चांदाई देवी मंदिर

काटा, ता. वाशिम, जि. वाशिम

काटेपूर्णा आणि पूस या दोन नद्यांचे उगमस्थान असलेले काटा हे गाव पौराणिक काळात कंटकतीर्थ म्हणून ओळखले जाई. या गावाजवळच चांदाई देवीचे सुंदर मंदिर उभे आहे. ही चांदा देवी चंद्रपूरच्या महाकालीचे प्रतिरूप मानली जाते. चंद्रपूरचे दुसरे नाव चांदा असल्यामुळे तेथील महाकालीचे रूप म्हणून काटा येथील देवीस चांदादेवी वा चांदाई असे संबोधण्यात येते. येथील देवीची मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. ही देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

चंद्रपूर येथील महाकाली मंदिराचा इतिहास तेथील गोंडसत्तेशी संबंधित आहे. गोंड ही भारतातील संख्येने सर्वांत मोठी आदिवासी जमात आहे. मध्ययुगात मध्य प्रदेशातील गढा-मंडला, खंडाल आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर (चांदा) येथे गोंडांची राज्ये होती. त्यापैकी चंद्रपूरचे गोंड राज्य सर्वाधिक भरभराटीला आले होते. भीम बल्लाळसिंह (इ.स. १२४७-१२७२) हा या घराण्याचा मूळ पुरुष, तर सातवा पुरुष खांडक्या बल्लाळशहा (इ.स. १४७२ ते १४९७) होता. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’ने प्रकाशित केलेल्या संजीव भागवत यांच्या ‘चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपरा : मायधुरपता’ या संशोधनग्रंथातील माहितीनुसार, खांडक्या बल्लाळ शहाने उद्‌ध्वस्त झालेल्या चंद्रपूरचे पुनर्वसन करून येथे आपली राजधानी निर्माण केली. त्याचवेळी त्याने अंचलेश्वर आणि महाकाली या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

‘मायधुरपता’ या ग्रंथातील आख्यायिकेनुसार, राजाच्या चेहऱ्यावर कोड असल्यामुळे त्याला ‘खांडक्या’ हे नाव पडले होते. सुरुवातीला त्याची राजधानी बल्लाळपूर होती. एकदा शिकारीस गेला असता झरपट (जरीपटका) नदीकाठी असलेल्या कुंडातील पाण्याने त्याने तोंड धुतले. दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावरील डाग कमी होऊन चेहऱ्यावर तेज आले. ते पाहून त्याची पत्नी हिरातानी हिने ते कुंड शोधून काढले व त्या ठिकाणी अंचलेश्वर महादेवाचे मंदिर बांधले. या कुंडाच्या दक्षिणेस एका भुयारात खांडक्या बल्लाळशहाला दगडात कोरलेली महाकालीची प्राचीन मूर्ती आढळली. पुढे ते भुयार स्वच्छ करून तेथेही मंदिर बांधले गेले. ही दोन मंदिरे बांधून खांडक्या बल्लाळशहा आणि राणी हिरातानी हिने चंद्रपूरच्या नव्या उभारणीचा पाया घातला व इ.स. १४९७ मध्ये तिथे राजधानी हलवली. त्यामुळे तेथील महाकालीचे मंदिर १४९५-१४९७ या काळात बांधण्यात आले असावे, असा अंदाज आहे.
पुढच्या काळात राजा बीरशहा याची पत्नी व प्रजादक्ष राणी हिराई हिने १७०९ ते १७१९ या दरम्यान महाकालीचे जुने मंदिर पाडून तिथे भव्य नवे मंदिर उभारले. हीच महाकाली काटा येथे चांदा देवीच्या स्वरूपात प्रतिष्ठापित आहे.
काटा येथील मंदिराचा नेमका स्थापनाकाळ अज्ञात आहे, मात्र सध्याचे मंदिर अलीकडेच जीर्णोद्धारित केलेले व आधुनिक बांधकामशैलीतील आहे. ही मंदिरवास्तू रस्त्यापासून उंच भागात स्थित आहे व समोर मोठा ओटा आहे. या ओट्यावर तुळशीवृंदावन आहे, तर डाव्या बाजूला गणेशाची देवळी आणि उजवीकडे हनुमानाचे स्थान आहे. येथे उघड्यावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या मागे छोटी भिंत व मस्तकी मोठे छत्र आहे. तसेच मूर्तीच्या बाजूला एक उपदेवता दिसून येते.

पहिल्या ओट्यावरून आठ पायऱ्या चढून मंदिराच्या वरील ओट्यावर प्रवेश केल्यावर मोठा दीपस्तंभ लागतो. त्यासमोर छोट्याशा चौथऱ्यावर शिवलिंग, नंदीमूर्ती व त्यापुढे चौकोनी यज्ञकुंड आहे. या ठिकाणी डाव्या-उजव्या बाजूला आसरा मातांची स्थाने आहेत. येथून ११ पायऱ्या चढून मुख्य मंदिरात प्रवेश होतो. सिमेंटचे समतल छत असलेला मंदिराचा सभामंडप प्रशस्त व खुला आहे. समोरच संगमरवरी टाइल्सनी सुशोभित केलेले गर्भगृह आहे, जिथे वज्रासनावर चांदाई देवीची मुखमूर्ती विराजमान आहे. सुबक रेखीव भुवया, पाणीदार डोळे, नाकात नथ, कपाळावर कुंकू, मस्तकी मुकुट अशा वस्त्रालंकारांनी देवी सुशोभित आहे. देवीमूर्तीच्या बाजूस शैव संप्रदायात महत्त्वाचा मानला गेलेला त्रिशूळ आहे व त्याच्या तिन्ही अग्रांवर हिरवा चुडा आहे. मूर्तीच्या मागे उजवीकडील कोपऱ्यात एका चौथऱ्यावर चंद्रपूरच्या महाकालीची निद्रिस्त स्वरूपातील प्रतिमा विराजमान आहे. गर्भगृहाचा प्रदक्षिणा मार्ग सभामंडपातूनच जातो. गर्भगृहावर निमुळते होत गेलेले गोलाकार शिखर व त्यावर द्विस्तरीय कलश आहे. मंदिराच्या विस्तीर्ण आवारात लहान मुलांकरिता झोके आणि घसरगुंडी असलेली खेळबाग तयार केलेली आहे.

मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळी देवीची विधिवत पूजा व आरती केली जाते. येथे गणेशोत्सव, हनुमानजयंती, रामनवमी आदी उत्सवांबरोबरच अन्य हिंदू सणही उत्साहाने साजरे केले जातात. मात्र, नवरात्र हा येथील सर्वांत मोठा उत्सव आहे. या काळात नऊही दिवस येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे व होमहवनाचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • वाशीम येथून ७ किमी अंतरावर
  • वाशीम येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे

चांदाई देवी मंदिर

काटा, ता. वाशिम, जिला. वाशिम

Back To Home