चिंतामणी मंदिर

(अष्टविनायक क्षेत्र) थेऊर, ता. हवेली, जि. पुणे


थेऊरचा चिंतामणी, अष्टविनायक क्षेत्रातील पाचवा गणपती.‌ चिंता दूर करून चित्त स्थिर करणारे हे उपासनास्थान भाविकांना अतिशय प्रिय आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर याच ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवानेही चित्त स्थिर करण्यासाठी आराधना केली होती. म्हणून या गावाला थेऊर नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते.

येथील गणपतीच्या स्वरूपाची आख्यायिका अशी की असुरकुलातील राजा अभिजित आणि राणी गुणवती यांचा पुत्र गणासुर एकदा कपिलमुनींच्या आश्रमात आला. मुनींनी त्याचे आदरातिथ्य केले आणि भोजनाचा आग्रह केला. ते अद्‌भुत भोजन ग्रहण करून गणासुर आनंदित झाला. त्याने हे भोजन कोण आणि कसे करतो याविषयी विचारले असता त्याला समजले की कपिलमुनींकडे इच्छापूर्ती करणारा चिंतामणी नावाचा रत्नमणी आहे आणि त्याची प्रार्थना केल्यावर हवे ते प्रत्यक्ष समोर प्रकटते.

स्वादिष्ट भोजनामागची ही चमत्कारिक माहिती ऐकून गणासुराला लोभ अनावर झाला. त्याने कपिलमुनींकडे तो चिंतामणी मागितला. कोणतीही चिंता दूर करणारा हा रत्नमणी कपिलमुनी स्वतःकडे अतिशय जपून ठेवत असत. त्यामुळे गणासुराची ती मागणी त्यांनी अमान्य केली. तेव्हा गणासुराने जबरदस्तीने तो रत्नमणी ताब्यात घेऊन तेथून पळ काढला. या प्रकाराने उद्विग्न झालेल्या कपिलमुनींनी गणपतीची आराधना करून आता तूच ही चिंता दूर कर, असे आर्जव केले. तेव्हा गणपतीने पृथ्वीतलावर येऊन गणासुराचा वध केला आणि चिंतामणी पुन्हा कपिलमुनींच्या हाती सोपवला. कपिलमुनींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गणपतीने त्यांची चिंता कायमची दूर केली होती. त्यामुळे त्यांनी गणपतीचे पाय धरले आणि तो चिंतामणी त्याच्याच गळ्यात घातला. तोच हा थेऊरचा चिंतामणी विनायक.

गणपतीचे हे मंदिर चिंचवड संस्थानचे धरानिधर महाराज देव यांनी सर्वप्रथम बांधल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर १०० वर्षांनंतर पेशव्यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला. या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे लाकडाचे आहे. त्या काळी हे मंदिर बांधायला ४० हजार रुपये खर्च झाल्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे लाकडी बांधकाम असूनही शेकडो वर्षे होऊनही हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.

पेशव्यांची या स्थानावर खूप श्रद्धा होती. पेशवे या स्थानाला कुलदैवत मानत. त्यांनी या देवस्थानी राहण्यासाठी एक भव्य वाडाच बांधला होता. माधवराव पेशव्यांना वयाच्या अवघ्या सत्ताविशीत क्षयरोगाची व्याधी जडल्याचे निदान झाले. त्यामुळे मराठा साम्राज्याला धक्काच बसला. तेव्हा माधवराव निवासासाठी थेऊरच्याच वाड्यात येऊन राहिले. या गणपतीसमोरच माधवरावांनी अखेरचा श्वास घेतला. अखंड सेवा करणारी त्यांची पत्‍नी रमाबाई यांनीही सती व्रत स्वीकारले. त्यांच्या स्मृतीसाठी येथे पेशवे काळात मंदिरालगत नदीकाठी सतीचे वृंदावन नावाने मोठी बाग तयार करण्यात आली. तेथेच त्यांची समाधीही आहे.

मंदिराचे महाद्वार अर्थात मुख्य द्वार उत्तर दिशेला आहे आणि त्यासमोर मुळा-मुठा नदीचा संगम आहे. येथून आत प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवार आहे. येथे एक छोटे शिव मंदिर आणि एक मोठी पितळी घंटाही आहे. असे सांगितले जाते की, युरोपियनांकडून चिमाजी आप्पा यांना पितळेच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक पालीच्या गणपती मंदिरात आणि दुसरी येथे आहे. येथे आवारातच प्राचीन शमी व मंदार वृक्षही आहेत. सोन्याचा मुलामा दिलेल्या कळसामुळे मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलते. मंदिराभोवतालच्या भिंतीलगत ओवऱ्या आहेत. येथे सध्या माधवरावांचे स्मारक उभारण्यात आले आहे आणि त्यांच्या जीवनावर आधारलेल्या चित्रकृती आहेत. मंदिराच्या सभामंडपात यज्ञकुंड आहे. पुढे गाभाऱ्यात डाव्या सोंडेची, आसनस्थ स्वयंभू गणेशमूर्ती आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीचे डोळे सदासर्वकाळ चमकतात. कारण दोन्ही डोळ्यांमध्ये लाल मणी व हिरे आहेत.

मंदिरात भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघी चतुर्थी साजरी होते. यावेळी द्वारयात्रा आयोजित केली जाते. याशिवाय संकष्टी चतुर्थी व अंगारकीला येथे भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. तसेच माधवराव आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात कार्तिक महिन्यात रमा-माधव पुण्योत्सव आयोजित करण्यात येतो. सध्या चिंचवडचे मोरया गोस्वामी संस्थान या मंदिराचे व्यवस्थापन पाहते. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. मंदिरात दररोज चौघडावादन होते. भाविकांना मंदिरातील गणपतीचे सकाळी ६ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते रात्री १० या वेळेत दर्शन करता येते. येथे अल्प दरात भक्त निवास व प्रसादाची सुविधा आहे.

देवस्थानातर्फे मंदिर परिसरात गणेशाच्या प्रतिकृतींचे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्यात अनेक दुर्मीळ चित्र व मूर्ती आहेत. त्यामध्ये निरनिराळे धातू, सुपारी व तांदूळ यांपासून बनविलेल्या मूर्ती पाहण्यासारख्या आहेत.

उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून ३० किमी अंतरावर
  • स्वारगेटपासून प्रत्येकी अर्ध्या तासाने येथे येण्यासाठी पीएमपीएमएल बस उपलब्ध
  • मंदिर समितीतर्फे भक्त निवास व प्रसादाची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या पार्किंगपर्यंत येण्याची व्यवस्था
Back To Home