सानपाडा या पूर्णतः ‘निवासी’ उपनगरात व नवी मुंबईचा ‘नेकलेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गापासून अगदी जवळ बुद्धेश्वराचे प्राचीन मंदिर उभे आहे. येथे वाशी–सानपाडा व परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धेश्वराचे प्राचीन शिवलिंग तर आहेच; परंतु हे एक मंदिर संकुल आहे. येथे विविध देव–देवतांची मंदिरे आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांतील सर्व मूर्ती भव्य, सुबक आणि भाविकांच्या मनात भक्तिभाव जागृत करणाऱ्या आहेत. हे मंदिर सानपाडा उपनगरातील एक महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र मानले जाते.
सानपाडा हा पूर्वी वाशी गावाचा एक छोटा पाडा होता. त्यामुळेच त्यास सानपाडा हे नाव प्राप्त झाले. पूर्वी हा सर्व भाग छोट्या बेटांसारखा, खाडीने वेढलेला होता. वाशी ते कोपरी या गावापर्यंत खाडी होती. तिला कालखाडी असे म्हणत. याचे कारण त्या खाडीतील प्रवाह जोरदार असत. सानपाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पूर्वी १०० टक्के आगरी समाजाची वस्ती होती. भातशेती, मिठागरे आणि मासेमारी हे या समाजाचे प्रमुख व्यवसाय होते. येथून मिठाचा मोठा व्यापार चालत असे. कालांतराने येथील खाड्या, दलदलीचा भाग बुजवण्यात आला. १९७२ मध्ये नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर तत्कालीन सरकारने वसवले व वाशी, सानपाडा, शेजारील जुईनगर आदी सर्व भाग एकमेकांना जोडले गेले.
बुद्धेश्वर मंदिराबाबत आख्यायिका अशी की सध्या हे शिवमंदिर ज्या भागात आहे, तो पूर्वी वाशी गावाचाच भाग होता. या मंदिराजवळ एक रांजणीचे झाड होते. त्या खाली ग्रामस्थांपैकी काही जणांना दोन पाषाण पिंडी आढळल्या. आगरी समाज हा मूळचा क्षत्रिय व शैव संप्रदायी. त्यांची शिवशंकरावर नितांत श्रद्धा असल्याने त्यांनी या शिवलिंगांची पूजा सुरू केली. त्यास बुद्धेश्वर असे संबोधले जाऊ लागले. वाशी गावचे ग्रामस्थ शिवराम गोपाळ भगत हे मोठे शिवभक्त होते. ते वाशीतून आपल्या होडीने येथे येऊन नियमित बुद्धेश्वराची पूजा–अर्चना करीत असत. कालांतराने येथे बुद्धेश्वराचे छोटे मंदिर बांधण्यात आले. या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका अशी की १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीचे वारे जोरात होते. वाशी, सानपाडा व परिसरातील आगरी समाजाचे अनेक लोक ब्रिटिशांविरोधातील आंदोलनात हिरीरीने सहभागी झाले होते. याच काळात काही समाजकंटकांनी बुद्धेश्वराच्या मंदिरातील एक पिंडी चोरून नेली. आगरी समाजाच्या धार्मिक श्रद्धांवर आघात करण्याचा तो प्रयत्न होता. मात्र ही पिंडी चोरून नेल्यानंतर त्या समाजकंटकांवर अनेक आपत्ती आल्या. त्यांना वाईट अनुभव येऊ लागले. अखेर एके दिवशी त्यांनी ती शिवपिंडी मंदिरात गुपचूप आणून ठेवली.
असंख्य लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आला. शिवराम भगत यांचे नातू नाखवा काशिनाथ भगत यांनी काही वर्षांपूर्वी मंदिराचे नूतनीकरण केल्यानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. पाम बीच मार्गावरून सानपाड्यात जाण्याकरीता बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलालगत मोठ्या भूखंडावर बुद्धेश्वराचे हे मंदिर संकुल वसलेले आहे. मंदिरास मोठी प्रवेशकमान आहे. आत मोठे प्रांगण आहे. या ठिकाणी सातत्याने विविध धार्मिक उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत असतात.
