आदिशक्ती महामायेची अनेक रूपे आहेत. भगवान शिवशंकरांनी १९० मातृकांचा गण निर्माण केला होता, अशी पौराणिक कथा आहे. त्यांतील सप्तमातृकांचा वा अष्टमातृकांचा गट लोकप्रिय आहे. चामुंडा हे त्या मातृकांमधील एका देवीचे नाव. शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक मानली गेलेली ही उग्र स्वरूप देवी वाशिमची ग्रामदेवता मानण्यात येते. शहराच्या जुन्या भागात या चामुंडा देवीचे मंदिर स्थित आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या देवीची मनोभावे पूजा केल्यास ती आपले मनोरथ पूर्ण करते. त्यामुळे येथे अनेक जण देवीस नवस करतात.
प्र. कृ. प्रभुदेसाईकृत ‘देवीकोशा’च्या खंड-२ मध्ये ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चामुंडा या सप्तमातृकांच्या उत्पत्तीची कहाणी दिलेली आहे. ती अशी की हिरण्यकश्यपू याचा भगवान नरसिंहाने वध केल्यानंतरही त्याचे दैत्यकूळ चालूच राहिले होते. याच कुळात अंधकासुर या दैत्याचा जन्म झाला. त्याने भूतलावर राज्य स्थापून देवतांना त्राही त्राही करून सोडले होते. तेव्हा शंकराने अंधकासुराशी युद्ध केले. त्या युद्धात शंकराने आपल्या बाणाने अंधकासुराला जखमी केले. त्यानंतर त्यांनी आपला त्रिशूळ त्याच्या पोटात खुपसला. परंतु अंधकासुराच्या जखमेतून गळणाऱ्या प्रत्येक रक्तबिंदूतून एक याप्रमाणे अनेक राक्षस निर्माण होऊ लागले. तेव्हा ते रक्त प्राशन करण्यासाठी शंकराने आपल्या आत्मतेजाने मातृगणाची निर्मिती केली.
चामुंडा देवी ही त्यातीलच एक होय. ‘विष्णुधर्मोत्तर’ या ग्रंथात चामुंडेचे वर्णन अशा शब्दांत करण्यात आले आहे – ही देवी प्रेतासनावर बसलेली आहे. ती उग्ररूप आहे. तिच्या दातांचे सुळे बाहेर आलेले आहेत.
तिचे शरीर कृश आहे. तिचे नेत्र खोलगट व उदर सदाचेच रिकामे आहे. तिला दहा हात आहेत. त्यांत तिने मुसळ, कवच, बाण, अंकुश, खड्ग, खेटक, पाश, धनुष्य, दंड व परशु ही आयुधे धारण केली आहेत. काली आणि चर्चिका या नावानेही ही देवी ओळखली जाते. काळ्या रंगाची चामुंडा कवट्यांची माळ धारण करते; तिच्या हातात डमरू, त्रिशूल, तलवार आणि पानपात्र आहे. ती वाघावर स्वार असते. काही ठिकाणी ती मनुष्याच्या मृतदेहांवर उभी असलेली दाखविली जाते. शाक्त पंथात देवीला सर्वोच्च सत्य मानण्यात येते व तिची विविध रूपांत पूजा केली जाते.
वाशिम येथील चामुंडा देवीची कथा येथील बालाजी मंदिराशी जोडलेली आहे. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या ‘वाशिम गॅझेटियर’मधील नोंदीनुसार, इ.स. १७६० च्या सुमारास येथे एक घोडेस्वार त्याच्याकडील काठीने सहज माती उकरत असताना त्याला एका मूर्तीच्या हाताचा भाग दिसला. तेव्हा तेथे खोदकाम करण्यात आले. तेथे ब्रह्मा, विष्णू, महादेव, पार्वती, गणपती, नाग आणि देवी यांच्या मूर्ती आढळल्या. औरंगजेबाने दक्षिणेवर स्वारी केली त्या काळात, मूर्तींची विटंबना होऊ नये म्हणून या मूर्ती येथे गाडून ठेवण्यात आल्या होत्या व कालांतराने लोकांना त्यांचे विस्मरण झाले. त्यातीलच या मूर्ती होत्या.
