दत्त मंदिर

भोवाळे, चौल, ता. अलिबाग, जि. रायगड

अलिबाग तालुक्यातील चौल या प्रसिद्ध गावाशेजारी असलेल्या भोवाळे येथील एका निसर्गरम्य टेकडीवर दत्त दिगंबराचे प्रसिद्ध स्थान आहे. समृद्ध वनराईतून बांधण्यात आलेल्या सुमारे ७५० पायऱ्या चढून या मंदिरापर्यंत पोहचता येते. मंदिर उंचावर असल्याने येथून खाली असलेल्या नारळी-पोफळीच्या बागा, हिरवेगार डोंगर, रेवदंड्याची खाडी आदी मनोहारी दृश्ये नजरेत सामावता येतात. रेवदंडा व चौल या शहरांचे विहंगम दृश्यही येथून टिपता येते. दत्तजयंतीनिमित्त येथे भरणारी पाच दिवसांची जत्रा ही जिल्ह्यातील मोठ्या जत्रांपैकी एक आहे.
चौल नाका ओलांडून पुढे आल्यावर भोवळे तलाव लागतो. या तलावाच्या बाजुला दत्तमंदिराकडे जाण्यासाठीचा मार्ग आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी पायथ्यापासून तीन मार्ग आहेत. पायरी मार्गाने गेल्यावर होणाऱ्या शारिरिक कष्टानंतर होणारे दत्तगुरूंचे दर्शन अधिक समर्पक ठरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की अठराव्या शतकात वेगवेगळ्या टप्प्यांवर हे मंदिर उभारले गेले आहे. स्वामी ब्रह्मेंद्र यांनी १८१० साली येथे लहानसे मंदिर बांधले होते. काही वर्षांनी तेथे एक दत्तभक्त राहण्यास आला. त्याच्याकडे श्रीदत्तांच्या पादुका होत्या. त्याने १८३१ साली या पादुकांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर तीन वर्षांनी काही दत्तभक्तांनी एकत्र येत कळस आणि प्रदक्षिणेचा मार्ग बांधला. १८४३ ते १८५२ या काळात मंदिरासमोरचा मंडप तसेच बाजुला पुजाऱ्यांना राहण्यासाठी घर उभे राहिले. मंदिर उंच डोंगरात असल्यामुळे चढून येणे त्रासाचे आणि धोकादायक होते. त्यामुळे १८५७च्या सुमारास नारायण खत्री या दत्तभक्ताने मंदिरात येण्यासाठी ७५० पायऱ्या बांधून घेतल्या. तोपर्यंत मंदिरात केवळ पादुकाच होत्या. पायऱ्या बांधल्या त्याच वर्षी काळ्या पाषाणात कोरलेल्या ‘तीन शिरे सहा हात’ असलेल्या दत्तगुरूंच्या सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९६३ साली मंदिराचा जीर्णोद्धार होऊन आज दिसत असलेले पक्के मंदिर उभे राहिले.
मंदिरात येण्यासाठीचा मुख्य मार्ग भोवाळे तलावाच्या बाजुने आहे. या मार्गावर असलेल्या कमानीतून पुढे आल्यावर पायरी मार्ग सुरू होतो. यापैकी पहिल्या पायरीवर उजव्या हाताला दत्ताच्या पादुका आहेत. ज्यांना वर जाऊन दर्शन घेणे शक्य नसेल, ते भक्त या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. वाटेत विश्रांती घेण्यासाठी व तहान भागविण्यासाठी पाणपोयी बांधलेल्या आहेत. मार्गावर उजव्या हाताला गोरखचिंचेचा भलामोठा प्राचीन वृक्ष आहे.