प्रवेशकमानीतून आत आल्यानंतर समोरच्या बाजूस डावीकडे बुद्धेश्वराचे मुख्य मंदिर आहे. या मंदिरासमोर संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची मोठी मूर्ती विराजमान आहे. त्याच्या बाजूलाच एका वृक्षाखाली दगडी पादुका आहेत. या पादुकांच्या चौथऱ्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गोलाकार चौथऱ्याच्या चारी बाजूंना मोठ्या नागप्रतिमा कोरलेल्या आहेत. एकंदरच या मंदिरामध्ये ठिकठिकाणी नागप्रतिमा आढळतात. एवढेच नव्हे, तर येथे भगवान विष्णूची मूर्तीही शेषशायी स्वरूपातील आहे. नवी मुंबई हा कोकणाचा भाग असून प्राचीन काळी कोकणात नागवंशीय लोक मोठ्या प्रमाणावर राहात असत. पुरातनकाली पातालात किंवा रसातलात नागलोक राहात अशी समजूत होती. महीतल हा याचाच एक भाग. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘कोंकण व नागलोक’ या संकीर्ण निबंधात (राजवाडे लेखसंग्रह, भाग २, पा. २२९–२३५) असे म्हटले आहे, की महीतलाच्या प्रदेशाला किंवा प्रदेशाच्या काही भागाला पुढे अपरान्तक असे नाव पडले. नागांची नाना कुळे होती. वासुकी, तक्षक, कर्कोटक, कालीय, कुकुण ही त्यातीलच काही. कुळांच्या या संस्कृत नावावरून पुढे मराठीत आडनावे आली. यातीलच कुकुण या नागकुलातील एका पराक्रमी व्यक्तीवरून कोंकण हे नाव पडले. नागवंशाच्या प्राचीन खुणा आजही अस्तित्वात आहेत. आगरी समाज हा मूळचा शैव परंपरेतील असल्याने या समाजात नाग पवित्र देवतेच्या स्वरूपात पूजला जातो. बुद्धेश्वर मंदिर प्रांगणात नागयुगुलांची मोठी मूर्तीही आहे.
बुद्धेश्वराचे मुख्य मंदिर उंच जगतीवर उभारलेले आहे. काही पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपास गोलाकार स्तंभ आहेत व त्यांवर तारकांची नक्षी आणि मोठ–मोठ्या नागप्रतिमा कोरलेल्या आहेत. मुखमंडपात एका चौथऱ्यावर नंदी व त्या समोर कासव आहे. या दोन्ही प्राचीन मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. येथून दोन पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या द्वारस्तंभांवरही तळाशी नागप्रतिमा पाहावयास मिळते. येथील प्रवेशद्वाराला समुद्रमंथन महाद्वार असे नाव दिलेले आहे. त्यानुसार आकर्षक लाकडी दारावर समुद्र मंथनासंदर्भातील शिल्पे कोरली आहेत. त्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचीही शिल्पे आहेत.
सभामंडप आधुनिक बांधणीचा, अर्धखुल्या पद्धतीचा व अत्यंत प्रशस्त असा आहे. जीर्णोद्धार करताना सफेद संगमरवर वापरल्याने तो आणखी आकर्षक झाला आहे. सभामंडपात प्रवेश करताच डावीकडे सुंदर पालखीसदृश्य झोपाळा पाहावयास मिळतो. त्यामध्ये कृष्णाची मूर्ती आहे. समोर डावीकडे गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीच्या उंच पीठावरील देव्हाऱ्याच्या छतावर ब्रह्मा–विष्णू–महेशाच्या छोट्या मूर्ती विराजमान आहेत. उजवीकडील देव्हाऱ्यात विठ्ठल–रुक्मिणीची मूर्ती आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार रुंद व लाकडी आहे. येथील दरवाजांवरही मोठ्या नागप्रतिमा कोरलेल्या आहेत. गर्भगृहात प्रवेश करताच समोरच एक वैशिष्ट्यपूर्ण कमान दिसते. दोन झाडांचे बुंधे एकमेकांस जोडून तयार केल्यासारखी दिसणाऱ्या या कमानीच्या स्तंभांवर विविध प्राण्यांच्या आणि देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यावर बैलगाडीच्या चाकासारखे चक्र आहे. हे कालचक्राचे प्रतीक मानले जाते. या गर्भगृहात मध्यभागी संगमरवरात बांधलेले गोलाकार व काहीसे खोल विवर आहे. त्यात उतरण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. खाली भूतलावर बुद्धेश्वराची प्राचीन पिंडी आहे. ही पिंडी छोटेखानी व मानुषलिंग प्रकारची आहे. मानुषलिंगाचे तीन भाग असतात. त्यातील खालचा ब्रह्मभाग, मधला विष्णूभाग आणि वरचा शिवभाग असे त्याचे स्वरूप असते. शिवभागात उर्ध्वपाषाण असतो. पिंडीवर नागफणा असून, त्यावर तांब्याची गलंतिका म्हणजे अभिषेक पात्र टांगलेले आहे. या पिंडीस बाहेरच्या बाजूने पिंडीच्याच आकाराचा छोटा संगमरवरी कठडा आहे.
