बिरोबा मंदिर

आरेवडी, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या कवठे महांकाळ तालुक्यात धनगर समाजाचे कुलदैवत समजले जाणारे बिरोबाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. हे देवस्थान अत्यंत प्राचीन असल्याचे सांगितले जाते. नवसाला पावणारा देव, अशी ख्याती असल्यामुळे लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. चैत्र शुद्ध षष्ठीला भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत, धनगरी ढोलकैताळांच्या निनादात येथे भरणारी बिरोबाची यात्रा हा एक मोठा उत्सव असतो. या यात्रेसाठी तीन लाखांहून जास्त भाविक उपस्थित असतात. बिरोबाचे बन म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण तीन गावांच्या वेशीवर स्थित आहे

धनगर समाजाचे आराध्यदैवत आणि अठरापगड जातीच्या लोकांचे श्रद्धास्थान असलेला बिरोबा हा बिरदेव, विरुबा, विरोबा, बिरप्पा किंवा विरूपा, वीरण्णा या नावांनीही ओळखला जातो. ‘श्री विठ्ठल बिरदेव माहात्म्य कथासारया ग्रंथाच्या प्रस्तावनेत थोर संशोधक रा. चिं. ढेरे सांगतात की दक्षिणेतील अनेक प्रख्यात राजकुळे गवळीधनगर समाजातून उदयाला आली आहेत. या राजकुलांच्या पुढाकाराने त्यांच्या मूळच्या दैवतांचे वैभव अनेक ठाण्यांत वाढले. ते देव उच्च समजल्या जाणाऱ्या समाजातील देवांचे रूप चरित्र पावले. विष्णूकृष्णरूप श्रीविठ्ठल झाला. मैलाराचा शिवरूप मल्हारी आणि अनेक ठाण्यांत वीरभद्राचा बिरोबा झाला. वीरशैव धर्माच्या प्रभावकाळात धनगरांचे समूह जेव्हा वीरशैव बनले, तेव्हा त्यांचा बिरप्पा शिवपरिवारातील वीरभद्र या देवाचे स्वरूप पावला.

उत्तर कर्नाटकातील यडूर या ठिकाणी असलेले वीरभद्राचे जागतेगाजते क्षेत्र हे मूळचे बिरोबाचे ठाणे आहे, तर विजयनगर साम्राज्याच्या उत्तरपर्वात निर्माण झालेले, स्थापत्य मूर्तिशिल्प या दोन्ही दृष्टींनी जगभर गाजलेले लेपाक्षीचे वीरभद्र मंदिर हे मूळचे बिरोबाचे ठाणे आहे. या बिरोबाची जन्मकथा तसेच माहात्म्य यांचे वर्णनश्री विठ्ठल बिरदेव माहात्म्यया ग्रंथात वर्णिले आहे. ‘सुंबरान मांडिलंया धनगरी ओव्यांतून गायली जाणारी आख्याने यांच्या आधारे दत्तात्रय बोरगावे आणि विठ्ठल ओमापुजारी या बिरोबा भक्तांनी हा ग्रंथ रचला आहे. त्यात अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे की दक्षयज्ञाच्या वेळी शंकराचा अपमान झाल्याने दाक्षायणीने म्हणजेच पार्वतीने आत्मदहन केले. त्यामुळे क्रोधित झालेल्या शंकराने जटा आपटल्या त्यातून वीरभद्राचा जन्म झाला. वीरभद्राने दक्षाचे धड उडवले. त्यावेळी दक्षपत्नीने वीरभद्राची करुणा भाकली. आपल्या पतीस जिवंत करावे, अशी याचना तिने केली. त्यास जिवंत कसे करावे याचा विचार करीत असताना वीरभद्रास जवळच मेंढ्या चारीत असलेला धनगर दिसला. त्याने मेंढीचे शिर दक्षाच्या धडास लावण्याचे ठरवले. त्यावेळी धनगराने वीरभद्राची प्रार्थना केली, ‘श्रेष्ठकुलात आपण अवतार घेतला म्हणून दक्षासारखे शिवनिंदक स्वतःला थोर समजतात. आपण आमच्या हीन कुळात अवतार घ्यावा शिवनिंदक दुष्टांचा संहार करावा.’ तेव्हा वीरभद्राने त्यास सांगितले की कलीयुगात मी धनगरकुलात जन्म घेईन.

पुढे नारदपुरातील राजा ध्रुवाइत याची कन्या गंगासूरवंती (गंगासरस्वती) हिच्या पोटी वीरभद्र म्हणजेच बिरदेवाने जन्म घेतला. मात्र तो पुत्र मातेजवळ राहू शकला नाही. नदीच्या शापामुळे त्याला वनात एका पाळण्यात घालून ठेवावे लागले. त्या शापाची आख्यायिका अशी की आपली कन्या विवाह होता गर्भवती राहिली आहे, या कारणाने गंगासूरवंतीच्या पित्याने तिच्या जेवणात विष कालवले. परंतु गर्भात असलेल्या बिरोबांनी मातेला विषापासून वाचवले, पण उरलेले अन्न सूरवंतीच्या दासीने नदीत टाकले, त्यामुळे जलचर मृत झाले. माझी मुले तू मारलीस म्हणून तुझा मुलगा जन्माला आला की तुझ्यापासून दूर राहील, असा नदीने शाप दिला. त्यामुळे बिरोबाला अरण्यात पाळण्यात ठेवले गेले. तेथे एकव्वा आणि तिच्या धाकट्या बहिणीने त्या बाळाला आपला भाऊ मानले चिंचली येथे नेऊन त्याचा सांभाळ केला. अक्का म्हणजे बहीण, ती आई झाली म्हणून एकव्वाला मायक्का असे नाव पडले. बेळगावजवळ चिंचली येथे तिचे मंदिर आहे. पुढे काही वर्षांनी बिरोबाचे त्याच्या मामेबहिणीशी लग्न झाले, पण तो संसारात रमला नाही. त्याने तपश्चर्या केली विठ्ठलाला भावाच्या रूपात बोलावले. धनगरांना त्रास देणाऱ्या दैत्यांचा या दोघांनी मिळून नाश केला.