त्यावेळी वाशिममधील खडीधामणी येथील थोर मुत्सद्दी व सरदार भवानीपंत काळू हे नागपूरचे सबाजी भोसले आणि नंतर जानोजी भोसले यांचे दिवाण होते. त्यांनी १७७९ मध्ये येथे बालाजी मंदिर बांधले. याच सुमारास चामुंडा देवीचे मंदिरही उभारण्यात आले असावे, असे सांगण्यात येते. बालाजी आणि चामुंडा हे भाऊ-बहीण आहेत, असे येथे मानले जाते.
येथील चामुंडा देवीबाबत आख्यायिका अशी की एकदा एका पुजाऱ्यास चामुंडा देवीने स्वप्नदृष्टान्त दिला. त्यात चामुंडा देवीने आपले स्थान कुठे आहे व कुठे स्थापना करावी हे पुजाऱ्यास सांगितले. त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानुसार लोकांनी येथील देवतलावात खोदकाम केले. त्यात बालाजी, चामुंडा आणि नालसाहेब अशा तीन मूर्ती आढळल्या. चामुंडा देवीच्या आदेशानुसार तिची या मंदिरात स्थापना करण्यात आली. देवीची मूर्ती ज्या देवतलावात सापडली, त्याचे बांधकाम बालाजी मंदिराबरोबरच करण्यात येत होते. ते इ.स. १७७६ मध्ये पूर्ण झाले.
आवारभिंतींनी बंदिस्त असलेल्या प्रांगणात देवीचे हे मंदिर वसलेले आहे. आवारभिंतीत मोठे महिरपी कमानदार प्रवेशद्वार आहे.
येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना उजवीकडे एक देवळी लागते. त्यात गणपतीची पाषाणाची मूर्ती विराजमान आहे. तिच्या स्वरूपावरूनच तिचे प्राचीनत्व लक्षात येते. समोरच मुख्य मंदिरवास्तू आहे. शेजारीच पुरातन दीपस्तंभ आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडप आधुनिक बांधणीचा, प्रशस्त आणि अर्धखुल्या प्रकारचा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उंच ओटा बांधलेला आहे. त्यावर दुर्गादेवीचे वाहन असलेल्या सिंहांच्या दोन मूर्ती आहेत. या मंदिराचा दगडी गर्भगृहाचा भाग हेच मूळचे प्राचीन मंदिर होय.
गर्भगृहास महिरपी कमानीचे प्रवेशद्वार आहे. द्वारपट्टिकेच्या वरच्या भागात गणेशाचे शिल्प कोरलेले आहे, तर त्याच्या वरच्या भिंतीकडील भागात, दोन बाजूंना दोन छोटी सिंहशिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृह जमिनीपासून खालच्या भागात आहे. काही पायऱ्या उतरून आत प्रवेश होतो. आत समोरच्या भागात पायऱ्यांसारख्या उंच अधिष्ठानावर चामुंडा देवीची मोठ्या तांदळाच्या (पाषाणाच्या) स्वरूपातील शेंदूरचर्चित मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीच्या भुवया, डोळे आणि ओठ चांदीचे आहेत. गळ्यात दागिने आहेत. या देवीचे रूप माहूरच्या रेणुका देवीसारखे आहे. मूर्तीमागे भिंतीत सोनेरी नक्षीदार प्रभावळ आहे. मूर्तीसमोर देवीच्या पादुका आहेत. या मूर्तीच्या बाजूला देवीची छोटी वस्त्रालंकारयुक्त मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहावर मराठा स्थापत्यशैलीतील, चारही बाजूंनी कोरीव नक्षीकाम केलेले उंच शिखर आहे. मंदिराच्या आवारात आसरामाता, हनुमान, दत्तात्रय, अष्टभुजा देवी, गणेश आणि गजानन महाराज यांची मंदिरे आहेत.
चामुंडा देवी मंदिरात रोज सकाळी व संध्याकाळी देवीची षोडशोपचार पूजा केली जाते. दर मंगळवारी विशेष पूजा केली जाते, तर दर पौर्णिमेला महाअभिषेक केला जातो. नवरात्र हा या मंदिरातील सर्वांत मोठा व अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव आहे. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी देवीस तिचा भाऊ मानल्या गेलेल्या बालाजीकडून साडी-चोळीचा आहेर पाठवला जातो. हा आहेर आल्यानंतरच येथे अष्टमीचा होमविधी सुरू होतो. या मंदिरात नारायण नागबळी, पितृदोष शांती आदी विधीही केले जातात.