चांगावटेश्वर मंदिर

सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे

पुणे जिल्ह्यातील सासवड येथे कऱ्हा नदीच्या काठावर बाराव्या शतकातील श्री चांगावटेश्वर मंदिर उभे आहे. सासवड-नारायणपूर मार्गावर वसलेले हे मंदिर मूळचे हेमांडपंती स्वरूपाचे आहे. अठराव्या शतकात सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी या वास्तूचा जीर्णोद्धार केला. संत चांगदेव महाराजांच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. जमिनीपासून तब्बल ५० फूट उंचीवर असलेल्या एका प्रशस्त चौथऱ्यावर या मुख्य मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिराला किल्ल्याप्रमाणे भक्कम तटबंदीचे संरक्षण आहे.

चांगावटेश्वर मंदिराचा इतिहास महाराष्ट्रातील यादव आणि मराठा अशा दोन महत्त्वपूर्ण कालखंडांशी जोडलेला आहे. मंदिराच्या मूळ बांधकामाची शैली पाहता ते बाराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजांच्या काळात बांधले गेले असावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. काळ्या पाषाणात व चुना विरहित रचनेत केलेल्या या मंदिराच्या बांधणीवरून यादव काळात प्रचलित असलेल्या हेमांडपंती स्थापत्य शैलीचा प्रभाव या वास्तूवर स्पष्टपणे जाणवतो. पुढे अठराव्या शतकात सासवड परिसराचे प्रशासन सरदार पुरंदरे घराण्याकडे असताना या वास्तूचा जीर्णोद्धार झाला. इ.स. १७०० च्या सुमारास सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी मंदिराच्या मूळ पाषाणी बांधकामावर मराठा शैलीतील विटांचे व चुन्याचे शिखर उभारले.

संत चांगदेव महाराज हे महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील एक अत्यंत प्रभावशाली व सिद्ध योगी मानले जातात. पौराणिक ग्रंथांनुसार, चांगदेवांना हटयोगातील उच्च पद प्राप्त होते व त्यांनी निसर्गावर पूर्ण ताबा मिळवला होता. ते १४०० वर्षांचे दीर्घ आयुष्य जगले. त्यांच्या जीवनातील परिवर्तनाचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी रचलेला ‘चांगदेव पासष्टी’ हा ग्रंथ होय. जेव्हा चांगदेवांनी आपला अहंकार सोडून ज्ञानेश्वरांना शरण जाण्याचे ठरवले तेव्हा त्यांना आत्मज्ञानाची ओळख करून देण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ६५ ओव्यांची रचना केली. या ग्रंथातील उपदेशामुळे चांगदेवांनी योगमार्गापेक्षा भक्ती आणि ज्ञान श्रेष्ठ असल्याचे मान्य केले. ‘संत लीलामृत’ मधील उल्लेखानुसार वयाने अत्यंत ज्येष्ठ असलेल्या चांगदेवांनी लहानग्या मुक्ताबाईंना आपले गुरु मानले होते. संत नामदेवांच्या अभंगांमध्येही चांगदेवांच्या या सात्त्विक बदलाचे वर्णन येते.

असे सांगितले जाते की संत चांगदेव महाराज दरवर्षी चातुर्मासात सासवड येथे वास्तव्यास असायचे. या काळात ते मौनव्रत धारण करून डोळे बंद ठेवून साधना करत असत. त्यांचा एक शिष्य दररोज त्यांच्या पूजेसाठी मातीचे शिवलिंग तयार करत असे. महाराज हे शिवलिंग आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवून ध्यानस्थ मुद्रेत शिवाची पूजा करत. एके दिवशी पावसाळ्याचे दिवस असल्याने सततच्या पावसामुळे शिष्याला नवीन शिवलिंग बनवण्यासाठी चांगली माती मिळाली नाही. त्याने एका मातीच्या पालथ्या भांड्यावर थोडी माती लिंपून ते शिवलिंग म्हणून महाराजांच्या पूजेसाठी दिले. जेव्हा पूजेनंतर महाराजांनी ते शिवलिंग आपल्या हातावरून खाली ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते तिथून हलले नाही. महाराजांनी डोळे उघडल्यावर त्यांना हा ईश्वरी संकेत असल्याची जाणीव झाली. त्यांनी त्याच ठिकाणी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आणि मंदिर उभारले. याच ठिकाणी नंतर त्यांनी दीर्घकाळ उपासना केली. चांगदेवांनी ‘वट’ वृक्षाच्या सान्निध्यात स्थापन केलेले हे शिवलिंग असल्याने त्याला ‘चांगावटेश्वर’ असे नाव पडले. दुसऱ्या आख्यायिकेनुसार सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव यांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. त्यामुळे कऱ्हा नदीच्या या तीराला ‘ब्रह्मक्षेत्र’ असेही संबोधले जाते.

