हिंदू धर्मात दत्त संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दत्त संप्रदायात गुरुशिष्य परंपरेची प्रथा आजतागायत सुरू आहे. दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्रीपाद वल्लभ व त्यानंतर तिसरे अवतार गाणगापूर येथील नृसिंह सरस्वती. हेच अक्कलकोट येथे प्रकटले असल्याने ते दत्तात्रेयाचे चौथे व पूर्ण अवतार समजले जातात. चोळप्पा हे स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त होते. अक्कलकोट येथे आल्यानंतर स्वामी अनेक वर्षे चोळप्पाच्या वाड्यात राहिले. त्यांनी हाताळलेल्या अनेक वस्तू येथे असल्याने आजही येथे स्वामींचे अस्तीत्व जाणवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
चोळप्पा मंदिर हा त्यांचा वाडा आहे व तो एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बांधला गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. स्वामी समर्थ या वाड्यात १८५७ साली आले. समर्थ अक्कलकोट येथे आल्यावर सुरूवातीचे तीन दिवस ते खंडोबा मंदिरात राहिले. येथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना हटकले व कुठे जाणार असे विचारले तेव्हा ‘मेरा चोला मुझे लेने आयेगा’ असे उत्तर स्वामींच्या तोंडून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी चोळप्पा स्वामींना आपल्या घरी घेऊन आले. शिष्याला आपल्या जन्मोजन्मीच्या गुरुंची ओळख पटली. पुढे आयुष्यभर ते स्वामी सेवा करू लागले. स्वामींनी सन १८७८ साली याच वाड्यात समाधीही घेतली. आज या वाड्यास मंदिराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. दररोज हजारो भाविक स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी व त्यांनी वापरलेल्या वस्तू पाहण्यासाठी येथे येतात.
अक्कलकोट बस स्थानकापासून जवळच चोळप्पांचा वाडा आहे. वाड्यातील समाधी मंदिरास जिर्णोद्धारानंतर आधुनिक स्वरूप आलेले आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत गोपुर रचनेचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे व आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर द्रविडी शैलीतील चौकोनी शिखर आहे. या शिखरावर अनेक देवी देवतांची शिल्पे, शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे. प्रवेशद्वारातून पुढे प्रांगण व समाधी मंदिर आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंच असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर पाच पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर चोळप्पांचे शिल्प आहे. खुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी पाच चौकोनी लाकडी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. छताला मोठे झुंबर व पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर चोळप्पा महाराजांच्या चित्राची मोठी तसबीर आहे. याशिवाय स्वामी समर्थ चरित्रातील काही प्रसंगांच्या प्रतिमा आहेत. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ व त्यांवर तोरण आहे. अंतराळात डाव्या बाजूला लाकडी मखरात चोळप्पा महाराजांची पितळी मूर्ती आहे. पुढे रजतपटल आच्छादित गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावरील तोरणात मध्यभागी सात फण्यांच्या नागाचे शिल्प व बाजूला श्रीदत्तात्रेय, श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ यांच्या तसबिरी आहेत. तोरणाखाली नागथर आहे.
गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर स्वामी समर्थांच्या समाधीचा पिरॅमिड आकारातील पाषाणी चौथरा आहे. चौथऱ्यावर रजतपटल आच्छादन आहे व वर स्वामी समर्थांचा चांदीचा मुखवटा आहे. स्वामींच्या कानात मकर कुंडले व डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. समाधी व त्यावरील मुखवट्यावर विविध वस्त्रे व अलंकार आहेत. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावर समर्थांच्या पादुका व भिंतीतील देवकोष्टकात मुखवटे आहेत. गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील चौकोनी शिखर आहे. शिखरात विविध देवी देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे.
समाधी मंदिराच्या बाजूला असलेल्या औदुंबर वृक्षाजवळ स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. येथे दत्त मंदिर, शनी मंदिर व विठ्ठल-रखुमाई ही मंदिरे आहेत. येथेच बाजूला चोळप्पा महाराजांच्या वाड्याचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आणि आत तटबंदीवर जाणारा पायरी मार्ग आहे.
चौसोपी वाड्यात डाव्या बाजूला मखरात मंदार गणेश मूर्ती आहे.
याबाबत अख्यायिका अशी की पूर्वी हे स्वामींचे न्हाणीघर होते. स्वामी समर्थ समाधिस्त झाल्यानंतर एकविसाव्या दिवशी येथे मंदार वृक्ष उगवला व भरभर वाढू लागला. २१ वर्षानंतर १९६६ साली त्या वृक्षाच्या खोडात गणपतीची मूर्ती प्रकट झाली. तोच हा मंदार गणेश होय. येथेच चांदीचा राजदंड आहे. हा राजदंड बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी स्वामींना दिला होता. बाजूच्या कक्षात मोठा पितळी हंडा आहे. स्वामी तो स्नानासाठी वापरीत. या कक्षाच्या बाजूला समर्थांचा भंडारखाना आहे. येथे भाविकांसाठी महाप्रसाद शिजवण्यात येतो. भंडारखान्याच्या बाजूला स्वामींच्या कपिला गाईची समाधी आहे. बाजूलाच बीड येथील स्वामींचे भक्त नानासाहेब देशपांडे यांची समाधी आहे. वाड्यात कुशावर्त तीर्थ नावाची विहीर आहे. असे सांगितले जाते की पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने चोळप्पा यांनीच येथे ही विहीर खोदून घेतली होती. परंतू विहिरीस पाणी लागले नाही. चोळप्पाना दुःख झालेले पाहून स्वामींनी विहिरीत लघुशंका केली व विहिरीस झरे फुटून ती पाण्याने तुडुंब भरली. समाधीच्या पूजेसाठी सुरवातीपासून याच विहिरीतून पाणी वापरले जाते. येथील एका कक्षात स्वामींचे मुस्लिम भक्त महमद रसूल यांनी महाराजांना दिलेली कफनी व रुद्राक्ष माळा आहेत. येथेच स्वामींच्या नित्य वापरातील रक्तचंदनाच्या पादुका आहेत. या कक्षाच्या बाजूला समर्थांचे शेजघर आहे. शेजघरात स्वामींनी वापरलेला पलंग व गादी आहे. त्यावर स्वामींच्या वापरातील इतर वस्तू ठेवलेल्या आहेत. बाजूला स्वामींचा चिलीम आहे.
चैत्र शुद्ध द्वितीयेला समाधी मठात स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जातो. चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामींची पुण्यतिथी साजरी केली जाते. आषाढ पौर्णिमा हा गुरु पौर्णिमा व मार्गशीर्ष पौर्णिमा हा दत्त जयंतीचा उत्सव मठात उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी लाखो स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत स्वामींच्या दर्शनासाठी येतात. मठात भजन, कीर्तन, ग्रंथ पठण, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.