाशिक

जेथे शिवनामाचा उच्चार। तेथे कैसा जन्म मृत्यू संसार।। सटाणा शहरातून भाक्षी मार्गे दोधेश्वर येथे जाताना मार्गात या श्लोकाची पाटी लावलेली लोखंडी वेस दिसते. तेथून काही अंतरावर बागलाणच्या निसर्गसमृद्ध परिसरात दोधेश्वर (दोदवेश्वर) महादेवाचे मंदिर आहे. १६ व्या शतकातील या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगाखालून जिवंत पाण्याचा झरा वाहत असतो.

बागलाण प्रांतात १२ व्या ते १६ व्या शतकादरम्यान कनौजच्या राठोडवंशीय बागुलशहा घराण्याने राज्य केले. त्यावरून या प्रांताचे नाव ‘बागलाण’ असे पडले. त्यातील वीरमशहा राठोड या बागुल नरेशाच्या कारकिर्दीत शके १५०२ मध्ये हे मंदिर उभारण्यात आले होते. मंदिरातील एका शिलालेखावर या वर्षाचा उल्लेख आढळतो. ऐतिहासिक नोंदींनुसार, पुण्यश्री अहिल्याबाई होळकर यांची दोधेश्वरावर श्रद्धा होती. त्यांनी येथे येऊन अनेकदा पूजा-अर्चा केली होती. भाविकांसाठी त्यांनी येथे एक बारवही खोदली होती. शिवाय पूजा-अर्चेसाठी कवठ व बेलाची देवराई निर्माण करण्यासाठी त्यांनी कोटबेल या गावची जमीन मंदिरास इनाम दिली होती. अलीकडे १९९२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.

मंदिर परिसरात पाच शिवलिंगे असल्याचे सांगितले जाते. त्याबाबतची आख्यायिका अशी की एक गाय एका मोठ्या वारुळापाशी येऊन नेहमी पान्हा सोडत असे. ग्रामस्थांनी कुतूहल म्हणून त्या वारुळात पाहिले असता तेथे एक मोठे मूळ सापडले. त्या मुळाजवळ एक शिवलिंग दिसले. आजही ते शिवलिंग तेथे असून ‘मुळेश्वर’ या नावाने ते ओळखले जाते. दोधेश्वर मंदिराच्या उजवीकडे असलेल्या टेकडीवर मुळेश्वराचे मंदिर आहे. काही जण त्यास ‘फिरता महादेव’ असेही म्हणतात. त्या वारुळाजवळील मूळ एका वेलीचे होते. त्याचा मागोवा घेतला असता तेथे शिवलिंग सापडले, ते वेलेश्वर. काही अंतरावर त्या वेलीला फूल आलेले दिसले, तेथेही शिवलिंग होते, ते फुलेश्वर. त्या फुलातून फळ आले म्हणून पुढे झाला फळेश्वर व फळातून दुधासारखा पदार्थ आला म्हणून हा दुग्धेश्वर महादेव. दुग्धेश्वर शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘दोधेश्वर’ हे नाव रूढ झाले. पद्मपुराणातही दोधेश्वराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते.

दोधेश्वर मंदिराचा परिसर हिरव्यागर्द वनराईने फुललेला आहे. या परिसरात पोचताच उंच झाडांमधून मंदिराचा कळस नजरेस पडतो. प्रसाद आणि पूजा साहित्याच्या दुकान रांगेतून पुढे गेल्यावर मंदिराच्या तटबंदीतून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात फरसबंदी असून बकुळ, चाफा, मोगरा, वड, पिंपळ, चिंच, बेल असे अनेक वृक्ष आहेत. संगमरवरी पायऱ्यांवरून पुढे गेल्यानंतर नंदीमंडपाचे दर्शन होते. नंदीमंडपाच्या डाव्या बाजूस गणेशाची आणि उजव्या बाजूस श्रीकृष्णाची मूर्ती आहे.

मुख्य सभामंडपात प्रवेश केल्यावर मंदिराच्या प्राचिनत्वाची प्रचिती येते. भिंतींवर असलेल्या कमानीतील देव-गंधर्वांची उठावशिल्पे व तेथील नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडपातून काही पायऱ्या उतरून दगडी गर्भगृहातील शिवपिंडीपर्यंत जाता येते. सुबक शिवपिंडी, बाजूला धातूचे शिवलिंग, त्यावर महादेवाचा मुखवटा, शेषनागाने उभारलेले त्यावर फण्याचे छत्र, एका बाजूस त्रिशूल आणि त्यावर लावलेले डमरू येथे पाहता येतात.

असे सांगितले जाते की मंदिराच्या मागील डोंगररांगेत उगम पावलेल्या दोध्याड नदीचे दोन प्रवाह असून त्यातील मुख्य प्रवाह या शिवपिंडीखालून जातो, तर दुसरा गोमुखातून वाहतो. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचा, क्षेत्रांचा इतिहास पांडवांशी जोडलेला असतो. त्यानुसार या मंदिराचीही एक आख्यायिका असून त्यानुसार पांडवांनी येथे मुक्कामास असताना या शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे या स्थानास ‘पांडवेश्वर’ असेही म्हटले जाते.

मंदिर परिसरात काशी येथील दशनाम श्री पंच जुना आखाड्याचे थानापती श्री महंत रामपुरीजी महाराज यांची निर्वाण समाधी आहे. त्यांनी या स्थानाचा विकास केला होता. मंदिर परिसरात धर्मशाळा, अतिथीगृह आणि स्वयंपाकगृहही आहे. स्त्री, पुरुष भाविकांना स्नानासाठी दोन स्वतंत्र कुंडे येथे आहेत.

दर श्रावणी सोमवारी, तसेच महाशिवरात्रीनिमित्त येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी लोटते. श्रावणी सोमवारी व महाशिरात्रीला सटाणा येथील एसटी स्थानकातून पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत दर अर्ध्या तासाने दोधेश्वर मंदिरासाठी बस असते. यावेळी हजारो भाविक दोधेश्वराच्या दर्शनाला येतात. महाशिवरात्रीला तर ही संख्या दीड ते दोन लाख एवढी असते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

उपयुक्त माहिती:

  • सटाणा येथून ९ किमी, तर नाशिकपासून ९१ किमी अंतरावर
  • सटाणा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • न्याहरीची सुविधा नाही
  • मंदिर ट्रस्टतर्फे धर्मशाळा, अतिथीगृहांची सुविधा
Back To Home