आदिशक्ती महामायेचे रूप असलेली कालीदेवी म्हणजेच चंडिका देवी. या देवीचे एक पीठ अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे वसलेले आहे. विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून येथील चंडिका देवी प्रसिद्ध आहे. काटेपूर्णा देवी, ढगादेवी म्हणूनही ही देवी ओळखली जाते. या देवीचे मंदिर उत्तरवाहिनी काटेपूर्णा नदी किनाऱ्यावरील उंच टेकडीवर आहे. देवीचे येथील स्थान जागृत असल्याच्या श्रद्धेतून विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथातील पौराणिक आख्यायिकेनुसार, शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी देवांचा राजा इंद्रदेवाकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा पराभूत झालेल्या देवांनी आदिशक्ती भगवतीस साकडे घातले. ते भगवतीची प्रार्थना करीत असताना पार्वती देवी तेथे आली. तिच्या शरीरकोषातून अंबिका देवी निर्माण झाली. चंड आणि मुंड हे शुंभ-निशुंभाचे सेवक होते. त्यांनी अंबिकेस पाहिले व तिच्या रुपसौंदर्याचे वर्णन शुंभाकडे केले. शुंभाने अंबिकेस आपली पत्नी हो, असा निरोप पाठवला. अंबिकेने त्यास धुडकावून लावले. तेव्हा तिला पकडून आणण्यासाठी शुंभ-निशुंभाने चंड-मुंड यांना पाठवले.
त्यांना पाहताच क्रोधवश झालेल्या अंबिकेच्या शरीरातून काली प्रकटली. तिने चंड आणि मुंड यांचा तलवारीने शीरच्छेद केला. काली देवीने चंड आणि मुंड यांचा वध केल्यामुळे देवी पार्वतीने तिला चामुंडा असे नाव दिले.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की कुरणखेडचे नाव प्राचीन काळी कुंचनपूर असे होते. येथे राजा नरेश हा राज्य करत असे. येथील घनदाट जंगलाच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी तो नेहमी येत असे. येथील टेकडीवरील एक जागा नेहमी स्वच्छ असल्याचे त्याच्या नजरेस पडत असे. एके दिवशी तो या टेकडीवर आला असता एक सिंह आपल्या शेपटीने ही जागा स्वच्छ करत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या राजाने येथे देवीचे मंदिर उभारले. त्यानंतर अनेक वर्षे या मंदिराचा परिसर पडिक होता. पुढे १९३२ मध्ये येथे आलेले देवीभक्त व्यंकटेश कांठोबा भोसले यांनी येथे सुमारे ३० वर्षे सेवा केली. ते या मंदिराचे आद्यपुजारी गणले जातात. त्यांनीच प्रारंभी या परिसराचा विकास केला. ही देवी जागृत असल्याची ख्याती पंचक्रोशीत पसरल्याने अनेक भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले. १९९३ मध्ये या गावातील बापूराव साहेबराव ऊर्फ डॅडी देशमुख हे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि बोरगाव मंजू येथील पुरुषोत्तम अग्रवाल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराच्या परिसरात ‘ढगा’ नावाचे गाव आहे.
त्यामुळे ही देवी ढगादेवी म्हणूनही ओळखली जाते. या मंदिरापासून काही अंतरावर महादेव मारूती मंदिर आहे. येथील मारूतीचे दर्शन घेतल्यावर चंडिका देवीचे दर्शन पूर्ण होते, अशी मान्यता आहे.
गावातील मंदिराच्या कमानीपासून सुमारे अडीच किमी अंतरावर हे मंदिर आहे. एका लहानशा टेकडीवर निसर्गरम्य परिसरात चंडिका देवीचे स्थान आहे. या मंदिराच्या उत्तर दिशेला १२१ पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात पायरी मार्गाच्या डावीकडे मोठी दीपमाळ व दीपमाळेच्या खालील बाजूला देवकोष्टकात भैरवनाथाचे स्थान आहे. जमिनीपासून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराची सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात स्तंभ व फरसबंदी संगमरवरी आहे. हे सर्व स्तंभ वरील बाजूने नक्षीदार कलाकृतीने एकमेकांशी जोडलेले आहेत. सभामंडपात मध्यभागी होमकुंड आहे. सभामंडपातून चार पायऱ्या चढून उंच असलेल्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवकोष्टकांवर नागफण्यांची कलाकुसर आहे.
या गर्भगृहात वज्रपिठावरील मखरात चंडिका देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीला पाच मुखे आहेत. गर्भगृहावर सुंदर कलाकुसर असलेले उंच शिखर आहे. या शिखरावर असलेल्या देवकोष्टकात गणपतीच्या मूर्ती व देवकोष्टकांवर सिंहशिल्पे आहेत. या शिखरावर मांगल्याचे प्रतिक असलेल्या कलशाच्या शेकडो प्रतिकृती कोरलेल्या आहेत. मंदिर परिसरात संकटमोचन हनुमान आणि शीतलामातेचीही मंदिरे आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी येथे सुसज्ज भक्तनिवास, भोजनशाळा व गोशाळा आहे. उत्सवप्रसंगी या भोजनशाळेतून भाविकांना महाप्रसाद दिला जातो.
या मंदिरात मंगळवारी तसेच शुक्रवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. येथे सकाळी ११ वाजता तसेच सायंकाळी ८ वाजता आरती केली जाते. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. चैत्री तसेच शारदीय नवरात्रोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यातही शारदीय नवरात्रोत्सवाचे स्वरूप मोठे असते. या उत्सवादरम्यान नऊही दिवस सकाळी आणि सायंकाळी देवीची महाआरती केली जाते. अष्टमीला होम-हवन केले जाते. नवमीच्या दिवशी पूर्णाहुती तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या देवीवर असणारी भाविकांची श्रद्धा व येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा देऊन या मंदिराचा गौरव केलेला आहे.