दंडपाणेश्वर मंदिर

नंदुरबार, ता. जि. नंदुरबार

गणनाम् त्वं गणपते हवामहेःंअसा ऋग्वेदात गणेशाचा प्रथम उल्लेख सापडतो. त्यानंतर ११व्या ते १४व्या शतकातील गणेश पुराण मुद्‌गल पुराणात गणपतीविषयी सखोल माहिती आहे. शंकराचार्यांनी गणपती गायत्री मंत्रातून गाणपत्ये पंथाचा अधिक प्रसार केल्यानंतर गणपतीची मंदिरे जागोजागी उभी राहिली, असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपती मंदिरे अधिक प्रसिद्ध आहेत. असेच एक प्राचीन प्रसिद्ध दंडपाणेश्वर गणपती मंदिर नंदुरबार शहरात आहे. येथील जागृत गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे

या गणपतीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे सांगितले जाते. याबाबत अख्यायिका अशी की सुरत येथील लुटीनंतर परतीच्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांसह येथील वनात मुक्काम केला होता. त्या मुक्कामात छत्रपतींनी येथे गणेश मूर्तीची स्थापना केली होती. पुढे येथील मंदिराचा वारंवार जीर्णोद्धार झाला. सन १९८२ मध्ये झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे

मंदिराच्या आवारभिंतीच्या आतील प्रांगणापर्यंत पक्का रस्ता आहे. प्रांगणासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. प्रांगणातून मंदिरापर्यंत जाण्यासाठीच्या पायवाटेवर दोन्ही बाजूला चौकोनी स्तंभ त्यावर सज्जा असलेली स्वागतकमान आहे. कमानीच्या दोन्ही स्तंभांवर पायाकडून वर कमळ फुलांच्या नक्षी, आदिवासी शैलीतील उठाव चित्रे, चक्र, गंगायमुना वर पुन्हा कमळ फुलांच्या नक्षी आहेत. कमानीच्या सज्जावर दोन्ही बाजूस सोंडेत माळ धरलेले गजराज मध्याभागी कमळाच्या फुलावर बसलेली लक्ष्मी, असे गजलक्ष्मी शिल्प आहे

मंदिरापर्यंत जाणाऱ्या पायवाटेच्या दोन्ही बाजूस कठडे पलिकडे उद्यान आहे. प्रांगणात जागोजागी आसनांची व्यवस्था आहे. मंदिरासमोर तुलसी वृंदावन आहे. चौकोनी नक्षीदार तुलसी वृंदावनाच्या शिर्षभागी पद्माकार कुंडी आहे. वृंदावनापुढे वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीपुढे लोखंडी कमानीला टांगलेली पितळी घंटा आहे. पुढे मंदिराचा खुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात प्रत्येकी पाच नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभपाद चौकोनी दोन थरांचे आहेत. स्तंभांचा खालील भाग चौकोनी कुंभासारखा आहे. त्यावर सोनेरी रंगाच्या पानाफुलांच्या नक्षी आहेत. स्तंभदंडावर त्रिशूलडमरू सारख्या नक्षी वरील भागात पाना फुलांच्या नक्षी रंगविलेल्या आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी, त्यावर तुळई तुळईवर छत आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहेत. सभामंडपातील बाह्य बाजूचे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत

सभामंडपाच्या पुढे अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी पायऱ्या आहेत. सभामंडपापेक्षा खाली असलेल्या अंतराळात पाच पायऱ्या उतरून प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या मधोमध चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला जाळीदार वातायने आहेत. प्रवेशद्वाराच्या सज्जावर शिवपिंडीची पुजा करणारा बालगणेश, नंदी दोन्ही बाजूस कलश आणि गजराज अशी शिल्पे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेल्या नागाची तांब्याची प्रतिमा त्यावर जलधारा धरलेले अभिषेक पात्र आहे

गर्भगृहात मागील भिंतीजवळील वज्रपिठावर दोन्ही बाजूस वामन स्तंभ त्यावर कमान असलेल्या मखरात गणेशाची शेंदूरचर्चित चतुर्भुज मूर्ती आहे. गणेशाच्या कानांना सोंडेला चांदीचे आच्छादन आणि डोक्यावर मुकूट आहे. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीवर वरील बाजूस अष्टविनायक मूर्ती खाली पानफुलांच्या नक्षी आहेत. मखरातील नक्षीदार स्तंभांवर पर्णलता, पुष्पलता नक्षी स्तंभावरील कणीवर गणेशाची मूर्ती आहे. स्तंभांवरील कमानीवर मध्यभागी कीर्तीमुख दोन्ही बाजूस पानाफुलांच्या नक्षी आहेत

सभामंडपाच्या छतावर चारही बाजूंनी बाशिंगी कठडा आहे. या कठड्यावर दर्शनी बाजूस मध्यभागी मेघडंबरीत गणेशाची मूर्ती आहे. मेघडंबरीवर द्रविड शैलीतील आडवे शिखर त्यावर कळस आहेत. कठड्याच्या चारही कोनांवर घुमटाकार लघुशिखरे त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर अकरा थरांचे षटकोनी शिखर आहे. त्यावरील देवकोष्टकांत विविध देवतांची शिल्पे आहेत. शिखरात शीर्षभागी स्तुपी, त्यावर कळस ध्वजपताका आहे. मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात वृक्ष वाटिका बालोद्यान आहे

मंदिरात गणेश जन्मोत्सव तसेच भाद्रपद मासातील दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. दहा दिवस भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. याशिवाय चैत्र पाडवा, महाशिवरात्री, दसरा, दिवाळी आदी सणही साजरे केले जातात. दर महिन्याची संकष्टी चतुर्थी, प्रत्येक मंगळवार, रविवार सोमवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात

उपयुक्त माहिती

  • नंदूरबार बसस्थानकापासून किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून नंदूरबारसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home