चक्रधर स्वामी मंदिर

हरताळा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव 

महाराष्ट्रातील एक महान परिवर्तनवादी संत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीकृष्णावतारी चक्रधर स्वामी यांची महाराष्ट्र ही कर्मभूमी होय. त्यांनी आपल्या अनुयायांनामहाराष्ट्री असावेअसा आदेश दिला होता. त्याच प्रमाणे त्यांनी मराठी भाषेस धर्मभाषेची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी भ्रमण वास्तव्य केले. त्यांची पदकमले ज्याज्या ठिकाणी लागली ती स्थळे महानुभावांसाठी तीर्थासम पवित्र आहेत. खान्देशातील असेच एक स्थळ म्हणजे हरताळा होय. या ठिकाणी चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान तसेच त्यांचे मंदिर आहे

सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा काळ हा बाराव्या शतकातील आहे. देवगिरी येथील कन्हरदेव, महादेव, आणणदेव आणि रामदेव या यादव नृपतींची कारकीर्द त्यांनी पाहिली होती. ते श्रीकृष्णाचे अवतार असल्याची पंथीय श्रद्धा आहे. त्यांनीउत्तरापंथे प्रयाणकेल्यानंतर त्यांचे पट्टशिष्य नागदेवाचार्य यांनी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग (लीला), तसेच चक्रधरांनी निरुपलेले विचारशास्त्र, अर्थज्ञान यांचे वर्णन केले ते म्हाइंभट यांनी लिहून घेतले. याच बरोबर म्हाइंभट यांनी स्वामी जेथे जेथे गेले होते, तेथे जाऊन त्यांच्या लीला एकत्र केल्या. शके १२००च्या मध्यापर्यंत हे कार्य चालले होते. यातून मराठीतील आद्य चरित्रग्रंथलीळाचरित्रसाकारला. या ग्रंथानुसार, चक्रधरांचा जन्म गुजरातमधील भडोच येथे झाला

त्या काळी गुजरातला लाट देश या नावाने संबोधले जाई. या देशातील क्षत्रिय राजपूत सोळंकी कुळातील सम्राट विशालदेव सम्राज्ञी माल्हनदेवी यांच्या पोटी चक्रधरांचा जन्म झाला. त्यांचे पाळण्यातील नाव हरपाळदेव असे होते. .. १२१० मध्ये सिंघणदेव यादव यांच्या खोलेश्वर या सेनापतीने लाट देशावर स्वारी केली. त्यावेळी हरपाळदेव हे २३२४ वर्षांचे होते. त्यांनी या युद्धात गुर्जर सेनेचा पराभव होत असल्याचे पाहून राजकुमार हरपाळदेवाने आपल्या हाती लढाईची सूत्रे घेतली. त्यांच्या प्रेरणेने शौर्याने यादव सेनेचा पराभव झाला. मात्र त्या युद्धात झालेली जीवितहानी पाहून हरपाळदेव व्यथित झाले. त्या दुःखाने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला त्यातच त्यांचे निधन झाले. शोकमयी वातावरणात त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यात आले. मात्र तेथे मोठा चमत्कार झाला. सरणावर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सम्राट विशालदेव यांनी हपराळदेवांच्या चेहऱ्यावरील वस्त्र बाजूस केले असता त्यांचे डोळे उघडले असल्याचे दिसले. मात्र आता ते पहिल्यासारखे राहिले नव्हते. त्यांच्या मनाने वैराग्य स्वीकारले होते. अशात एके दिवशीस्वसंबंधीयांचा संबंध तो विशेषतः त्याज्यअसा विचार करून गुजरातचा आणि स्वकीयांचा संबंध त्यांनी कायमचा तोडला. रिद्धपूर येथे त्यांना श्री गोविंदप्रभु यांचे दर्शन झाले. त्यांनी हरपाळदेवांना चक्रधर असे नाव दिले. या विरक्तीच्या काळात त्यांनी सर्वत्र भ्रमण केले. या काळात त्यांची शिकवण चमत्कार पाहून अनेक लोक त्यांचे अनुयायी झाले

या काळात समाजात वैदिक धर्माच्या नावाखाली कर्मकांडयुक्त धर्माचा पगडा निर्माण झाला होता. खरा धर्म लोप पावला होता बाह्य आचारांचे अवडंबर माजले होते. या परिस्थितीत चक्रधर स्वामींनी येथे समाजोद्धाराचे थोर कार्य केले. घट्ट चातुर्वर्ण्य व्यवस्थेला धडक देऊन स्त्रीशूद्रांसह सर्वांना धर्माचा, मोक्षाचा अधिकार असल्याचा संदेश त्यांनी दिला. सामाजिक समतेची ग्वाही देणाऱ्या महानुभाव पंथाची स्थापना त्यांनी केली

