बोधले महाराज मंदिर

धामणगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर

कुप्रथांचे ग्रहण लागलेल्या समाजाच्या आणि धर्माच्या उत्थानासाठी देवाने अनेक संतांच्या रूपाने महाराष्ट्र भूमीत जन्म घेतला. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, जनाबाई, चोखामेळा अशा अनेक संतांनी आपल्या ओव्या, अभंग, भारुडे, कीर्तन आणि प्रवचनातून धर्मात शिरलेल्या अनिष्ट प्रथा परंपरा आणि चालीरीतींचे खंडन केले. याच परंपरेतील संत बोधले महाराज अवघ्या महाराष्ट्राला परिचीत आहेत. बार्शी तालुक्यातील धामणगाव या त्यांच्या जन्मगावी बोधले महाराजांचे समाधी मंदिर आहे. प्रसिद्ध भक्ती विजय ग्रंथात महाराजांबद्दल वर्णन आहे. महाराजांनी रचलेले अभंग त्यांच्या भक्तांच्या मुखी आजही कायम आहेत.
बालेघाटच्या पायथ्याशी नागझरी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर सतराव्या शतकातील आहे व पाच पांडवांपैकी धर्मराजाने स्थापित केलेले येथील धर्मेश्वर शिवलिंग हजारो वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. याच धर्मेश्वर शिवमंदिरावरून गावास धर्मेश्वर ग्राम व पुढे धामणगाव नाव पडले. या गावात सन १६०४ साली जन्मलेल्या बोधले महाराजांनी १६९४ साली वयाच्या ९० व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. त्यांचे हे समाधी मंदिर सतराव्या शतकातील आहे.
संतश्री माणकोजी बोधले महाराज यांचे खरे नाव माणकोजी जगताप. वडीलबंधू शिवाजी जगताप धार्मिक प्रवृत्तीचे व वारकरी संप्रदायाचे असल्याने वडिलांची पाटीलकी माणकोजी जगताप यांच्याकडे आली. एकदा माणकोजी आपल्या मोठ्या भावासोबत पंढरपूरच्या वारीला गेले असता तेथील विठ्ठलमय वातावरण त्यांच्या मनास खूप भावले. त्यांनी पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास घेतला व चौदा दिवस पंढरपुरात विठ्ठलाचा शोध घेत अन्नपाण्यावाचून राहिले. त्यावेळी पांडुरंगाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन बोध केला. म्हणून त्यांना बोधले महाराज नावाने ओळखले जाऊ लागले. महाराज पांडुरंगाची मूर्ती घेऊन धामणगावी आले व संत तुकाराम आणि रामदास स्वामी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करवून त्यांनी तेथे मंदिर बांधले. तेव्हापासून आजतागायत धामणगावी आषाढीचा सोहळा पाच दिवस साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देव पंढरपुरातून धामणगावात येतात व पाच दिवस राहतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीत दुमजली महाद्वार आहे. महाद्वाराच्या दोन्ही बाजूला जुन्या पद्धतीच्या खिडक्या व वरील मजल्यावर नगारखाना आहे. महाद्वारास विशाल लाकडी झडपा व आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. या प्रवेशद्वारातून दगडी फरसबंदी असलेल्या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात संत बोधले महाराज यांचे समाधी मंदिर आहे. हे मंदिर सुमारे पाच फूट उंच चौथऱ्यावर कोरीव पाषाणात बांधलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. मंदिरात मध्यभागी बोधले महाराज यांच्या समाधीचा चौथरा व त्यावर महाराजांचा फेटा धारण केलेला चांदीचा मुखवटा आहे.
मंदिरात मागील भिंतीलगत वज्रपिठावर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. मंदिराचे घुमटाकार छत भिंतींवर तोललेले आहे. मंदिराच्या छतावर चारही कोनांवर मिनार सदृश स्तंभ आहेत. त्यावर आमलक व आमलकावर पाषाणी कळस आहेत. छतावर मध्यभागी घुमटाकार शिखर, शीर्षभागी स्तूपिका व त्यावर चांदतारांकित कळस आहे. समाधी मंदिराची रचना पाहता त्यावर मुस्लिम स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्ट दिसून येत आहे. मंदिराच्या प्रांगणात महाराजांची पत्नी ममताई व पुत्र लखमोजी यांच्या समाध्या तसेच भागीरथी बाई, भगवंत, भानजी, बजाजी, धुंडिराज, रंगुबाई, एकनाथ, अकृत, भाऊसो इत्यादी संत महंतांच्या समाध्या आहेत. सर्व समाधी मंदिरांची रचना साधारणतः सारखीच आहे.
प्रांगणात प्राचीन धर्मेश्वर शिवमंदिर आहे. या मंदिरासमोर नव्याने बांधलेला प्रशस्त व खुल्या स्वरूपाचा रांगमंडप आहे. रांगमंडपाला लागून बाह्यबाजूला तुलसी वृंदावन आहे. वृंदावनाखाली तळघरात विष्णूचे पाषाणात कोरलेले प्राचीन शिल्प आहे. विष्णूच्या माथ्यावर छत्र धरलेले नागशील्प आहे. रांगमंडपात प्राचीन मूर्ती व संत दाजीबुवा महाराज यांची समाधी आहे. रांगमंडपापुढे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेला सभामंडप व गर्भगृह आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत व स्तंभदंडात ते चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारात आहेत. स्तंभदंडातील चौकोनी पटावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला, देवकोष्टके आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. मंडारकास चंद्रशिळा आहे. गर्भगृहात मध्यभागी अखंड पाषाणातील शिवपिंडी आहे. अशी मान्यता आहे की ही पिंडी पांडवांचे मोठे बंधू धर्मराजाने येथे स्थापित केलेली आहे.
मंदिराच्या प्रांगणात तटबंदीलगत दगडी बांधणीच्या प्राचीन ओवऱ्या आहेत. प्रांगणात जलकुंभ आहे. प्रांगणातील वृक्षाच्या पारावर प्राचीन शिल्पे व नागशिळा आहेत. मंदिराच्या परीसरात महाराजांनी काशीचे तीर्थ आणले तो टाका, देव पडवी इत्यादी स्थाने आहेत.
मंदिरात वर्षातून दोन वेळा आषाढी व कार्तिकी एकादशी ते पौर्णिमा असा पाच दिवसांचा जत्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी पंढरपूर येथून पांडुरंगाची पालखी धामणगावात येते. यावेळी राज्यभरातून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व पांडुरंगाच्या पालखीत सहभागी होण्यासाठी येतात. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत देवाचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. या पालखीत भालदार व चोपदार हे मुस्लिम समाजाचे असतात. सलग पाच दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मंदिरात ज्येष्ठ वद्य तृतीया हा माणकोजी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा, दसरा, दिवाळी, पाडवा आदी वर्षभरातील महत्त्वाचे सण व उत्सव साजरे केले जातात. उत्सवकाळात राज्यभरातून हजारो भाविक बोधले महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. याशिवाय दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना येथे बोधले महाराज समाधीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • बार्शी शहरापासून ३३ किमी अंतरावर
  • सोलापूरपासून ४२ किमी अंतरावर
  • बार्शी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home