ज्ञानेश्वर महाराज समाधी,

आळंदी (देवाची), ता. खेड, जि. पुणे


‘आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव’, असे संत नामदेवांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे मातृ-पितृतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचे हे समाधिस्थान. १२९६ साली म्हणजे वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात अजानवृक्षाखाली ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. असे सांगितले जाते की, त्यानंतर सुमारे साडेतीनशे वर्षांनी म्हणजे १५७० साली या जागेवर त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले.

आळंदी या तीर्थाला मोठा इतिहास आहे. हे मध्ययुगातील गाव आहे आणि त्याचा इ. स. ७६८ च्या कृष्णराज राष्ट्रकुटांच्या तळेगाव ताम्रपटात उल्लेख आढळतो. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या ६४ व्या अध्यायात आळंदीचा उल्लेख वारुणा, अलका, कर्णिका, आनंदवन, तसेच सिद्धक्षेत्र असा आढळतो. तर, संत नामदेव व संत तुकारामांच्या अनेक अभंगांमध्ये अलंकापुरी अथवा अलकापुरी असा उल्लेख आला आहे. छत्रपती शिवरायांनी आळंदीच्या मंदिराला एका शेतातील एक खंडी दोन मण धान्याची सनद दिल्याची नोंद आहे.

इंद्रायणी नदीच्या तीरावर हे तीर्थस्थान आहे. या नदीतीरावर इंद्राने तपश्चर्या केल्याने तिचे नाव इंद्रायणी पडले, असे सांगितले जाते. नदीपुलावरून गावात प्रवेश करताना प्रथम दिसतात ती मंदिरांची शिखरे. ‘ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली…’च्या गजरात आपण या स्थळी प्रवेश करतो. ज्ञानोबांच्या मंदिराची शोभा अवर्णनीय आहे. मंदिराच्या भव्य महाद्वारात हैबतबाबांची पायरी आहे. हैबतबाबा हे ज्ञानोबांचे भक्त होते. पालखी सोहळ्याचे ते प्रवर्तक मानले जातात. १८३६ मध्ये आळंदी येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पायरीला नमस्कार करून भाविक मंदिराच्या भव्य प्रांगणात प्रवेश करतात. येथेच पवित्र अजानवृक्ष आहे. असे सांगितले जाते की, ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्यापूर्वी आपल्या हातातील काठी येथे रोवली होती. त्या काठीला पालवी फुटून या अजानवृक्षाची निर्मिती झाली.

एका आख्यायिकेनुसार, अजानवृक्षाची मुळी समाधिस्थ ज्ञानदेवांच्या कंठास लागल्याचा स्वप्नदृष्टांत एकनाथ महाराजांना झाला होता. त्यानुसार त्यांनी तेथे खणून पाहिल्यावर मुळीचा पडलेला वेढा त्यांना दिसला. एकनाथ महाराजांनी तो वेढा दूर केला. याबाबत त्यांनी अभंगात सांगितले आहे की,

श्रीज्ञानदेंवे येवुनी स्वप्नांत। सांगितली मात मजलागी॥
दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा। परब्रम्ह केवळ बोलत असें॥
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली। येवुनिं आळंदी स्थळी काढ वेगी॥
ऐसे स्वप्न होता आलों अलंकापुरी। जव नंदी माझारी देखिंले व्दार॥
एका जनार्दनी पूर्व पुण्य फळलें। श्रीगुरु भेंटलें ज्ञानेश्वर॥

यापुढे एकनाथ महाराज म्हणतात,

अजानवृक्षाची पाने जाण जो। भक्षून करील अनुष्ठान।।
त्यासी साध्य होईल ज्ञाने। तेथे संशय नाही।।’

त्यानुसार अनेक भाविक या अजानवृक्षाखाली अनुष्ठान करताना दिसतात. या वृक्षासमोरच एकनाथ पार आहे आणि त्यावर एकनाथ महाराजांच्या पादुका आहेत. आपल्या आळंदी मुक्कामी एकनाथ महाराज येथे राहत असत. मंदिराच्या प्रांगणातच एक पिंपळाचा वृक्ष आहे. या वृक्षाला ‘सुवर्णपिंपळ’, असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरांच्या आई रुक्मिणी या पिंपळाला प्रदक्षिणा घालत असत, अशी आख्यायिका आहे.