आपल्या महाराष्ट्र भ्रमणाच्या काळात ते खानदेशातील चांगदेव या गावाहून सावळदबारा येथे जात होते. त्या प्रवासात ते हरताळा येथे थांबले होते, असे सांगण्यात येते. म्हाइंभटांच्यालीळाचरित्रा वा पंथीयांच्यास्थान पोथीमध्ये हरताळाचा स्पष्ट उल्लेख नसला, तरी लोक समजुतीनुसार त्यांनी चांगदेव नजीकचे दुधाळा हरताळा येथे वास्तव्य केल्याचे मानले जाते. ‘लीळाचरित्राच्या पूर्वार्धात ४२० क्रमांकाचीमार्गी व्याघृ पाठीं एणेंही लीळा आहे. चांगदेवावरून सावळदेवाकडे जात असताना रस्त्यात त्यांना वाघ दिसला. त्यांच्या सोबत साउमा, बाईसा आदी शिष्यगण होता. ते सर्व घाबरले. परंतु तेव्हा सर्वज्ञ चक्रधर स्वामी म्हणाले, कीबाइ : भीया नको : हा कोण्हाचें काहीं करी :’ त्यानंतर ते चालू लागताच तो वाघ त्यांच्या पाठी येऊ लागला. एका गावानजीक येता चक्रधर स्वामी उभे राहिले त्या वाघास म्हणाले, ‘माहात्मां आतां जा :’ त्यानंतर तो वाघ तेथून गेला. ही घटना हरताळा परिसरात घडली असल्याचे मानले जाते

हरताळा गावाच्या पूर्वेला एका तळ्याकाठी उंच ठिकाणी चक्रधर स्वामींचे मंदिर वसलेले आहे. मंदिर परिसरास मोठे प्रवेशद्वार आहे. येथून काही अंतरावर आधुनिक पद्धतीने बांधलेले स्वामींचे मंदिर आहे. मंदिरास प्रशस्त खुल्या पद्धतीचा सभामंडप आहे. सभामंडपासमोर समोरून खुला असलेला उपसभामंडप आहे. येथे दर्शनी भागात वर निमुळते होत गेलेले मोठे चार षट्कोनी स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. यापुढे मंदिराचे गर्भगृह आहे. त्यास कोरीव नक्षीकाम असलेले प्रवेशद्वार आहे. त्यावरीलआपको पुजारी जी का दंडवत प्रणाम हैहे वाक्य लक्ष वेधून घेते. आत लाकडी आसनावर विराजमान चक्रधर स्वामींची मूर्ती आहे. मूर्तीस पितळी मुखवटा आहे. तेजस्वी नेत्र, धारदार नाक, ओठांवर मिशा अशा या मूर्तीच्या मस्तकी मकरकुंडले असलेला मुकूट आहे. मूर्तीच्या अंगावर खान्देशी पद्धतीचे उपरणे आहे. गळ्यात विविध पुष्पमाला आहेत. मूर्तीच्या समोर असलेला वस्राच्छादित चौथरा स्वामींचे आसनस्थान असल्याचे सांगण्यात येते

या मंदिराच्या डावीकडून काही अंतरावर खालच्या बाजूस जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. तेथे स्वामींचे भोजन स्थान असलेले मंदिर आहे. तळ्याच्या किनारी असलेल्या या ठिकाणी स्वामींनी भिक्षाभोजन केले होते, असे सांगण्यात येते. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी उंच वस्राच्छादित चौथरा आहे. त्यालगत स्वामींची आशीर्वाद मुद्रेतील मूर्ती आहे. या मंदिरावर मोठे षट्कोनी शिखर त्यावर चार स्तरीय कलश आहे. १९८६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला

चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या स्थानी महानुभाव पंथाचे अनुयायी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा द्वितीयेस येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. चक्रधर स्वामी मंदिराच्या परिसरात नव्याने बांधलेले एक दत्तमंदिर आहे. येथे तळ्याच्या मधोमध एका बेटावर साईबाबांचे मंदिर बांधण्यात आले आहे. याच परिसरात श्रावणबाळाचे मंदिर आणि एक पुरातन शिवशक्ती मंदिर आहे.

उपयुक्त माहिती

  • जळगावपासून सुमारे ५८ किमी, तर मुक्ताईनगरपासून किमी अंतरावर
  • मुक्ताईनगर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home