दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

बुधवार पेठ, पुणे

पुण्यातील गणपती म्हटले की, डोळ्यांसमोर श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे नाव आल्याशिवाय राहत नाही. नवसाला पावणारा हा गणपती पुण्यातील सर्वांत श्रीमंत आणि उदार म्हणूनही ओळखला जातो.

येथील बुधवार पेठेत १८९२ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची स्थापना झाली. या मंदिराची कथा सर्वसामान्य आई-वडिलांच्या काळजाला भिडणारी आहे. त्या काळातील श्रीमंत प्रस्थ व मिठाईचे मोठे व्यापारी म्हणून ओळखले जाणारे दगडूशेठ हलवाई व्यापारात जेवढे यशस्वी तेवढेच शीलवान, धार्मिक व दानशूर म्हणूनही प्रसिद्ध होते. श्री. हलवाई यांची जनमानसातील ही प्रतिमा लक्षात घेऊन ब्रिटिशांनीही त्यांना ‘नगरशेठ’ पुरस्काराने सन्मानित केले होते. दुर्दैवाने १८९२ मधील प्लेगच्या साथीत त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाला. दगडूशेठ आणि लक्ष्मी या दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुःखावेगात त्यांच्या मनात विरक्तीची भावना घर करू लागली. गुरू माधवनाथ महाराज यांनी धीर दिल्यानंतर दोघेही या घटनेतून काहीसे सावरले. माधवनाथ महाराजांनी दगडूशेठना सांगितले, ‘‘तू दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्यांची पूजा कर. ही दैवतं तुझी कीर्ती वाढवतील.’’

माधवनाथ महाराजांनी सांगितल्यानुसार दगडूशेठ हलवाईंनी दत्ताची संगमरवरी मूर्ती आणि मातीची गणपतीची मूर्ती बनवून घेतली. आता जेथे मंदिर आहे तेथेच गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पाहता पाहता दगडूशेठ हलवाई म्हणूनच या गणपतीची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या काळापासून मंदिरात सुरू झालेली भाविकांची रीघ दिवसेंदिवस वाढतच गेली. सध्या मंदिराला दरवर्षी भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लाखांमध्ये आहे.

असे म्हटले जाते की, या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली. त्यावेळी बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, दगडूशेठ यांचे भाऊ मोरप्पाशेठ गाडवे ऊर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले ऊर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठुजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसारखे अनेक नामवंत उपस्थित होते. दगडूशेठ हलवाई यांना मानणारा पुण्यात मोठा वर्ग होता. त्यामुळे त्यांनी बांधलेल्या या मंदिराची प्रसिद्धी शहरासह महाराष्ट्रभर झाली. डाव्या सोंडेच्या लोभस गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रोजच गर्दी होऊ लागली. मंदिर वर्दळीच्या ठिकाणी असल्याने गर्दीत आणखीनच भर पडली. त्या काळी हा गणपती ‘बाहुलीच्या हौदाचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध होता.

तो काळ ब्रिटिशांच्या विरोधातील लढा तीव्र करण्याचा होता. लोकमान्य टिळक नेतृत्वासाठी पुढे होते. जनक्षोभाचा धोका ओळखून ब्रिटिशांनी राजकीय कार्यक्रमांना जमावबंदीचे आदेश काढले होते; धार्मिक कार्यक्रमांना मात्र मुभा होती. साहजिकच स्वातंत्र्यलढ्याच्या जनजागृतीसाठी लोक एकत्र यावेत, या भावनेतून टिळकांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. त्यापूर्वी १८९३ मध्येच भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता; पण त्याला भव्य स्वरूप आले ते टिळकांच्या आवाहनानंतरच. कारण १८९६ मध्ये श्री. दगडूशेठ यांनीही मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.‌ त्या वर्षी नवीन गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली.‌

श्रीमंत‌ दगडूशेठ हलवाई यांनी तेव्हा सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आजही त्याच उत्साहात येथे सुरू आहे. श्री. दगडूशेठ यांच्या निधनानंतर सुवर्णयुग तरुण मंडळाने या गणेशोत्सवाची जबाबदारी घेतली. १८९६ मध्ये प्रतिष्ठापित केलेली मूर्ती जीर्ण झाल्यानंतर अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून १९६८ मध्ये नवी मूर्ती तयार करण्यात आली. कर्नाटकचे प्रसिद्ध मूर्तिकार श्री. शिल्पी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. मूर्ती तयार करताना ग्रहणकाळ आल्याने श्री. शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. गणेशयंत्राची पूजा केली आणि विधिवत गणेश याग केला. त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र गणपती मूर्तीच्या पोटामध्ये ठेवले गेले. ही मूर्ती बनविण्यासाठी त्यावेळी एक हजार १२५ रुपयांचा खर्च आल्याची नोंद आहे.

विविध शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक लोकोपयोगी उपक्रमांना सढळ हस्ते मदत करण्याबाबतही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट प्रसिद्ध आहे. विविध सण व दिनांचे औचित्य साधून, येथे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. भाविकांना या मंदिरात बुधवार ते सोमवार सकाळी ५ ते रात्री १०.३० आणि मंगळवारी सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत गणपतीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • शनिवारवाड्यापासून पायी १० मिनिटांवर
  • मंदिराशेजारी असलेल्या महापालिकेच्या पार्किंगमध्ये
  • खासगी वाहने ठेवण्याची व्यवस्था
  • पुण्याच्या अनेक भागांतून येथे येण्यासाठी पीएमपीएमएल बसची सुविधा
Back To Home