चतुःशृंगी देवी मंदिर

सेनापती बापट रोड, पुणे

पुण्यात सेनापती बापट रोडवरील लहानशा टेकडीवर श्री चतुःशृंगी देवीचे मंदिर आहे. या टेकडीला चार शिखर आहेत म्हणून तेथे विराजमान असलेली चतुःशृंगी. या देवीच्या उत्पत्तीची कथा नाशिक-वणीच्या प्रसिद्ध सप्तशृंगी देवीशी जोडली जाते.

पेशव्यांच्या काळात दुर्लभशेठ पितांबरदास महाजन नावाचे सावकार होते. ते पेशव्यांच्या मोहिमांना निधी उपलब्ध करून देण्यास हातभार लावत असत. त्यांची नाणे छापायची टांकसाळदेखील होती. असे हे श्रीमंत सावकार न चुकता चैत्र व अश्विन पौर्णिमेला वणीच्या सप्तशृंगीच्या दर्शनाला जात. बैलगाडी, घोडागाडी, तर कधी चालत ही तीर्थयात्रा करणाऱ्या दुर्लभशेठ यांना वृद्धापकाळात हा प्रवास जमेनासा झाला. त्यांना त्याची खूप खंत वाटू लागली. त्यांनी दुःखी मनाने देवीला आपली अडचण सांगितली. तेव्हा सप्तशृंगीने त्यांना एका रात्री दृष्टांत देत मी पुण्यातील टेकडीवर असल्याचे सांगितले. तेव्हा तेथे स्थान निश्चित करून त्यांनी मंदिराच्या कामालाच सुरुवात केली. तेथे खोदकाम सुरू असताना त्यांना तांदळास्वरूप देवीची स्वयंभू मूर्ती सापडली. (तांदळा म्हणजे फक्त मुखस्वरूप.) तीच चतुःशृंगी देवी म्हणून ख्यातकीर्त झाली. यावेळी दुर्लभशेठ यांना एवढा आनंद झाला की, देवीच्या नावे चांदीच्या रुपयाचे नाणेही त्यांनी छापून‌ घेतले. त्याला चतुःशृंगी रुपया असे संबोधण्यात येत असे, अशी नोंद आढळते.

या देवीला ‘अंबरेश्वरी’ असेही नाव आहे. हे मंदिर ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंदीचे आहे. साधारणतः अडीच एकर जागेवर ते उभे आहे. कळसावर भगवे निशाण फडकत असते. हे देवस्थान डोंगरावर असल्याने १७० हून अधिक पायऱ्या चढून तेथे जावे लागते. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार पांढऱ्या व लाल रंगाने रंगविलेले असून तेथे तीन उंच कमानी आणि त्यावर चार खिडक्या आहेत.

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पहिल्या टप्प्यावर गणपतीचे मंदिर लागते. या स्थानाला ‘पार्वतीनंदन गणपती’, असेही म्हणतात. या प्रशस्त गणपतीला प्रदक्षिणा घालताना भिंतींवर अष्टविनायकाच्या दगडात कोरलेल्या प्रतिकृती पाहायला मिळतात. पुढे आणखी पायऱ्या चढल्यावर दुर्गादेवी आणि लक्ष्मीचेही मंदिर आहे.

मंदिराला एकूण सहा कमानी असून त्यावर चांदीची सजावट आहे. मोठ्या सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. गाभाऱ्यात चांदीच्या मखरात स्वयंभू चतुःशृंगी देवी विराजमान आहे. पुजाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या मंदिरात सजावटीसाठी पाचशे ते सातशे किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. ही देवी जागृत असून नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिर परिसराची देखभाल सध्या चतुःशृंगी मंदिर ट्रस्टकडून केली जाते. येथे नवरात्रोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्यात येतो. या काळात करण्यात येणारा नवचंडी यज्ञ भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिर परिसरात एक हजार पणत्या लावल्या जातात. त्यावेळी मिणमिणत्या प्रकाशात मंदिर परिसर न्हाऊन निघतो. सकाळी १० वाजता व रात्री ८ वाजता देवीची आरती होते. सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत भाविकांना मंदिरात देवीचे दर्शन करता येते.

उपयुक्त माहिती

  • सेनापती बापट रोडवरील टेकडीवर मंदिर
  • मंदिरात जाण्यासाठी १७० पायऱ्या
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस येतात
  • खासगी वाहने मंदिराच्या पार्किंगपर्यंत येऊ शकतात
  • निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home