
दक्षिण काशी म्हणून ख्याती असलेले ब्रह्मनाथ मंदिर जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथे कमंडलू नदीकिनारी आहे. कमंडलूसारखा वळसा घेतल्याने या नदीला कमंडलू नदी म्हणून ओळखले जाते. अतिशय प्राचीन असलेल्या ब्रह्मनाथ मंदिराच्या ठिकाणी दर १२ वर्षांनी भरणारी येथील कुंभमेळ्याची यात्रा प्रसिद्ध आहे.
पारुंडे गावाला पौराणिक संदर्भ आहे. पराशर ऋषींनी या ठिकाणीच शेतीचा अभ्यास केला आणि ‘कृषी पराशर’ ग्रंथाची निर्मिती केली. त्यांच्या या वास्तव्यामुळे गावाला पारुंडे नाव पडल्याचे म्हटले जाते. कालांतराने पारुंडे हे नाथ संप्रदायाचे प्रमुख केंद्र झाले. ८०० वर्षांपूर्वी नाथपंथीय सिद्धपुरुष बाबा ब्रह्मनाथ यांनी येथे समाधी घेतल्यानंतर हे शिवालय उभारण्यात आल्याचे सांगितले जाते.
शिलाहार राजा झंझ आणि त्यांच्या वंशजांनी गोदावरीपासून भीमा नदीपर्यंतच्या नदीउगमांजवळ १२ शिव मंदिरे बांधली आहेत.
त्यापैकी ब्रह्मनाथाचे मंदिर शिलाहार काळात बाराव्या शतकात बांधून पूर्ण झाल्याचा उल्लेख आढळतो. मंदिराशेजारी श्री ब्रह्मनाथ महाराजांची समाधी आहे. मंदिरासभोवती दगडी तटबंदी आहे. या तटबंदीमध्येच असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर तीन महिरपी कमानी असून त्यावर तीन कळस आहेत. मंदिरात योगसंबंधी शिल्पांचा दुर्मीळ आविष्कार पाहायला मिळतो. येथे सहा स्तंभांवरील शिल्पांद्वारे तत्कालीन नाथ संप्रदायाचा योगाभ्यास, इतिहासाचा मागोवा घेण्यात आला आहे. विविध आसन, मुद्रा, क्रिया, नृत्य आदी दृश्यांच्या आकृत्यांमधून त्याचा प्रत्यय येतो. येथे उर्ध्व धनुरासन, नाथराजासन, गरुडासन, नौकासन, गोमुखासन, अनंतासन, सुखासन यांसह अनेक आसनांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. नृत्यमुद्रांची विविध शिल्पेही देखणी आहेत.
गर्भगृहात दगडी शिवपिंडी असून, येथे बाबा ब्रह्मनाथ आणि बाबा ज्वालानाथ यांचे पंचधातूचे मुखवटे आहेत. या गाभाऱ्यात जाण्यासाठी काही नियम असून केवळ सोहळ्यातच गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन घेता येते. वेळोवेळी करण्यात आलेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिरात थोडेफार बदल केले गेले असले तरी मूळ दगडी बांधकामाच्या रचनेत बदल झालेला नाही.
मंदिराच्या आवारात जुनी दगडी दीपमाळ आहे. येथे श्रीराम-सीता, हनुमंत यांची मंदिरे आहेत. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या शांत, निसर्गरम्य परिसरामुळे येथे आध्यात्मिक शांतीची अनुभूती मिळते.
श्रावण महिन्यात दर सोमवारी श्री ब्रह्मनाथाची यात्रा भरते. तिसऱ्या श्रावणी सोमवारी देवाची पालखी गावातून फिरवली जाते. गाडाबगाड हा पारंपरिक प्रकार हे या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यात बैलगाडीवर लाकडी खांब अशा पद्धतीने बांधलेले असतात की, चक्राप्रमाणे ते गोल गोल फिरले जातील. त्या खांबांच्या दोन्ही टोकांना नवस करणारे भाविक लोंबकळतात. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक गर्दी करतात. तिसऱ्या श्रावणी सोमवारबरोबरच चैत्र पौर्णिमा, विजयादशमी, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा हे दिवस येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. पहाटे ५ व सायंकाळी ७ वाजता मंदिरात आरती होते. पहाटे ५ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९.३० या वेळेत भाविकांना मंदिरात देवदर्शन करता येते.