
‘गणपतीचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेले पेण हे असे गाव आहे जेथे गणेशोत्सवाचे १०–१२ दिवस सोडले, तर वर्षभर गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. शाडूच्या सुबक मूर्ती आणि आकर्षक रंगसंगतीमुळे येथे तयार होणाऱ्या मूर्तींना देश–विदेशांतून मागणी असते. या परिसरात ‘जेथे जावे तेथे’ या मूर्तीरूपी गणेशाचे दर्शन होते. गणेशाचे असे ठायीठायी दर्शन घडविणाऱ्या या गावात गणेशाचे एक देखणे व प्रसिद्ध मंदिर आहे. त्यातील गणेशाचे नाव आहे चिमण गणपती.
पेणमधील गणेशमूर्तींना जगभरातून मागणी असली तरी येथे मूर्ती बनविण्याची सुरुवात नेमकी कधी व कशी झाली याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. असे सांगितले जाते की सुमारे १५० वर्षांपूर्वी येथे जोशी, टिळक आणि परांजपे असे वतनदार राहात होते. विजापूरहून आलेले अनेक कारागीर त्यांच्याकडे काम करीत असत. आपले नेहमीचे कामकाज आटोपल्यावर हे कारागीर फावल्या वेळी मातीची खेळणी, भांडी आणि मूर्ती बनवत असत. त्यांनी बनविलेल्या या वस्तूंना येथे चांगली मागणी होती. कोकणात जाणारे चाकरमानी फार पूर्वीपासून येथून या वस्तू व मूर्ती घेऊन जात असत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर येथे तयार होणारी मातीची खेळणी आणि भांडी हळूहळू बंद होत गेली व गणेशमूर्ती बनवण्याची कला नावारूपास आली. येथे उपलब्ध असलेल्या मातीतून सुबक गणेशमूर्ती तयार होऊ लागल्या. या कालावधीत गणेशोत्सवाचे महत्त्व वाढत गेल्याने या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली.
पेणमध्ये भिकाजी कृष्ण देवधर यांनी गणेशमूर्तींचा व्यवसाय सुरू केला. त्याला पुढच्या पिढींतील वामनराव देवधर आणि राजाभाऊ देवधर यांनी चालना दिली. पुढील काळात त्यांच्याकडे शिकणाऱ्या काही कारागिरांनी
स्वतंत्र व्यवसाय सुरू केले आणि हा व्यवसाय वाढत गेला. प्रथम कोकणासह मुंबई–पुण्यात या मूर्ती जाऊ लागल्या. त्यानंतर राज्यभरातून मागणी येऊ लागली. गेल्या काही वर्षांत गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातूनही मागणी येऊ लागली. याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, थायलंड, सौदी अरेबिया आणि मॉरिशस या देशांमधूनही येथील गणेशमूर्तींना मागणी येऊ लागली. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने येथील गणेशमूर्ती सातासमुद्रापार जात आहेत.
गणेशमूर्ती बनविण्यासाठी जगभरात ख्याती असलेले हे गाववजा शहर येथील चिमण गणपती मंदिरामुळेही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या गणपतीची ख्याती दूरवर पसरलेली आहे. असे सांगितले जाते, की १८८५ पूर्वी या मंदिराच्या जागी चिमणाजी रघुनाथ जोशी ऊर्फ चिमण साधू यांची मठी होती. त्या मठीमध्ये त्यांनी गणेशमूर्तीची स्थापना केली. आजूबाजूच्या तरुणांना सोबत घेऊन ते गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करीत असत. उत्सवांची परंपरा कायम राहावी म्हणून चिमण साधूंनी आपली जागा व मूर्ती मृत्यूपूर्वी
आळीकरांच्या स्वाधीन केली. त्यामुळे या गणपतीला चिमण गणेश असे नाव प्राप्त झाले.
पेण–खोपोली मार्गावर चावडी नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे मंदिर बाहेरून पाहिले तर कौलारू घरासारखे दिसते; परंतु आत गेल्यावर त्याच्या प्राचीन व लाकडी रचनेचे आकलन होते. उंच जगतीवर उभे असलेल्या या दुमजली मंदिराची संरचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वीच्या मंदिरातील संपूर्ण लाकडी बांधकाम अद्यापही भक्कम आहे. येथील सभामंडपात अष्टविनायकांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहात कोरीव काम केलेल्या एका मोठ्या शिळेवर गणपतीची सुंदर मूर्ती विराजमान आहे.
संगमरवरी शिळेमध्ये कोरलेली ही मूर्ती अवघ्या १६ इंच उंचीची आहे. उजव्या गुडघ्यावर डावा पाय ठेवून बसलेली ही गणेशमूर्ती डाव्या सोंडेची आहे. मूर्तीचा खालील उजवा हात अभयमुद्रेत आहे, तर डाव्या हातात लाडू आहे. वरच्या उजव्या हातात परशू आणि डाव्या हातात पाश ही गणेशाची आयुधे आहेत. पायानजीक छोटी मूषकमूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती मयुरासनाधिष्ठित आहे. तिच्या मागच्या बाजूस असलेल्या सोनेरी प्रभावळीत मयूर कोरलेले आहेत. मयुरांचे पंख विविध खड्यांनी शोभायमान आहेत. महिरपी प्रभावळीवर बारीक नक्षीकाम केलेले आहे. वरच्या बाजूला ओमकार कोरलेला आहे. वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला, तरी तो करताना मूर्ती व मंदिराची मूळ रचना मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे. सध्या गर्भगृहात असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना १९१८ मध्ये करण्यात आली होती व सध्याची वास्तू १९२७ मध्ये बांधण्यात आलेली आहे. या मंदिरात जुन्या पद्धतीचे एक घड्याळ अद्यापही सुरू आहे. ते भास्कर रा. दामले यांनी १९३३ मध्ये दिल्याचा त्यावर उल्लेख आहे.
या मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीलाही येथे उत्सव असतो. या काळात मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. दहीहंडीच्या दिवशी येथे श्रीकृष्णाची मिरवणूक निघते. नवसाला पावणारा व हाकेला धावणारा अशी या चिमण गणेशाची ख्याती असल्यामुळे दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.