हजारो वर्षे अज्ञातवासात राहिलेली देवस्थाने काही चमत्कार व्हावा तशी प्रसिद्धीच्या झोतात येतात. केवळ शेंदूरलेपनाच्या परंपरेमुळे या प्राचीन मूर्ती सुरक्षित राहिल्याचे पाहून आश्चर्य आणि आनंदही वाटतो. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात म्हसदी गावाजवळ असलेले धनदाई देवीचे प्राचीन मंदिर अगदी अलीकडील काळात प्रसिद्धीस आले. नव्याने जीर्णोद्धार झालेल्या या मंदिरातील जागृत धनदाई देवी ही नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ही देवी परिसरातील ९६ कुळांची कुलदेवी मानली जाते.
मंदिराची अख्यायिका अशी की प्राचीन काळी या परिसरात राक्षसांचा उत्पात होऊ लागला तेव्हा रयतेने देवीचा धावा केला. भक्तांचा धावा ऐकून धनदाई देवी, सप्तश्रृंगी, एकवीरा, रेणुका, भटाई, चिराई व म्हाळसा या आपल्या सहा बहिणींसह प्रकटली व त्यांनी राक्षसांचा संहार केला. सातही देवींनी ज्या ज्या जागी राक्षसांचा वध केला त्या त्या जागी त्या मूर्तीरूपात स्थिर झाल्या व तेथे त्यांची मंदिरे स्थापित झाली. त्यानुसार नायगाव येथे धनदाई देवी स्थापित होऊन तिचे मंदिर येथे उभे राहिले. तेव्हापासून देवीची येथे नित्य पूजा होत असे.
हे देवस्थान हजार वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. परंतू पाण्याचे दुर्भिक्ष्य, जंगली श्वापदे व दरोडेखोरांचा प्रादुर्भाव यामुळे नायगावातील लोक जवळील म्हसदी गावात स्थलांतरीत झाले व येथील पुरातन मंदिर दुर्लक्षित होऊन विस्मृतीत गेले. त्याकाळात देवीच्या मंदिरात जंगलातील भिल्ल समाजाच्या लोकांनी पुजा अर्चा सुरू ठेवली होती. त्यानंतर सन १९६० ते १९७० दरम्यान देवीने भक्ताला दिलेल्या दृष्टांतानंतर मंदिराचा पुन्हा शोध लागला. तेव्हा मंदिरातील देवीची मूर्तीं शेंदुराच्या थरात सुरक्षित व सुस्थितीत आढळून आली. म्हसदी गावातील तरुणांनी एकत्र येऊन सन १९७३ साली मंदिराचा जीर्णोद्धार केला. या देवीच्या पूजनाचा मान आजही भिल्ल समाजाकडे आहे.
धुळे साक्री रस्त्यावर नेरलेपासून म्हसदी गावाकडे जाताना गावाच्या वेशीवर मंदिराची पहिली स्वागत कमान आहे. गावातून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची दुसरी स्वागत कमान आहे. मंदिराभोवती असणाऱ्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे व त्यावर झुल पांघरलेले गजराज शिल्पे आहेत. मंदिर काहीसे उंचावर असल्यामुळे सुमारे १५ पायऱ्या चढून मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपात एका मखरात देवीस संमुख अशी गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. पुढे मंदिराचा प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपात भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांगेची व्यवस्था आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे. गर्भगृहासमोरील एका चौथऱ्यावर सिंहाची पितळी मूर्ती आहे. या सभामंडातून बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूला दोन दारे आहेत.
गर्भगृहात वज्रपिठावर महिरपी कमानीने जोडलेल्या चार स्तंभांचा चांदीचा नक्षीदार मखर आहे. मखरावर शिखर आहे. या मखरात धनदाई देवीची चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या खालील दोन हातांत त्रिशूल वरील एका हातात खड्ग व एका हातात पाश आहे. देवी रेड्यावर बसलेली आहे. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी गवाक्ष आहेत. मंदिराच्या छताला चहूबाजूंनी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. शिखराच्या चारही बाजूंच्या भिंतीवर उठाव शैलीतील शिखरांच्या प्रतिकृती आहेत. शिखरात शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिराच्या प्रांगणात सुरक्षा कठडा असलेल्या चौथऱ्यावर सवत्स कामधेनू शिल्प आहे. येथून काही अंतरावर असलेल्या चौथऱ्यावरील देवळीत म्हसोबाची मूर्ती व इतर दोन पाषाण आणि दोन्ही बाजूस त्रिशूल आहेत. पुढे एका लहान मंदिरात परिसरात सापडलेल्या वीरगळ, सतीशिळा व काही पाषाण आहेत. प्रांगणातील एका कक्षात कौल लावण्याचा पाषाण आहे. आयताकार उभ्या पाषाणाचा वरील भाग त्रिकोणी आहे. या पाषाणात वर्तूळ आहे व बाजूला असलेल्या लाडूच्या आकाराचे गोटे येथे चिकटवून पाहिले जातात. गोटा चिकटून राहिल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
चैत्र शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा असा आठ दिवस देवीचा जत्रोत्सव साजरा केला जातो. दहा दिवसांचा शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, किर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रासह गुजरातमधूनही हजारो भविक देवींच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. चैत्र पाडवा, दसरा दिवाळी, पौर्णिमा अमावस्या आदी दिवशी कुळाचार व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दूरवरून आलेल्या भाविकांसाठी येथे भक्तनिवासाची सुविधा आहे. गावातील अमरावती, उमरावती व देव नदीच्या त्रिवेणी संगमावर असलेले प्रसिद्ध विश्वेश्वर मंदिर हाकेच्या अंतरावर आहे.