या मंदिरात दर सोमवारी आणि विशेषतः श्रावणीतील सोमवारी भाविकांची जास्त वर्दळ असते. महाशिवरात्रीला संपूर्ण नवी मुंबईतील भाविक येथे दर्शनाला येत असतात. त्यामुळे सकाळी चार वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत येथे भाविकांची मोठी रांग लागलेली असते.
या गर्भगृहातच उजव्या बाजूला बाहेर पडण्यासाठी दरवाजा आहे. तेथे बाजूलाच विष्णूची मोठी देवळी आहे. यामध्ये सुमारे १० फूट आडवी व पाच फूट उंच अशी विष्णूची भव्य शेषशायी मूर्ती आहे. त्या शेजारी कार्तिक स्वामींची देवळी आहे. या देवळीस पडदा लावलेला असतो. त्यालगत असलेल्या देवळीत लक्ष्मी, पार्वती व सरस्वती यांच्यासह दुर्गामातेचे स्थान आहे. त्याच्या शेजारील देवळीत भैरवनाथाची मोठी पाषाणमूर्ती विराजमान आहे. येथेच नागदेवतेची भव्य शिळा आहे. त्यावरील भागात नागयुगुलांची उठावशिल्पे असून, मधल्या भागी दोन नागपुरुषांचे मुखवटे आहेत.
बुद्धेश्वराच्या मुख्य मंदिराच्या सभामंडपालगत बाहेरच्या बाजूला एका उंच ओट्यावर नाखवा काशिनाथ भगत यांचा भव्य पुतळा उभारलेला आहे. होडीत उभ्या असलेल्या या पुतळ्याच्या हातात मोठे वल्हे आहे. पुतळ्याखालील शिळांवर विविध माशांची नावे कोरलेली आहेत.
मंदिर परिसरात अनेक देवतांची मंदिरे आहेत आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व मूर्ती आखीव–रेखीव व भव्य आहेत. बुद्धेश्वराच्या मुख्य मंदिराच्या समोरच काही अंतरावर खुल्या आकाशाखाली हनुमानाची हातात नीलवर्णी राममूर्ती घेतलेली रंगीत मूर्ती आहे. त्या शेजारी उजवीकडे अय्यप्पा स्वामी यांचे मंदिर आहे. या मंदिरास खेटूनच पाठीमागच्या बाजूस साईबाबांचे मोठे मंदिर आहे. या मंदिराच्या बाह्यबाजूस असलेल्या उंच देवकोष्टकांत डावीकडे बालाजी, तर उजवीकडे त्रिमुखी दत्ताची मूर्ती विराजमान आहे. या देवकोष्टकांच्या मध्ये असलेल्या प्रवेशद्वारातून पाच पायऱ्या चढून साई मंदिरात प्रवेश होतो. आत उंच चौथऱ्यावर साईबाबांची सिंहासनाधिष्ठित मूर्ती प्रतिष्ठापित आहे व मूर्तीच्या मागील बाजूच्या भिंतीवर पंचमुखी नागाचा फणा आहे. या मंदिरातच उजवीकडील भिंतीवर विश्वकर्म्याची पाषाणमूर्ती आहे. साईबाबा मंदिराच्या बाह्यभिंतीवर संगमरवरात कोरलेले दशावतारांचे भव्य उठावशिल्प आहे. या मंदिरात अभिषेक व अनेक विधी होत असतात.
या शिवाय या प्रांगणात कालिमाता, पंचमुखी हनुमान, सूर्यपुत्र शनी, नवग्रह यांचीही स्थाने आहेत. या सर्व मूर्ती भव्य आहेत. कालीमातेची मूर्ती दहा फूट उंचीची, शनीची मूर्ती पाच फुटांची, तर पंचमुखी हनुमानाची मूर्ती १८ फूट उंचीची आहे. येथे विशेष म्हणजे पंचमुखी हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. त्यातील एक मूर्ती तुलनेने लहान आहे. ती आधीची प्राचीन मूर्ती असल्याचे सांगण्यात येते. नूतनीकरणाच्या वेळी त्याच मूर्तीची मोठी प्रतिकृती येथे प्रतिष्ठापित करण्यात आली.
बुद्धेश्वर शिवलिंगाप्रमाणेच विविध देव–देवतांची मंदिरे असल्यामुळे या मंदिर संकुलात सतत भाविकांची वर्दळ असते. मंदिराच्या विश्वस्त संस्थेतर्फे येथे श्रावण उत्सव, शिवरात्र, हरिनाम सप्ताह, नवरात्र असे विविध उत्सव व कार्यक्रम भव्य स्वरूपात साजरे करण्यात येतात. या मंदिरांत भाविकांना सकाळी ५ ते दुपारी १.३०, तर दुपारी ३.१५ ते रात्री ११ पर्यंत दर्शन घेता येते.