धावीर महाराज देवस्थान

रोहा शहर, ता. रोहा, जि. रायगड

राज्यात पोलीसांच्या सशस्त्र मानवंदनेचा बहुमान असलेली केवळ दोन मंदिरे आहेत. पैकी पंढरपूरचे विठ्ठल देवस्थान हे पहिले आणि त्यानंतर रोह्यातील ग्रामदैवत असलेले धावीर महाराज हे दुसरे मंदिर होय. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणाऱ्या पालखीला पोलीसांकडून सशस्त्र मानवंदना दिली जाते. १८६२ सालापासून ही परंपरा सुरू आहे. शहराच्या पश्चिमेस हनुमान टेकडीच्या पायथ्याशी, निसर्गरम्य परिसरात असलेले धावीर महाराजांचे मंदिर हे रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

उत्तरेला अवचितगड, दक्षिणेला कळसगिरीचा डोंगर आणि बारमाही वाहणारी कुंडलिका अशा निसर्गसमृद्ध परिसरात रोहा शहर वसलेले आहे. येथून सुमारे किमी अंतरावर वराठी हे गाव आहे. असे सांगितले जाते की त्या गावाजवळील जंगलात रोज चरायला जाणारी एक गाय एका विशिष्ट ठिकाणी आपल्या दुधाचा पान्हा सोडत असे. हे दृश्य येथील महागावकर नावाच्या गुराख्याने पाहिले त्याने उत्सुकतेने त्या जागी कुदळीने खणायला सुरुवात केली. थोडे खणल्यावर तेथे धावीर महाराजांची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. ही घटना जेव्हा रोह्याचे सुभेदार बळवंतराव मोरे यांना समजली तेव्हा त्यांनी या जागेवर धावीर महाराजांचे मंदिर बांधले तेव्हापासून वराठी येथे जाऊन धावीर महाराजांचे दर्शन घेणे हा त्यांचा दिनक्रम झाला होता.

कालांतराने वयोमानामुळे बळवंतराव मोरे यांना दररोज वराठी येथे जाऊन धावीर महाराजांचे दर्शन घेणे अशक्य होऊ लागले. ज्या दिवशी धावीर महाराजांचे दर्शन होत नसे, त्या दिवशी ते अन्नग्रहण करीत नसत. त्यामुळे त्यांना रोजच उपवास घडू लागले त्यांची तगमग सुरू झाली. धावीर महाराजांना आपल्या लाडक्या भक्ताची होणारी उपासमार सहन झाली नाही. त्यांनी सुभेदार मोरे यांना स्वप्नदृष्टांत देऊनरोह्याच्या पश्चिमेस असलेल्या कातळावरून वराठीच्या डोंगराचे दर्शन होते. बरोबर त्याच ठिकाणी माझे मंदिर बांध, मी तुला तेथेच दर्शन देईनअसे सांगितले. त्याप्रमाणे सुभेदार मोरे यांनी या जमिनीचे मालक असलेले वतनदार बापूजी राजे देशमुख यांची भेट घेऊन त्यांना स्वप्नदृष्टांताबाबत सांगितले

बापूजी हेसुद्धा धावीर महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी तातडीने आपली जमीन धावीर महाराजांच्या मंदिरासाठी सुभेदार मोरे यांना दिली. .. १८४८ मध्ये माघ शुद्ध त्रयोदशीला भूमिपूजन करून फाल्गुन वद्य पक्षात म्हणजेच अवघ्या अडीच महिन्यांत हे मंदिर बांधून पूर्ण झाले. त्यानंतर बापूजी राजे देशमुखांनी पुढाकार घेऊन रोह्याची ग्रामसभा बोलावली त्यात धावीर महाराज यांना ग्रामदैवत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. अशा प्रकारे धावीर महाराज हे रोह्याचे ग्रामदैवत झाले.

धावीर महाराज मंदिराचा १९१६ मध्ये पहिल्यांदा १९९४ मध्ये पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या हस्ते दुसऱ्यांचा जीर्णोद्धार झाला. आता जे मंदिर आहे त्याची अंतर्गत रचना ही जुन्या मंदिराप्रमाणे आहे बाहेरचे बांधकाम आधुनिक स्थापत्य रचनेनुसार आहे. पूर्वी हे मंदिर लहान होते. १९९४ मध्ये त्याचे प्रशस्त मंदिरात रूपांतर झाले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस नंदी डाव्या बाजूस धावीर महाराजांचे अंगरक्षक चेडा महाराज यांचे स्थान आहे. धावीर महाराज हे मूळचे शिवपरिवारातील क्षेत्रपाळ श्रेणीतील दैवत असल्याचे यावरून स्पष्ट होते. मंदिराचे गर्भगृह संगमरवरी आहे त्यात मध्यभागी धावीर महाराजांची पाषाणमूर्ती आहे. सोबत कालिका (काळकाई) माता, बहिरीबुवा, वाघबाप्पा यांच्या मूर्तीही आहेत. मंदिराच्या प्रांगणात उजव्या बाजूस एक दगडी शिळा आहे, तेथे बळी देण्याची पद्धत आहे.

