
हिंदू धर्मात वाढलेले कर्मकांड व जातिभेदाच्या प्रस्थाविरुद्ध प्रचार–प्रसार करणारे अनेक धर्म–पंथ उदयास आले. त्यांतील थोर बंडखोर संत, समाजसुधारक आणि साक्षात्कारी पुरूषांनी समाजास नवविचार देऊन सन्मार्गावर आणण्याचे कार्य केले. या विचारांचा प्रचार आणि प्रसार करताना गुरूशिष्य परंपरा निर्माण झाली व त्यातून अनेक सत्पुरूषांची पूज्यस्थळे निर्माण झाली. बिसलसिद्धेश्वर हे याच गुरूशिष्य परंपरेतील सिद्धपुरूष आहेत. अचकनहळ्ळी गावात त्यांचे प्राचीन देवस्थान उभे आहे. बिसलसिद्धेश्वरांच्या दर्शनाने मानोवांच्छित फलप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कन्नड भाषेत बिसल म्हणजे ऊन वा तप्त सूर्यकिरणे. असे सांगण्यात येते की जटाधारी सिद्धेश्वर स्वामी हे एक योगी पुरूष होते. ते आजन्म संन्यासी होते. भगवी लुंगी व गळ्यात रुद्राक्षमाळा असा त्यांचा वेश असे. ते बारा महिने, आठ काळ उन्हात बसून तपश्चर्या करीत असत. त्यामुळेच त्यांना बिसलसिद्धेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे वास्तव्य कर्नाटकातील कल्याणपट्टण येथे असे. जत येथील डफळे सरकार यांच्या संस्थानच्या काळात बिसलसिद्धेश्वर यांचे वास्तव्य येथून जवळच असलेल्या काराजनगी या गावात काही काळ होते, असेही सांगण्यात येते. येथून ते अच्युतपूर म्हणजेच आताचे अचकनहळ्ळी येथे आले. कालांतराने येथे त्यांनी आपला देह शिवलिंगास अर्पण केला. आज त्या ठिकाणी त्यांचे समाधीमंदिर उभे आहे.
या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की जत तालुक्यातील मिरवाड व पंचक्रोशीतील गावांचे प्रमुख नंदेप्पागौडा यांना एक मुलगा होता. त्याचे नाव महालिंग असे होते. त्याला वयाच्या बाराव्या वर्षी कुष्ठरोग झाला. तेव्हा गावातील एका जंगमाने सांगितले की कल्याणपट्टणमध्ये सिद्धेश्वर नावाचे
महान तपस्वी राहतात. त्यांच्याकडे गेल्यास हा आजार बरा होईल. त्यानुसार नंदेप्पागौडा हे महालिंगास घेऊन सिद्धेश्वर स्वामींकडे गेले. त्यांनी स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले. बारा वर्ष महालिंगप्पा हे स्वामींची सेवा करीत होते. त्यांच्या कृपेने महालिंगाची व्याधी दूर झाली. त्यानंतर एकदा महालिंगप्पाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून त्यांनी त्याला सांगितले की तुझा आजार बरा झाल्यानंतर तुला घरी पाठवतो, असे मी तुझ्या मातेस सांगितले आहे. तेव्हा तेथे जाऊन तू तुझी सेवा रूजू कर.
त्यानुसार महालिंग हे मिरवाड या आपल्या गावी परतले. मात्र ते रोज मिरवाडहून कल्याणपट्टण येथे जाऊन तेथील अग्निकुंडात दूध–दही–तुपाची आहुती देत असत. त्यांच्या सेवेने बिसलसिद्धेश्वर स्वामी प्रसन्न झाले. एकदा महालिंगप्पाच्या इच्छेनुसार ते मिरवाडला येत असताना काही काळ त्यांनी काराजनगी येथे वास्तव्य केले. तेथे त्यांचे परमशिष्य रेवण्णा यांचा निवास होता. या गावातील जुन्या शिवमंदिरात काही काळ थांबल्यानंतर त्यांनी मिरवाडला प्रस्थान ठेवले. जाताना मध्येच ते अचकनहळ्ळी येथे एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. तेथेच त्यांनी निर्वाणाचा विचार पक्का केला. एके दिवशी त्यांनी तळहातावर इष्टलिंग धरून, त्यावर दृष्टी स्थिर करून आपला देह सोडला. ते पाहताच त्यांचे शिष्य रेवण्णा यांनीही प्राणत्याग केला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर महालिंगानेही आपले प्राण सोडले व त्याचा आत्मा लिंगदेवाशी एकरूप झाला.
