चंडिकादेवी मंदिर

पाटण, ता. चाळीसगाव, जि. जळगाव

शून्याच्या भागाकाराचे विवेचन, अंकाची स्थानपरत्वे किंमत, संख्याचे वर्गमूळ, घनमूळ काढण्याची पद्धत, त्रयराशिक, पंचराशिक गणित, त्रिकोणमिती अशा विविध गणिती संकल्पनांचा उहापोह करणारे, ग्रहांचा तसेच ग्रहणांचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करणारे भारतातील प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य (द्वितीय) यांचे पाटण हे जन्मगाव. या गावानजीक जंगल परिसरात चंडिकादेवीचे (पाटणादेवी) प्रसिद्ध स्थान आहे. वणी येथील सप्तश्रृंगी देवीची बहिण अशी मान्यता असलेल्या या देवीचे हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. या मंदिराच्या परिसरात भास्कराचार्यांचे नातू चंगदेव यांची गणित शिक्षणाची पाठशाळा होती

छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गौताळा औट्रमघाट वन्यजीव अभयारण्यात, डोंगरी नदीच्या तीरावर चंडिकादेवीचे (पाटणादेवी) हे मंदिर वसलेले आहे. पौराणिक आख्यायिकांनुसार, देवी सती राजा दक्ष प्रजापतीची मुलगी आणि महादेवाची पत्नी होय. एकदा राजा दक्षाने यज्ञाचे आयोजन केले महादेव सोडून सर्व देवांना त्यासाठी आमंत्रित केले. सतीला हे समजल्यानंतर तिने वडिलांकडे जाऊन याचा जाब विचारला. त्यावेळी दक्षाने महादेवाची निंदा केली. पतीबद्दलचे ते अपमानकारक उद्‌गार ऐकून सती क्रोधित झाली त्या क्रोधातच तेथे सुरू असलेल्या यज्ञामध्ये तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. शंकरास हे समजल्यावर ते प्रचंड क्रोधीत झाले. यज्ञस्थळी येऊन त्यांनी सतीचे मृत शरीर त्या यज्ञातून बाहेर काढले. ते हातात घेऊन ते शोकसंतापाने इकडेतिकडे भटकू लागले

रुद्रावतार धारण करून शंकराने तांडव नृत्य करू केले. त्यातून पृथ्वीचा नाश होऊ शकतो म्हणून सगळे देव चिंतेत पडले. तेव्हा विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. सतीच्या देहाचे भाग आणि अंगावरील दागिने ज्या ज्या ठिकाणी पडले ते देवीचे शक्तिपीठ बनले. असे सांगितले जाते की त्यापैकी सतीच्या हाताचा पंजा पाटणादेवीच्या मंदिराजवळील डोंगरावर पडल्याने तेथे शक्तिपीठ निर्माण झाले. वरदहस्त शक्तिपीठ म्हणून ते ओळखले जाते. देवीची अशी ५१ शक्तिपीठे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि तिबेट या देशांमध्ये आहेत. देवीभागवत या ग्रंथांमधील उल्लेखानुसार अशी १०८ शक्तिपिठे आहेत

चामुंडा देवीच्या अवताराबाबतमार्कंडेय पुराणातीलदेवी माहात्म्याच्या सातव्या अध्यायात अशी कथा आहे की शुंभनिशुंभ या दैत्यांनी इंद्रदेवाकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा देवांनी आदिशक्ती भगवतीस साकडे घातले. ते भगवतीची प्रार्थना करीत असताना पार्वती देवी तेथे आली. तिच्या शरीरकोषातून अंबिका देवी निर्माण झाली. चंड आणि मुंड हे शुंभनिशुंभाचे सेवक होते. त्यांनी अंबिकेस पाहिले तिच्या रुपसौंदर्याचे वर्णन शुंभाकडे केले. शुंभाने अंबिकेस आपली पत्नी हो असा निरोप पाठवला. अंबिकेने त्यास धुडकावून लावले. तेव्हा तिला पकडून आणण्यासाठी शुंभनिशुंभाने चंड आणि मुंड यांना पाठवले. तेव्हा अंबिकेच्या शरीरातून प्रकटलेल्या कालीने चंडमुंडांचा वध केला. काली देवीने चंडमुंड यांचा वध केल्यामुळे अंबिकेने तिला चंडिका असे नाव दिले.

