कऱ्हा नदीच्या तीरावर सासवड येथे निसर्गसमृद्ध परिसरात चांगावटेश्वर शिवमंदिर आहे. या ठिकाणी ब्रह्मदेवाने शंकराची आराधना केल्याचे सांगितले जाते. १३व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेली ही वास्तू स्थापत्यकलेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते. संत चांगदेवांचे येथे वास्तव्य होते, असे सांगितले जाते.
या मंदिराची आख्यायिका अशी की श्री चांगदेव महाराज चातुर्मासात मौनव्रत आणि अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे बंद करून दिनचर्या करीत. या काळात त्यांचा शिष्य मातीपासून शिवलिंग तयार करत असे. चांगदेव महाराज या शिवलिंगाची विधिवत पूजा करत असत. एके दिवशी सतत पडणाऱ्या पावसामुळे त्या शिष्याने एका पालथ्या भांड्यावर थोडीशी माती लिंपून तीच पार्थिव शिवलिंग (मातीपासून बनलेले) म्हणून पूजेस दिले. चांगदेवांनी नित्यनेमाप्रमाणे स्नान उरकून या शिवलिंगास आव्हानात्मक मंत्राक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हा प्रयत्न व्यर्थ गेला. त्यावेळी हे अचल स्वयंभू लिंग असल्याचे चांगदेवांच्या लक्षात आले. त्यांनी हे ईश्वरी संकेत मानून तिथे एक मंदिर बांधून त्या स्वयंभू लिंगाची स्थापना केली. याच ठिकाणी नंतर त्यांनी दीर्घकाळ उपासना केली, म्हणून या मंदिरास ‘चांगावटेश्वर’ असे नाव पडले.
सिद्धकांची तपोभूमी म्हणून ओळख असलेल्या या वास्तूचा परिसर वृक्षवल्लीने बहरलेला आहे. मंदिर जमिनीपासून ५० फूट उंचावर आहे. मंदिराभोवती तटबंदी असून, आत ओवऱ्या (तटबंदीच्या भिंतीमध्ये आतील बाजूस असलेल्या खोल्या) आहेत. मंदिराच्या प्रांगणात प्रशस्त उद्यान असल्याने अनेक पक्षी येथे मुक्तपणे विहारताना दिसतात. मंदिरापर्यंत जाण्यासाठी २५ पायऱ्या आहेत. पाषाणी बांधकामात घडवलेली ही वास्तू पूर्वाभिमुख असून ती हेमांडपंती धाटणीची दिसते. मंदिराची रचना येथून जवळच असलेल्या संगमेश्वर मंदिराशी मिळतीजुळती आहे. मंदिरासमोर कोरीव काम केलेली पाषाणी तुळस आहे. तिच्या शेजारी दोन बाजुला दोन दीपमाळा आहेत. दिवाळी आणि महाशिवरात्रीच्या उत्सवावेळी त्यावर दिवे लावले जातात. पेशवे काळात सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते.
ही वास्तू प्राचीन असली तरी येथील शिल्पे चांगल्या स्थितीत आहेत. सभामंडप, मध्य गर्भगृह आणि मुख्य गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. मध्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती दिसते. दोन्ही मंडपांमध्ये ३० दगडी खांब आहेत; त्यांची रचना गोलाकार आणि चौकोनी अशी आहे. या खांबांवर सुंदर कलाकुसर आहे. मानवी जीवनातील वेगवेगळ्या भावना त्यावर चितारलेल्या आहेत. यामध्ये ताक घुसळणारी स्त्री, मल्ल, नर्तकी यांच्यासह पक्षी-प्राणी विश्वही रेखाटले आहे. यामध्ये शरभ (पुराणांतील वर्णनानुसार शरभ हा अंशतः सिंह व अंशतः पक्षी असा एक काल्पनिक प्राणी आहे.) अश्व, गज, गेंडा, मर्कट, मयूर यांचा समावेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम आहे. गाभाऱ्यातील शिवलिंगाच्या बाजूला पितळेची मोठी घंटा आणि गणेशमूर्ती आहे.
महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव असतो. यानिमित्त मंदिरात पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात होते. त्यामध्ये प्रथम रूद्राभिषेक करण्यात येतो. त्यानंतर भजन- कीर्तन असे कार्यक्रम असतात. सायंकाळी ६ वाजता आरती होते. या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. प्रत्येक सोमवारी येथे धार्मिक कार्यक्रम होतात. मंदिराच्या प्रांगणात असलेले प्रशस्त उद्यान व येथील निसर्गसमृद्ध परिसर यामुळे या ठिकाणी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत भाविकांना चांगावटेश्वराचे दर्शन घेता येते.