बिसलसिद्धेश्वरांच्या या समाधीमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अलिकडील काळात बांधलेली स्वागत कमान आहे. दोन्ही बाजूला नक्षीदार चौकोनी स्तंभ व त्यांना जोडणाऱ्या सज्जावर मध्यभागी शिवपिंडी व दोन्ही बाजूला नंदी मूर्ती आहेत. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ व त्यापुढे पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेले प्रांगण आहे. मंदिराभोवती सुमारे बारा फूट उंचीची भक्कम दगडी
बांधणीची तटबंदी आहे. तटबंदीतील प्रवेशद्वार सुमारे वीस फूट उंचीचे आहे व त्यावर आडव्या रचनेचे शिखर आहे. शिखरावर दोन्ही बाजूला सिंहशिल्पे आहेत. प्रवेशद्वारावर उभी व आडवी पाच कोष्टके आहेत व मध्यभागी अर्धचंद्राकार कमान आहे.
या प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रशस्त मंडपात प्रवेश होतो. या मंडपावर भाविकाच्या सोयीसाठी पत्र्याचे छत लावलेले आहे. मंडपात दोन चौथऱ्यांवर षट्कोनी अकराच्या दोन नक्षीदार दीपमाळा पत्र्याच्या छतातून वर गेलेल्या आहेत. दीपमाळांच्या पुढे नंदीमंडप आहे. चौथऱ्यावर उभ्या असलेल्या नंदीमंडपात नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती व सभोवती सहा नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभपादावर उभ्या स्तंभांच्या शीर्षभागी कणी, त्यावर हस्त व हस्तांवरील तुळईवर छत आहे. छतावर समोरील बाजूला दोन गजराज शिल्पे आहेत. मध्यभागी श्रीकृष्णाची मूर्ती आहे. नंदीमंडपात गणपतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मंडपात भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी दर्शनरांगेची व्यवस्था आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कक्षासने आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके आहेत. नक्षीदार चौकोनी स्तंभ कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. मंडारकावर कीर्तिमुख शिल्प आहे. गर्भगृहात एक लांबट सपाट काळा पाषाण आहे. याचा पाषाणाची बिसलसिद्धेश्वर म्हणून पूजा केली जाते. त्यांच्या मागे रेवण्णा व महालिंग यांच्या चांदीचे मुखवटे घातलेल्या पाषाण मूर्ती आहेत. असे सांगण्यात येते की येथे बिसलसिद्धेश्वर स्वामी हे झोपलेल्या अवस्थेत आहेत व त्यांचे शिष्य–परिचारक रेवण्णा स्वामी हे बसलेल्या अवस्थेत आहेत.
श्रावणातील शेवटच्या सोमवारी येथे वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. त्यापूर्वी संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिरात विविध विधी व उत्सव साजरे होतात. मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर विहीर असून ते देवाचे स्नानकुंड असल्याचे सांगितले जाते. श्रावणातील पहिल्या सोमवारी देवाचे स्नानकुंड विधिवत स्वच्छ केले जाते. मग गावातील महालिंगेश्वर व बिसलसिध्देश्वर मंदिरातून देवाची पालखी स्नानकुंडाजवळ आणली जाते. येथे देवांना स्नान घातले जाते. नंतर देव पालखीत बसून पुढील महिनाभर भक्तांच्या घरी पालखी मिरवणुकीने फिरतात. पहिला आठवडा अचकनहळ्ळी गावात, दुसरा आठवडा कर्नाटकातील अनंतपुर, तिसरा आठवडा हल्लाळ येथील नदीवर थांबून चौथ्या गुरुवारी पालखी सिध्देश्वर मंदिरात परत येते. चौथ्या सोमवारी यात्रा भरते. या संपूर्ण पालखी परिक्रमा सोहळ्यात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातून हजारो भाविक सहभागी होतात.