येथील काळकाईच्या स्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की मुरूडच्या सिद्दीला येथील भालगाव विभागातील खाजणीच्या पुढे कधीच मजल मारता आली नाही. याचे कारण त्याला खाजणीतील काळकाई देवी आणि धावीर महाराज यांनी रोखून धरले होते. काळकाई ही राजे देशमुखांची कुलदेवता आहे. धावीर महाराजांना रोह्याचे ग्रामदैवत म्हणून स्वीकारण्यात आले, त्याच सभेत त्यांच्या मंदिरात काळकाई देवीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मंदिरातून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी निघते. तिला ब्रिटिश काळापासून पोलीसांकडून मानवंदना देण्यात येते. त्याबाबतची आख्यायिका अशी की एकदा बापूजी देशमुख जिल्ह्याचा ब्रिटिश कलेक्टर चणेराविरवाडी भागात फेरफटका मारण्यास गेले असता अचानक सिद्दीच्या शिपायांनी त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने कलेक्टर घाबरला; परंतु बापूजींनी त्यांना धीर देत आपल्या पाठीशी धावीर महाराज आहेत, असे सांगितले. त्यावेळी बापूजी देशमुखांनी धावीर महाराजांना नमस्कार करून त्यांचा धावा केला आणि आश्चर्य म्हणजे तेथे अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. या आवाजामुळे या दोघांसोबत सैनिक आहेत, या समजुतीने सिद्धीच्या शिपायांनी तेथून काढता पाय घेतला. या घटनेमुळे ब्रिटिश कलेक्टरला धावीर महाराजांची प्रचिती आली. त्याने महाराजांना वंदन केले पालखीच्या दिवशी पोलीसांकडून धावीर महाराजांना सलामी देण्यात यावी, असे फर्मान काढले.

१५० वर्षांहून अधिक काळ येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्या काळात मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवाला घटी बसविले जाते दसऱ्याच्या दिवशी उठविले जाते. या काळात दररोज सकाळी सायंकाळी आणि रात्री १२ वाजता अशी तीन वेळा ढोल, नगारे, संबळ घंटांच्या गजरात धावीर महाराजांची आरती होते. प्रत्येक रात्रीप्रहरम्हणजे देवाचा पहारा असतो. हा प्रहर येथील प्रत्येक समाजाला विभागाला वाटून दिलेला असतो. या उत्सवकाळात दररोज संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत देवाचा गोंधळ घातला जातो. जेजुरीहून येणारे खंडोबाचे गोंधळी मागील अनेक वर्षांपासून ही सेवा बजावतात

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवाची सजलेली पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघते. यावेळी पोलीसांकडून या पालखीला सलामी दिली जाते. जवळपास २६ तास चालणाऱ्या या पालखी मिरवणुकीत हजारो ग्रामस्थ भाविक सहभागी होतात. या दिवशी रोहेकर तर येथे उपस्थित असतातच, शिवाय नोकरीव्यवसायानिमित्त बाहेर गेलेले येथील ग्रामस्थही पालखीला हजेरी लावतात. या पालखीत माहेरवाशिणींची संख्याही लक्षणीय असते. यावेळी धावीर महाराजांची पालखी आपल्या लाडक्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी जाते. प्रत्येक घरात पंचारती ओवाळून साखर फुटाणे उधळून देवाची पूजाअर्चा होते

धावीर महाराज मंदिरामुळे रोहे शहर प्रसिद्ध आहेच. याशिवाय याच रोह्याने देशाला दोन नररत्न दिली आहेत. त्यांनी रोह्याच्या कीर्तीत भर घातली. त्यातले एक आहेत देशाच्या अर्थकारणाला वळण लावणारे पहिले अर्थमंत्री रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. चिंतामणराव देशमुख आणि दुसरे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले. चिंतामणराव देशमुखांना येथेभाई पांडुरंगशास्त्रींनादादाम्हणत असत. त्यामुळेचदादा आणि भाई यांची जोडी, हीच रोह्याची अवीट गोडी’, असे येथे बोलले जाते.

उपयुक्त माहिती

  • रोहे बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, अलिबाग, पेण महाड येथून एसटीची सुविधा
  • कोकण रेल्वेनेही रोहे शहरात येता येते
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : प्रशांत देशमुख, अध्यक्ष, मो. ९४२२०९४६१८
  • नितीन परब, उपाध्यक्ष, मो. ९४२२६९६६६६ 
Back To Home