स्थानिक आख्यायिकेनुसार, चंडिका देवीचे मुळ स्थान येथील डोंगरावर आहे. गोविंद स्वामी नावाचे एक गृहस्थ या चंडिका देवीचे उपासक होते. वृद्धापकाळात त्यांना सतत त्या डोंगरावर जाऊन देवीची उपासना करणे कठीण होऊ लागले. त्यामुळे त्यांनी देवीला आपल्यासोबत खाली येण्याची विनंती केली. देवीने आपल्या प्रिय भक्ताची विनंती स्वीकारून खाली येण्याचे मान्य केले. तेच हे देवस्थान होय. पाटण या गावात स्थित असल्यामुळे ही देवी पाटणादेवी म्हणून प्रसिद्ध आहे

गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून नोंदणी करून या मंदिरासाठी भाविकांना सोडण्यात येते. येथून काहीशा कच्चा रस्त्याने दोन किमी अंतर पार करून मंदिराच्या वाहनतळापर्यंत येता येते. वाहनतळापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर मंदिर आहे. प्रवेश कमानीतून आत आल्यावर पूजासाहित्य प्रसाद विक्रीची अनेक दुकाने आहे. तेथून पुढे या मार्गावर असलेल्या डोंगरी नदीवरील साकव पार करून मंदिराकडे येण्यासाठी रस्ता आहे. नदीपात्रापासून काहीशा उंचावर असलेल्या या मंदिरासमोर सुमारे ४५ ते ५० फूट उंचीचे दोन प्राचीन दीपस्तंभ आहेत. या दीपस्तंभांच्या मधून सुमारे २० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात दोन्ही बाजूने मोठे दगडी चौथरे त्यामधून मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहे. यापैकी डावीकडील चौथऱ्यावर देवीचे उपासक गोविंद स्वामी यांची समाधी आहे. तर उजवीकडील चौथऱ्यावर एक पाषाणी नंदी आहे. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर ७५ फूट लांब, ३६ फूट रुंद १८ फूट उंच आहे. मंदिराच्या भिंतींजवळ बाहेरील बाजूस अनेक प्राचीन मूर्ती शिल्पे आहेत

सभामंडप देवीच्या मुख्य गर्भगृहासह आणखी दोन उपगर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात अनेक दगडी स्तंभ आहेत. सभामंडपात प्रवेश केल्यावर प्रथम एका उपगर्भगृहात मध्यभागी शिवपिंडी त्यापुढे गणेश आणि रिद्धीसिद्धी यांचे स्थान आहे, तर दुसऱ्या उपगर्भगृहात विष्णूची मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहात वज्रपिठावर नऊ फूट उंचीची व्याघ्रारूढ चंडिकादेवीची मूर्ती आहे. या मूर्तीला अठरा हात आहेत. यापैकी अनेक हातांमध्ये आयुधे आहेत. या मूर्तीच्या एका बाजूला गणपती दुसरीकडे देवीची मूळ मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या डावीकडे आणखी एक लहान मंदिर आहे. त्यात कालिकादेवीची मूर्ती आहे. ही मूर्ती भव्य आणि चंडिकामातेप्रमाणेच आहे. शारदीय नवरात्री उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वासंतिक उत्सव आणि दर पौर्णिमेला पाटणादेवीची महापूजा करण्यात येते. उत्सवकाळात भाविकांसाठी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते

पाटणादेवीच्या या मंदिरास .. १८६४ मध्ये थोर समाजसेवक इतिहास संशोधक डॉ. भाऊ दाजी लाड यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांना या मंदिर परिसरात एक शिलालेख सापडला. त्यांनी त्याचे वाचन करून, ‘जर्नल ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी, न्यू सिरिज, व्हॉल्यूम मध्ये त्याविषयीचा संशोधन लेख प्रसिद्ध केला. त्यानंतर १८९२मध्येइपिग्राफिका इंडिका, खंड मध्ये प्रा. एफ. किलहॉर्न यांनी त्यावर विस्तृत लेख लिहिला. या शिलालेखात, यादव नृपती सिंघण याचा ज्योतिषी चंगदेव यांनी आपले आजोबा भास्कराचार्य यांच्या सिद्धांतशिरोमणी अन्य ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी मठाची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. तसेच निकुंभ वंशातील सोइदेव हेमाडीदेव यांनी या मठास जमीन अन्य उत्पन्ने कायम देणगीदाखल दिल्याचे नमूद केलेले आहे. हा शिलालेख श्रावण पौर्णिमा, चंद्रग्रहण, प्रभव संवत्सर, शके ११२८ (गुरूवार, ऑगस्ट १२०७) रोजीचा आहे. त्यात चंगदेवाची वंशावळही देण्यात आलेली आहे. यातून थोर गणितज्ञ भास्कराचार्य द्वितिय यांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला. भास्कराचार्यांनी त्यांचे जन्मगाव विज्जलवीड असल्याची नोंद केलेली आहे. ते गाव म्हणजे पाटण हेच असावे, या मतास या शिलालेखामुळे दुजोरा मिळाला. येथे आता राज्याच्या वनविभागातर्फेभास्कराचार्य निसर्ग शिक्षण केंद्रसुरू करण्यात आलेले आहे. सकाळी १० ते वाजपर्यंत ते पर्यटकांसाठी खुले असते.

उपयुक्त माहिती

  • चाळीसगावपासून १८ किमी, तर जळगाव येथून १२२ किमी अंतरावर
  • चाळीसगाव येथून एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरातील भक्तनिवासात निवास न्याहरीची सुविधा 
  • संपर्क : भक्तनिवास, मो. ८६००९७०३००, ९९७०९०९०२४
Back To Home