साधारणतः ५०० पायऱ्या चढल्यावर पहिला टप्पा पार होतो. येथे अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांचा मठ आहे. मठात स्वामींची मूर्ती आणि प्रतिमा आहे. येथपर्यंत येण्यासाठी वरंडे देवघरमार्गे घाटरस्ता आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांनी या टप्प्यापर्यंत येता येते. त्यामुळे पहिल्या ५०० पायऱ्यांचे श्रम टाळता येतात. स्वामी समर्थ मठाच्या बाजुला समाधी साधना कुटी, विश्रामासाठी खोल्या आहेत. काही पायऱ्या चढून आल्यानंतर उजव्या हाताला एक भग्नावस्थेतील दीपमाळ आहे. असे सांगितले जाते की सर्वांत पहिल्यांदा मंदिराबरोबर स्वामी ब्रह्मेंद्र यांनी ही दीपमाळ बांधली होती. येथेच डाव्या हाताला बुरांडे महाराजांची समाधी आहे. समाधीच्या बाजुला छोटे दत्तमंदिर आहे. यात मध्यभागी दत्तगुरूंची मूर्ती, उजवीकडे गणपतीची मूर्ती आणि डावीकडे शिवलिंगाचे दर्शन होते. आणखी काही पायऱ्या चढून आल्यानंतर हरेराम बाबा मठ, हरे राम धुनी मंदिर आणि साईबाबा मंदिर आहे. त्याच्या बाजुला मुख्य दत्तमंदिराची कमान आणि कमानीच्या बाजुला दीपस्तंभ आहे. येथून मंदिराचा घुमटाकार कळस दिसतो. बाजुलाच दत्तमंदिरात येण्यासाठी तिसरा रस्ता आहे. उत्तर दिशेला असलेल्या हिंगुलजा देवी मंदिराकडून पायवाटेने येथे येता येते. पायवाटेच्या दरीकडील बाजुला लोखंडाचे कठडे (रेलिंग) आहेत.
कामानीतून आत आल्यावर आठ-दहा पायऱ्या चढून मुख्य मंदिरात प्रवेश होतो. मंदिराच्या आटोपशीर सभामंडपात जुन्या काळातील मोठी पितळेची घंटा टांगलेली आहे. गर्भगृहात सहा हात असलेली त्रिमुखी दत्तात्रयाची काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती आणि ४०० वर्षांपूर्वीच्या पादुका आहेत. मूर्तीच्या मागे असलेली भिंत पाने, फुले, शुभचिन्हांचे नक्षीकाम असलेल्या धातूच्या पत्र्याने आच्छादित आहे. मूर्तीच्यावर पत्र्यावर ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा गुरूदत्त मंत्र कोरलेला आहे. दत्तमूर्तीच्या उजव्या बाजुला धातूची गणेशमूर्ती आहे. दत्तमंदिराच्या दक्षिणेकडे माई जानकीबाई आणि हनुमानदास यांचा मठ आहे. अनेक वर्षांपूर्वी या दोघांनी येथे राहून दत्तगुरूंची सेवा केल्याचे सांगितले जाते. मठात दोघांचे मातीचे पुतळे व शेजारी श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई, गणपतीची मूर्ती आणि शिवलिंग आहे. समोरच्या बाजुला ओटा आहे. त्यावर शेगावनिवासी गजानन महाराज, संत ज्ञानेश्वर, साईबाबा, संत तुकाराम आणि विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या पश्चिम दिशेला खाली पाहिले असता कुंडलिका नदी समुद्राला मिळते ती आग्रावची खाडी, साळावचा पूल, रेवदंडा, कोर्लई किल्ला आणि भोवाळे तलाव हा परिसर दिसतो. मंदिराचा संपूर्ण परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे व पावसाळ्यात हे सौंदर्य अधिकच खुलते.
प्रतिवर्षी येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त पाच दिवसांची जत्रा असते. या काळात हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात व सुखी संसारासाठी श्री दत्तगुरूंना प्रार्थना करतात. यात्रेच्या पहिल्या दिवशी जवळच असलेल्या चौल थेरोंडा येथून चांदीचा मुखवटा वाजत-गाजत, पालखीतून मंदिरात आणला जातो. पूजन करून तो दत्तमूर्तीला लावतात. जत्रेपूर्वी मंदिरात सात दिवस सप्ताह चालतो. इतर वेळीही मंदिरात भाविकांची दिवसभर गर्दी असते. मंदिर दिवसभर भाविकांना दर्शनासाठी खुले असते. हे मंदिर दत्तात्रेयांचे अत्यंत जागृत स्थान असून अनेक भक्त येथील दर्शनाने आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगतात. जत्राकाळात हजारो भाविक मंदिरात येऊन दर्शन घेतात. याखेरीज दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी येथे दत्तयाग केला जातो.

उपयुक्त माहिती:

  • अलिबागपासून १६ किमी व चौलपासून २ किमी अंतरावर
  • अलिबाग येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने पायथ्याशी असलेल्या मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home