महाराष्ट्रात खास दत्तभक्तीची परंपरा चालवणारा दत्तसंप्रदाय सुमारे सहाशे वर्षे नांदत आहे. हिंदूंच्या महानुभाव, नाथ, वारकरी तसेच समर्थ आदी संप्रदायांतही दत्तात्रेयाविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. पुराणे व अर्वाचीन पाच उपनिषदांतून दत्तास वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा राखणारा, गुरुतत्त्वाचा आदर्श आणि योगाचा उपदेशक म्हटले आहे. भुसावळ शहरातील दत्त गिरनारी मठ-मंदिरात दत्तात्रयाच्या एकमुखी व षट्भूजा मूर्तीची उपासना केली जाते. येथील विग्रहावर (अभिषेक मूर्ती) देवाची स्वयंभू चिन्हे आहेत असे सांगण्यात येते. भुसावळमधील दत्त उपासकांबरोबर विविध संप्रदायांतील भाविक येथे मोठ्या प्रमाणावर दर्शनास येतात.
महाराष्ट्रात दत्तात्रेयाची उपासना पुराणकाळापासून सुरू असली, तरी दत्तावतार श्रीनरसिंह सरस्वती यांच्यामुळे येथे दत्त संप्रदायाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार झाला. नरसिंह सरस्वती यांचा काळ हा इ.स. १३७८ ते १४५८ असा आहे. ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’ या रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनात्मक पुस्तकानुसार, इ.स. १५४८ (शके १४७०)च्या सुमारास सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या ‘गुरुचरित्रा’त दत्त हा त्रिमुखी स्वरूपात मानलेला आहे. संत एकनाथ (इ.स. १५२३ ते १५९९) यांनी रचलेल्या ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ती’या आरतीतही दत्त त्रिमुखी स्वरूपात आहे. सर्वसाधारणतः याच स्वरूपात दत्ताची पूजा केली जात असली, तरी अनेक ठिकाणी दत्त एकमुखी स्वरूपात पूजला जातो.
इतिहास काळातील पहिले दत्तभक्त चांगदेव राऊळ (इ.स. ११५० ते १२२०) यांचे उपास्यही एकमुखी दत्तात्रय होते. मात्र महान दत्तोपासक दासोपंत (इ.स. १५५१ ते १६१५) यांचे उपास्य एकमुखी आणि षड्भुज दत्तात्रेय होते. ‘स्वात्मप्रचीति’ व ‘साक्षात्कार’ या ग्रंथांचे कर्ते निरंजन रघुनाथ यांचे शिष्य झाशीचे नारायण महाराज जालवणकर (इ.स. १७९३ ते १८६८) यांना गिरनारवर दत्तसाक्षात्कार झाला होता. तेथील स्वयंभू दत्तमूर्ती एकमुख षड्भुज अशीच आहे. भुसावळ येथील या मठातील मूर्तीही एकमुख षड्भुज आहे.
मठातील प्रासादिक दत्तमूर्ती गिरनार पर्वतावरून आणण्यात आली आहे.