देवाच्या येथील स्थानाबद्दल अख्यायिका अशी की कर्नाटकातून ढालगाव येथील डोंगरावर बिरोबा आला तेव्हा डोंगरावरून त्याने दक्षिणेकडे पाहिले असता त्याला मायक्का देवी कृष्णानदी दिसली. तर उत्तरेला चंद्रभागा दिसली. त्यामुळे देवाला हे स्थान फार आवडले तो डोंगरावर स्थानापन्न झाला. नंतर भक्तांसाठी देव डोंगरावरून बनात (वनात) आला.

आरेवाडी, बिलगाव नागज अशा तीन गावांच्या सीमेवर प्रशस्त जागेत हे देवस्थान आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीमधील प्रवेशद्वारातून मंदिराकडे येताना एक स्तंभ लागतो. या स्तंभावर अखंड दिवा तेवत असतो. भाविकांकडून या दिव्यात नवसपूर्तीनंतर तेल वाहण्याची प्रथा आहे. येथून पुढे मुख्य मंदिराच्या समोरील जागेत नंदीमंडप आहे. त्यात नंदीच्या मागे दोन अश्व, पुढे दोन मेंढ्या यासोबतच काही लहानमोठ्या शिवपिंडी आहेत. मंदिरासमोर एक वटवृक्ष आहे. बिरोबाच्या दर्शनासाठी आलेले भाविक या वृक्षाची प्रथम पुजा करून मग मंदिरात दर्शनासाठी जातात. सभामंडप त्याखाली (पाताळस्वरूप) गर्भगृह, अशी या मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे याला चारही बाजूंनी लाकडी, पानाफुलांचे नक्षीकाम असणाऱ्या कमानी आहेत. सभामंडपातून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात यावे लागते

येथील बिरोबा हा जागृत देव असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या गर्भगृहात शेंदूर लावलेला गोपाना, सूर्याबा बिरोबा असे तीन देव आहेत. त्यांच्या माळा, डोळे, मिशा, टिळा सारे चांदीत आहेत त्यांच्या डोक्यावरही चांदीचे नाग आहेत. मागील बाजूस शेषनागाच्या आकृती असलेला चांदीचा पत्रा लावलेला आहे. गर्भगृहाच्या वरच्या भागात काळ्या पाषाणातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती आहेत. बिरोबाच्या उजव्या बाजूला भक्त सूर्याबा पलीकडे बहीण मायाक्का यांचीही मंदिरे आहेत. याशिवाय मंदिर परिसरात बिरोबाची पत्नी कामादेवी हिचेही मंदिर आहे. धनगरी ओवी प्रकारात बिरोबा त्याची आई सुरवंती यांच्या जन्माची कथा सांगितली जाते. सोबतच पत्नी कामादेवी बहीण मायाक्का यांच्याविषयी गाण्यांमधून कथा सांगण्यात येते.

बिरोबा मंदिरात चैत्र महिन्यात मोठी यात्रा पार पडते. यात्रेच्या पहिल्या दिवशी देवाला गोडाचा नैवेद्य असतो. गुढी पाडव्यापूर्वी पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीला तासगावाहून मानाचा पारंपरिक गोडाचा नैवेद्य येतो. षष्ठीला सार्वजनिक गोडाचा नैवेद्य असतो. सप्तमीला बकऱ्याचा बळी देऊन तो मांसाहारी नैवेद्य बिरोबाचा भक्त सूर्याबाला दाखवला जातो. असे सांगितले जाते की बिरोबा लिंगायत होता. त्यामुळे त्याला मांसाहाराचा नैवेद्य नसतो. पण सूर्याबाला मांसाहार चालतो म्हणून हा नैवेद्य फक्त सूऱ्याबाला दाखवला जातो. यामागेही एक अख्यायिका संगितले जाते. विरभद्रांनी जेव्हा मेंढ्याचे शीर कापून ते दक्ष राजाला लावण्यास महादेवाकडे दिले तेव्हा आता या मेंढ्याच्या शरीराचे मी काय करू, असा प्रश्न त्या मेंढपाळाने विचारला. त्यावर माझ्या राक्षसांची भूक शांत करण्यासाठी त्यांना मेंढ्याचे शरीर खायला दे, असे त्याला सांगितले गेले. तेव्हापासून ही बळीची प्रथा येथे सुरू असल्याचे सांगितले जाते.

यात्रा काळात रात्री बिरोबा पालखीचे मंदिरातून प्रस्थान होते. पहाट होईपर्यंत या पालखीच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा होतात पहाटे पालखी मंदिरात परतते. नवरात्रीत घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत अशाच प्रकारच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यात्रेच्या वेळी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. यावेळी धनगर समाजातील पारंपरिक वाद्ये, नृत्य लोककला यांचे सादरीकरण केले जाते. याशिवाय दर रविवारी अमावस्येला हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात

उपयुक्त माहिती

  • कवठे महाकांळपासून २५ किमी, तर सांगलीपासून ६० किमी अंतरावर
  • कवठे महाकांळ खानापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
Back To Home