सिद्धकांची तपोभूमी म्हणून ओळख असलेल्या या वास्तूचा परिसर विविध वृक्षांनी व्यापलेला आहे. हे मंदिर जमिनीपासून ५० फूट उंचीवर असलेल्या एका मोठ्या चौथऱ्यावर बांधलेले आहे. या मंदिराभोवती भक्कम तटभिंत आहे. प्रांगणातून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी २५ दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. पूर्वाभिमुख असलेल्या या वास्तूच्या गर्भगृहाची रचना ताराकृती आहे. तटबंदीतील महाद्वारातून मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणाच्या चारही बाजूंना संरक्षक भिंतींना लागून ओवऱ्यांची रचना आहे. पूर्वीच्या काळी या ओवऱ्यांचा वापर यात्रेकरूंच्या निवासासाठी तसेच पुजाविधी व धार्मिक कार्यक्रमांसाठी केला जात असे. मंदिराच्या समोरच दोन मोठ्या दीपमाळा आहेत. या दीपमाळांच्या शेजारी कोरीव काम केलेली एक पाषाणी तुळशी वृंदावन आहे. तिची उंची सहा फूट आहे व तिचे नक्षीकाम मुख्य मंदिराच्या शैलीशी मिळतेजुळते आहे. या तुळशी वृंदावनाच्या बांधकामातील बारकावे मराठाकालीन कलेची साक्ष देतात.

नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचाच मुख्य भाग असलेल्या या नंदीमंडपात एका चौथऱ्यावर नंदीची मोठी मूर्ती आहे. हा नंदी एकाच अखंड काळ्या पाषाणातून कोरलेला आहे. त्याच्या अंगावरील दागिने, गळ्यातील घंटांचे काम तसेच गळ्यातील दोरीची गाठ या कलाकुसरी अत्यंत बारकाईने केल्याचे दिसते. नंदीमंडपानंतर मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. नंदीमंडप व सभामंडपात गोलाकार आणि चौकोनी अशा मिश्र स्वरूपाचे अंदाजे ३० दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर मानवी जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. त्यामध्ये ताक घुसळणारी स्त्री व मल्लविद्या सादर करणारे पैलवान, अशा विविध आकृत्यांचा समावेश होतो. याशिवाय स्तंभांवरील कोरीव कामात प्राणी आणि पक्ष्यांचेही चित्रण आहे. त्यामध्ये हत्ती, घोडे, गेंडे आणि मोर यांच्यासह ‘शरभ’ या प्राण्याचे पौराणिक शिल्प आहे. वाघाचा देह आणि हत्तीची सोंड असलेल्या या काल्पनिक प्राण्याचे चित्रण शक्तीचे प्रतीक मानले जाते. सभामंडपाच्या जमिनीवर पाषाणात कोरलेली एक कासव मूर्ती आहे. पुढे अंतराळातून गर्भगृहात प्रवेश होतो.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अत्यंत बारकाईने नक्षीकाम केलेले दिसते. द्वारचौकटीवर पानाफुलांच्या वेलींसोबतच ललाटबिंबावर गणेशाचे लहानसे शिल्प व उंबरठ्यावर कीर्तिमुख आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी काळ्या पाषाणातील मोठे शिवलिंग आहे. अशी मान्यता आहे की प्रत्यक्ष संत चांगदेवांनी याची स्थापना केली होती. शिवलिंगाच्या समोरील भिंतीतील देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे. हे मंदिर पाषाणी बांधणीचे असले तरी त्यावरील शिखर हे विटा व चुन्याच्या साहाय्याने बांधलेले आहे. शिखरावर विविध स्तरांवर असलेल्या देवकोष्टकांत देवदेवतांच्या मूर्ती आहेत व या प्रत्येक देवकोष्टकावर आमलक व कळस आहे. मुख्य शिखराचा आकार वरच्या बाजूला निमुळता होत जातो आणि त्याच्या शीर्षभागी मोठा आमलक व कळस आहे. गर्भगृहावरील या मुख्य शिखरासोबतच सभामंडप आणि नंदीमंडपावरही लहान आकाराची शिखरे आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर वेलबुट्टी व हत्तींच्या माळांचे कोरीव काम आजही सुस्थितीत आहे.

महाशिवरात्र हा येथील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी पहाटेपासूनच रुद्राभिषेक आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होतात. त्यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे विशेष धार्मिक विधी होतात. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या प्रशस्त उद्यान आणि नैसर्गिक वातावरणामुळे येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘वळू’ मधील काही दृश्ये याच परिसरात चित्रित झाली होती.

उपयुक्त माहिती

  • सासवड बस स्थानकापासून २.५ किमी
  • पुणे शहरापासून ३४ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून सासवडसाठी एसटीची सुविधा
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९२२९१४८३६
Back To Home