
प्राचीन काळी महामंडलेश्वर, तसेच मंगलवेष्टक या नावांनी ओळखले जाणारे मंगळवेढा हे एक धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. कलचुरी बिज्जलाची राजधानी असलेल्या या शहरास वारकरी संप्रदायात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. संत चोखामेळा, संत कान्होपात्रा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या ‘संतभूमी’ मध्ये विठ्ठलाचे परमभक्त असलेल्या दामाजीपंतांचे समाधी मंदिर आहे. मंगळवेढ्यात दामाजीपंतांना ग्रामदैवताचा मान दिला जातो. येथील दामाजीपंतांचा वाडा हे वारकऱ्यांचे आश्रयस्थान आहे. दिंड्या, भजनी मंडळी मंगळवेढ्यास राहून दामाजीपंतांच्या समाधीचे दर्शन घेऊन मगच पंढरपूरला जातात.
एखाद्या शासकीय अधिकाऱ्यास संतपदाचा दर्जा दिला जाणे, त्यांचे मंदिर उभारले जाणे आणि ते तालुक्याचे ग्रामदैवत असणे हे एक दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. संत दामाजीपंतांच्या कार्यामुळे आणि दिव्य भक्तीमुळे त्यांच्या नावास अमरत्व प्राप्त झाले. मंगळवेढा हे त्यांचे जन्मगाव. बीदर येथे राजधानी
असलेल्या बहामनी सुलतानांच्या पदरी ते मंगळवेढ्याचे कमावीसदार म्हणजे करवसुली अधिकारी म्हणून कार्यरत होते. सुलतान अल्लाउद्दिन शाह बहामनी हा नुकताच सत्तेवर आला असताना, इ.स. १४६०मध्ये संपूर्ण दक्षिण प्रांतात महादुष्काळ पडला. त्यावेळी दामाजीपंतांनी केलेल्या कार्याच्या कहाणीचे वर्णन ‘भक्तविजय’ या ग्रंथामध्ये केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चारच वर्षांनी रचण्यात आलेल्या या ग्रंथाचे कर्ते महिपती कांबळे तथा ताहराबादकर हे थोर संतकवी होत.
भक्तविजयच्या ४०व्या अध्यायातील दामाजीपंतांच्या कथेनुसार, हा अत्यंत तीव्र असा दुष्काळ होता. एवढा की ‘तेणें जीवजंतु समस्त। क्षुधेनें मरत उपवासीं।।’ लोकांना अन्न मिळत नसे, तर कित्येक जण होन गिळून प्राणत्याग करीत असत. (मुखामाजी घालोनि होन। प्राणी पावती मृत्युसदन।।) अशा काळात बादशहाची दोन अन्नकोठारे दामाजीपंतांच्या अखत्यारित होती. ती खुली करून लोकांना धान्य वाटले व हे सुलतानास समजले तर तो संतापून आपले प्राण घेईल, अशी भीती त्यांना होती. (‘रायासी कळतां वर्तमान। तरी कोपोन घेईल माझा प्राण।’) परंतु तेव्हा त्यांनी विचार केला की ‘एका जीवासी येतां मरण। क्षेत्रीचे ब्राह्मण वांचतील।।’ – आपल्या एकट्याचा जीव जाईल, परंतु त्यामुळे मंगळवेढा, पंढरपूर आदी क्षेत्रांतील ब्राह्मण तरी वाचतील. असे म्हणून त्यांनी प्रथम ब्राह्मणांसाठी आणि नंतर सर्वच जातीच्या लोकांसाठी धान्याची दोन्ही कोठारे खुली केली.
महिपतीच्या कथेनुसार, मंगळवेढ्यात मुजूमदार असलेल्या एका कानडी ब्राह्मणाने याची चुगली सुलतानाकडे केली. तेव्हा सुलतानाने संतापून दामाजीपंतांना पकडून आणण्यासाठी शिपाई पाठवले. आपले मरण जवळ आल्याचे पाहून दामाजीपंतांनी पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यावेळी विठ्ठल विठू महाराचे रूप घेऊन बीदरला बादशहाच्या दरबारात गेला व ते धान्य दामाजीपंतांनी वाटले नाही, तर विकले असे सांगितले. तेव्हा
सुलतानाने ‘अडुसष्ट सहस्त्र एक लक्षासी। गणती द्रव्यासी पाहिजे’ म्हणजे एक लाख ६८ हजार होन एवढ्या रकमेचे ते धान्य होते असे सांगितले. त्यावर विठू महाराच्या रूपातील विठ्ठलाने तेवढी रक्कम सुलतानास दिली व अशा प्रकारे दामाजीपंतांवरील संकट टळले.
नंतर सुलतानाचे सैनिक दामाजीपंतांना घेऊन दरबारात हजर झाले. तुमचे पैसे विठू महाराने पोचते केले असे सुलतानाने सांगितल्यावर दामाजीपंतांना आश्चर्य वाटले. प्रत्यक्ष पंढरीच्या पांडूरंगानेच विठू महाराचे रूप घेऊन आपल्यावर कृपा केल्याची खात्री दामाजीपंतांना पटली. त्यानंतर त्यांनी बादशहाची नोकरी सोडून उर्वरित आयुष्य पांडुरंगाच्या सेवेसाठी वाहून घेतले. आज मंगळवेढा तालुक्याची ओळख दामाजीपंतांची नगरी अशीही आहे.
दामाजीपंतांच्या मृत्यूनंतर मंगळवेढ्यात त्यांची छोटीशी समाधी बांधण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी त्या ठिकाणी एक छोटे मंदिर बांधून तेथे दामाजीपंत आणि विठ्ठल–रखुमाई यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. पुढे १९४४ मध्ये मंगळवेढा येथे दामाजीपंतांच्या नावाने एक संस्था स्थापन करण्यात आली. त्या संस्थेमार्फत देणग्या मिळवून भव्य समाधी मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. जसजशा देणग्या मिळत गेल्या तसतसे बांधकाम होत गेले.
मंगळवेढे–पंढरपूर या मार्गालगत दामाजीपंत समाधी मंदिर आहे. खुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील खुला सभामंडप हा मुख्य मंदिरासमोर नंतरच्या काळात बांधल्याचे जाणवते. मुळ मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या वज्रपिठावर संत दामाजीपंत यांच्या पादुका व त्यामागे त्यांची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. त्यांच्या मूर्तीच्या मागे विठ्ठल–रुख्णिणीच्या मूर्ती आहेत.
या मंदिरामध्ये अखंड विणावादन होते व नंदादिप तेवत असतो. राज्यात अखंड विणावादन होणारी काही मोजकी मंदिरे आहेत, त्यात या मंदिराचा समावेश होतो. याशिवाय दररोज सकाळी काकड आरती. दामाजी आख्यानाचे वाचन, सायंकाळी धुपारती, गुरूवारी भजन, एकादशीला गीता पारायण व हरिजागर असे कार्यक्रम होतात. गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, रामनवमी, हनुमान जयंती, गीता जयंती, तुकाराम बीज, एकनाथ षष्ठी आदी उत्सवही साजरे केले जातात.
मंदिर परिसरात देवस्थानतर्फे भाविकांसाठी भक्तनिवास उभारण्यात आलेले आहे. याशिवाय दररोज मंदिरातर्फे भाविकांना महाप्रसाद दिला जातो.