महाराष्ट्रातील २१ प्रसिद्ध गणेश क्षेत्रांपैकी एक असलेले आणि विदर्भातील अष्टविनायकांत स्थान असलेले कळंब येथील चिंतामणी गणेश मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. साडेचार फूट उंचीची ही भव्य गणेशमूर्ती ३३ फूट खोल गाभाऱ्यात स्थित आहे. मुद्गलपुराण आणि गणेशपुराणांतील उल्लेखानुसार येथील चिंतामणी गणेशाची मूर्ती इंद्रदेवाने स्थापन केलेली आहे. असे सांगितले जाते की गणेशमूर्तीच्या समोरील कुंडातून दर बारा वर्षांनी गंगा अवतीर्ण होऊन मंदिराचा गाभारा पाण्याने भरतो व गणेशमूर्तीच्या पायांना या पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर ते पुन्हा खाली जाते.
मंदिराची आख्यायिका अशी की गौतम ऋषींच्या पत्नीसोबत व्यभिचार केल्यामुळे ऋषींनी इंद्राला शाप दिला होता. त्यामुळे इंद्राच्या शरीरावर एक हजार योनी उत्पन्न झाल्या. त्यामुळे भयभीत झालेला इंद्र कमळाच्या देठात लपून बसला. हे समजल्यावर सर्व देवांनी गौतम ऋषींकडे येऊन इंद्राला क्षमा करण्याची विनंती केली. क्रोधात असलेल्या गौतम ऋषींनी कपटी व अविचारी इंद्राला क्षमा मिळणार नाही, असे देवांना निक्षून सांगितले परंतु देवांच्या कळकळीच्या विनंतीमुळे, इंद्राने गजाननाची तपश्चर्या केल्यास त्याचा उद्धार होईल, असेही सांगितले. त्यानुसार बृहस्पतींनी इंद्राला कमळाच्या देठातून बाहेर काढले व त्याला येथील चिंतामणीच्या सरोवरात स्नान करण्यास सांगितले. या सरोवरात स्नान केल्यानंतर त्याच्या शरीरावरील योनींच्या जागी डोळे दिसू लागले.
एक हजार वर्षे तपश्चर्या केल्यानंतर श्रीगणेश प्रकट झाले आणि त्यांनी येथे एक कुंड तयार केले. या कुंडातील पाण्याने स्नान केल्यानंतर इंद्राचे शरीर पूर्ववत झाले. त्यानंतर इंद्राने येथे गणेशाची स्थापना केली आणि गणेशाच्या अभिषेकासाठी स्वर्गातून गंगेला पाचारण करून तिला आदेश दिला की दर १२ वर्षांनी तिने पृथ्वीवर येऊन गणेशाच्या पायाला स्पर्श करावा. इंद्राने स्थापना केलेली मूर्ती हीच आजची चिंतामणी गणेशाची मूर्ती होय. ही मूर्ती कदंब वृक्षाखाली असल्याने या गावाला कदंबवरून कळंब असे नाव पडले. १९१८ पासून असलेल्या नोंदींनुसार १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३, १९९५ ला अशा प्रकारे येथे गंगा अवतीर्ण झाली होती व गाभाऱ्यातील श्रीचरणांना स्पर्श झाल्यानंतर येथील पाणी ओसरले होते. या कुंडाच्या पाण्याने स्नान केल्यानंतर पापक्षालन होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
यवतमाळ–नागपूर महामार्गावर कळंब या तालुक्याच्या ठिकाणी चिंतामणी गणेशाचे प्राचीन मंदिर आहे. कळंब (जुने नाव कदंब) येथे पूर्वी गोंड राजाची सत्ता होती. असे सांगण्यात येते की या मंदिराच्या जागी फार पूर्वी एक सरोवर होते व त्याच स्थानावर हे मंदिर बनविण्यात आले आहे. या मंदिराला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर चारमुख असलेली व अखंड दगडात कोरलेली गणेशमूर्ती आहे. या मंदिराची बांधणी साधी असून त्यावर विशेष कलाकुसर दिसत नाही. दक्षिणमुखी असलेल्या या मंदिरात पोहचण्यासाठी तीन मार्ग आहेत. येथील मंदिराच्या सभामंडपातून चिरेबंदी दगडाच्या २९ पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर एक अष्टकोनी कुंड आहे आणि त्यासमोर असलेल्या गर्भगृहात श्री चिंतामणी गणेशाची मोठी मूर्ती आहे.
माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुद्ध षष्टीपर्यंत दरवर्षी येथे यात्रा भरते. पूर्वी या काळात येथे केवळ धार्मिक उत्सव साजरा करण्यात येत असे; परंतु येथील यात्रेची सुरुवात १९७७ पासून झाली. ही यात्रा सुरू करण्याचे श्रेय कळंबचे तत्कालीन सरपंच फिरोझउद्दीन काझी यांना जाते. तेव्हापासून या यात्रेची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. या उत्सवामाध्ये पहिल्या दिवशी म्हणजेच माघ शुद्ध प्रतिपदेला कलशस्थापना केल्यानंतर जन्मोत्सवाला प्रारंभ होतो. गणेशपुराणाचे वाचनही पहिल्या दिवसापासून केले जाते. माघ शुद्ध तृतीयेपर्यंत रोज प्रवचन, कीर्तन आणि हरिपाठ होतात. चतुर्थीला दुपारी १२ वाजता चिंतामणी गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यादिवशी गणेशपुराण वाचनाची समाप्ती होते. पंचमीला महाप्रसाद होतो. षष्टीला गोपालकाला, कीर्तन, दहीहंडी असे कार्यक्रम असतात. या दिवशी लेझीम पथके व भजनी मंडळे यांच्यासह चिंतामणी गणेशाची मिरवणूक निघते. या मिरवणुकीत मुस्लिमधर्मीय भाविकांचाही सहभाग असतो. दर वर्षीच्या या उत्सवकाळात परिसरातील गावांमधून १२५ ते १५० दिंड्या येथे येतात.
याशिवाय भाद्रपदातील गणेश चतुर्थीलाही येथे उत्सव सुरू होतो, तो अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. प्रत्येक संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे महापूजा होतात. दररोज सकाळी व सायंकाळी गणेशाची महाआरती होते. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत येथे येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत भाविकांना येथील चिंतामणी गणेशाचे दर्शन घेता येते.
चिंतामणी मंदिराशिवाय कळंब हे गाव पूर्वी मोठे धर्मस्थळ असावे, हे सिद्ध करणारे अनेक पुरावे अभ्यासकांना मिळाले आहेत. याशिवाय ऐतिहासिकदृष्ट्याही कळंबचे महत्त्व आहे. प्राचीन काळापासून ‘१४ चावड्या व ३२ महालां’चे गाव म्हणूनही ते परिचित आहे. या कळंबमध्येच महर्षी गृत्समद ऋषींनी कापसाचा शोध लावल्याचा उल्लेख काही पौराणिक कथांमध्ये आहे. आचार्य विनोबा भावे यांनीही आपल्या लिखाणात त्यांचा उल्लेख ‘आद्य कापूस संशोधक’ असा केला आहे. औरंगजेबाच्या राजवटीमध्ये या परिसरावर चांदबिबीची सत्ता होती. १८४९ मध्ये नागपूरकर भोसले यांनी कळंब परिसरातील दरी–खोऱ्यांच्या आधाराने इंग्रजांना जेरीस आणल्याच्याही नोंदी आहेत. असे सांगितले जाते की क्रांतिकारक राजगुरू काही काळ भूमिगत होते, तेव्हा त्यांनी चिंतामणी गणेश मंदिरात यवतमाळ जिल्ह्यातील क्रांतिकारक युवकांची गुप्त बैठक घेतली होती.