मुख्य समाधी मंदिर चिरेबंदी दगडांचे आहे. त्याचे बांधकाम १५७० मध्ये झाल्याचे सांगितले जाते. सभामंडपालगत दोन्ही बाजूंना दोन मंडप आहेत. मुख्य मंडपाच्या पुढच्या बाजूला कासव मंडप आहे. अजानवृक्षाच्या फांद्यांनी हा भाग आच्छादला गेला आहे. कासव मंडपातून पुढे गेल्यानंतर गाभाऱ्यात ज्ञानोबारायांचा प्रसन्न मुखवटा आहे. त्याच्या दर्शनाने भाविकांची अवस्था ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी’ अशी होते.

ज्ञानोबांच्या समाधीमागेच विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. या गाभाऱ्यासमोरील मंडप दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी अंताजी माणकेश्वर यांनी बांधल्याची नोंद आहे. १९२५ मध्ये ज्ञानेश्वर संस्थानाकडून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. समाधीच्या पश्चिमेकडे सिद्धेश्वर मंदिर आहे. नंदीमंडप, मुख्य मंडप व गाभारा, असे त्याचे स्वरूप आहे. या मंदिराचा गाभारा काहीसा खोल आहे. तीन-चार पायऱ्या उतरून स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन घेता येते. या मंदिराच्या सभामंडपासमोर असलेल्या नंदीजवळून एक भुयारी मार्ग जातो. याच भुयारातून ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थानाकडे गेल्याचे वर्णन संत नामदेवांनी आपल्या

‘‘उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडली शिळा विवराची ।।’’

या अभंगात केले आहे.

समाधी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर मुक्ताबाईचे मंदिर आहे. महादरवाजाजवळ गरुडपार व दीपमाळ आहे. ही दीपमाळ सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी १७७४ मध्ये बांधल्याचे सांगितले जाते.

ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतील हा एक मोठा सोहळा मानला जातो. या प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत उपस्थित असतात. इंद्रायणीच्या दोन्ही तीरांवर भाविकांची मांदियाळी असते. त्यामध्ये वारीचे मानकरी, सेवेकरी, टाळकरी, विणेकरी यांचाही समावेश असतो. पहाटे ५ वाजल्यापासून येथे धार्मिक विधी सुरू होतात. ७ वाजता माऊलींचे दर्शन सुरू होते. दुपारी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात महापूजा होते. सायंकाळी ४ च्या सुमारास या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. हा प्रस्थान सोहळा सुरू असताना या मंदिराचा कळस काहीसा हलतो, असे सांगितले जाते. खासकरून हे हलणारे कळस ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी भाविक येथे गर्दी करतात. कार्तिक वद्य त्रयोदशी या ज्ञानोबांच्या संजीवन समाधी दिनालाही येथे मोठा उत्सव होतो.

ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना आळंदी आणि परिसरात घडल्या होत्या. त्यातील एक म्हणजे त्यांची आणि चांगदेव या महायोग्याची भेट. ज्ञानोबांना भेटण्यासाठी ते वाघावर बसून आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी ज्ञानेश्वर महाराज, वडीलबंधू निवृत्तीनाथ, तसेच मुक्ताबाई व सोपानदेव यांच्यासमवेत भिंतीवर बसून गेले. ती भिंत आजही आळंदीत दाखवली जाते. चांगदेवांची ज्ञानेश्वरांनी जेथे भेट घेतली, ते विश्रांतवड हे स्थान वडगाव-घेनंद रस्त्यावर आहे. अश्विन महिन्यात नवरात्रोत्सवाच्या वेळी ज्ञानोबांची पालखी तेथे जाते. त्यावेळी तेथे अनेक विंचू दिसतात. ते विंचू म्हणजे चांगदेवांचे असंख्य शिष्य. ते कोणालाही दंश करीत नाहीत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आळंदीत माऊलींच्या मंदिराप्रमाणेच कृष्ण मंदिर, मुक्ताई मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर, पुंडलिक मंदिर ही देवालये आहेत. येथील दत्त मंदिरामागे असलेल्या विष्णुपद या ठिकाणी गयेप्रमाणे श्राद्ध विधी केले जातात. राज्यातील अनेक भागांतून हे विधी करण्यासाठी येथे दररोज शेकडो नागरिक येत असतात. आळंदीत अनेक धर्मशाळा आहेत. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनेही भक्त निवास बांधून भाविकांची उत्तम सोय केलेली आहे.

उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून २२ किमी अंतरावर
  • मुंबईतून एसटी आणि पुण्यातून पीएमपीएमएल सेवा
  • खासगी वाहने इंद्रायणीच्या घाटापर्यंत जाऊ शकतात
  • भक्त निवास व प्रसादाची सुविधा
Back To Home