स्वामी ब्रह्मानंद यांचा जन्म १२ सप्टेंबर १९९१ साली झाला. या दिवशी गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, वल्लभ जयंती असे योग जुळून आले होते. लहानपणापासूनच स्वामी ब्रम्हानंद यांना अध्यात्माची आवड होती. प्रसिद्ध रामायण कथाकार व आध्यात्मिक सद्गुरू राजेश्वरानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मानंद महाराज घडले. या मंदिरात रोजची पूजेची व प्रासादिक अशा दोन दत्तमूर्ती आहेत. ब्रह्मानंद महाराज यांनी गिरनार पर्वतावरून नरसिंह जयंतीला आणलेली प्रासादिक दत्त मूर्ती नेहमीच्या दर्शनासाठी मठ-मंदिरात ठेवली जाऊ नये, अशी सूचना मुक्तानंदगिरी बापू या गिरनार पर्वताच्या महंतांनी दिली होती. त्यानुसार अक्षय्य तृतीया, गुरूपौर्णिमा, नरसिंह जयंती आणि दत्त जयंती अशा चार दिवशीच ही मूर्ती दर्शनार्थ ठेवली जाते व रोज गुप्तरूपाने तिची पूजा केली जाते. मठातील रोजची पूजेची व दर्शनासाठी प्रतिष्ठापित केलेली दत्तमूर्ती ही जयपूर येथून घडवून आणण्यात आली होती. १३ सप्टेंबर २०१८ रोजी श्रीपाद वल्लभ जयंती दिनी ब्राह्ममुहूर्तावर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
भुसावळनजीक, शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील समर्थ वसाहतीत, शांत जागेमध्ये हा दत्त गिरनारी मठ वसलेला आहे. मठासमोर शंकराचे एक छोटे मंदिर स्थित आहे. या मंदिरासमोर भव्य शेंदूरचर्चित दगडी नंदीमूर्ती आहे. गर्भगृहात चौकोनी संगमरवरी शाळुंकेत शिवलिंग विराजमान आहे. मठाचे बांधकाम आधुनिक पद्धतीचे व दुमजली आहे. या इमारतीत समोरील बाजूस मध्यभागी असलेल्या मुखमंडपासारख्या दुमजली भागावर, एकावर एक अशा तीन उतरत्या छपरांचे छत आहे. त्यावर चार स्तरीय कलश आहे. कमळ फुलात उभ्या असलेल्या मंदिर सेविकांची दोन भव्य चित्रे असलेल्या या भागाच्या दोन्ही बाजूंना व मुख्य इमारतीवर हनुमान आणि गरुडाची मोठी चित्रे रंगवलेली आहेत.
मंदिराच्या मुखमंडपात विजयी हनुमान आणि अष्टसिद्ध महाभैरवाच्या देवळ्या आहेत.
सभामंडप आणि गर्भगृह असे या मठ-मंदिराचे स्वरूप आहे. प्रशस्त सभामंडपाच्या भिंतींवर दत्ताची विविध मुद्रा आणि स्वरूपातील कृष्ण-धवल चित्रे लावलेली आहेत. त्याच प्रमाणे येथे कामेश्वरी, महात्रिपुरसुंदरी अंबा, दुर्गाअंबा, दत्तात्रेयनंद नाथ यांच्याबरोबर नाथांच्या, तसेच दत्त संप्रदायातील विविध संत-महात्मे व अवतारी पुरूष यांच्या प्रतिमा आहेत. संगमरवरी फरशा लावलेल्या मंदिराच्या गर्भगृहात मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर करण्यात आला आहे. आत कोरीव नक्षीकाम केलेल्या सुबक लाकडी मखरामध्ये दत्तगुरूंची एकमुखी व षट्भुजा असलेली लोभस संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात त्रिशूळ, गदा, कमंडलू आहेत. समोर स्फटिकाचे शिवलिंग व शाळीग्राम आहेत. रोज या मूर्तीस वेगळ्या प्रकारे त्या त्या सणांनुसार आणि दिनमाहात्म्याप्रमाणे सुंदर सजावट करण्यात येते. दत्तगुरूंच्या बाजूला डाव्या हाताला एका लाकडी देव्हाऱ्यात गणेशाची मूर्ती विराजमान आहे, तर उजव्या बाजूला करवीरनिवासिनी अंबाबाईची एका अधिष्ठानावर स्थापना करण्यात आली आहे.
या मठ-मंदिरात रोज पहाटे काकड आरती होते. नंतर सोवळ्यामध्ये महापूजा व नैवेद्यारती असते. येथे गुरूपौर्णिमा, नृसिंह जयंती, अक्षय तृतीया, दत्त जयंती हे चार सण मोठ्या स्वरूपात साजरे केले जातात. नवरात्रीमध्येही येथे मोठा उत्सव व जागरण असते. त्यावेळी दत्तमहाराजांना वेगवेगळ्या रूपात सजवले जाते. येथे दुपारी १ ते ४ ही वेळ वगळता पहाटेपासून रात्रीपर्यंत दत्तात्रेयांचे दर्शन घेता येते.