महात्मा गांधींचे स्नेही व सहकारी, प्रख्यात उद्योजक घनश्यामदास बिर्ला यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या विख्यात बिर्ला समुहाने देशभरात अनेक ठिकाणी हिंदू मंदिर संकुले उभारली आहेत. कलात्मक सौंदर्य आणि धार्मिक वातावरण यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरांपैकी एक, मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर अकोला शहरात वसले आहे. शहराच्या मंदिरवैभवात भर घालणाऱ्या या देखण्या मंदिरात रोज अनेक रामभक्त दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात रामनवमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. या सोहळ्यात ५० हजारांहून अधिक भाविक सहभागी होतात.
देशातील उद्योगक्षेत्राचा विकास करून देशाचे भविष्य घडवण्यासाठी प्रचंड मेहनत करणाऱ्या प्रामाणिक उद्योजक घराण्यांत टाटांप्रमाणेच बिर्ला घराण्याचे नाव घेतले जाते. घनश्यामदास बिर्ला हे या घराण्याचे संस्थापक होते. १० एप्रिल १८९४ रोजी राजस्थानच्या पिलानी गावात जन्मलेल्या घनश्यामदास यांचे वडिल कोलकत्ता येथे छोटा व्यवसाय करीत असत. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रेरणेने कापूस दलालीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर १९१९मध्ये त्यांनी कोलकाता येथे पहिली ज्यूट कंपनी स्थापन केली. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचा व्यवसाय प्रगतीचे एकेक शिखर गाठत गेला. वयाच्या ३०व्या वर्षी एक सज्जन, इमानदार व्यावसायिक म्हणून त्यांनी किर्ती संपादन केली होती. तरुणपणापासून त्यांच्यावर महात्मा गांधींचा मोठा प्रभाव होता. ब्रिटिशांच्या त्या राज्यातही ते स्वातंत्र्य चळवळीस निर्भिडपणे अर्थसाह्य करीत असत.
महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच घनश्यामदास बिर्ला हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. संत कवी नरसी मेहता यांचे ‘वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराई जाणे रे’ हे महात्मा गांधींचे आवडते भजन होते. या भजनाला अनुसरून घनश्यामदास बिर्ला हे अस्पृश्यताविरोधी कार्यातही सहभागी झाले होते. १९३२ मध्ये ते ‘हरिजन सेवक संघा’चे अध्यक्ष होते. समाजास खऱ्या धर्माची शिकवण मिळावी या हेतूने बिर्ला कुटुंबाने सर्वप्रथम १९३९ मध्ये दिल्लीतील सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिराची स्थापना केली. या मंदिराचे उद्घाटन महात्मा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
त्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये बिर्ला समुहातर्फे विविध देवतांची मंदिरे बांधण्यात आली. त्यापैकी बहुतांश मंदिरे पांढऱ्या संगमरवरी दगडात तसेच राजस्थानी बलुआ दगडात बांधण्यात आली आहेत. अकोल्यातील हे मंदिर बिर्ला समुहाच्या तत्कालिन बेरार ऑईल इंडस्ट्रीतर्फे उभारण्यात आले होते. या मंदिराच्या परिसरात दोन मंदिरे आहेत. मुख्य मंदिरात प्रभू रामचंद्र हे लक्ष्मण आणि सीतामातेसह विराजमान आहेत. या मंदिराला लागूनच छोटे शिवालय आहे.
शहरात असूनही या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मंदिराभोवती प्रशस्त प्रांगण आहे. या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाके आहेत. मंदिरासमोर असणाऱ्या एका लहानशा लॉनमध्ये एका चौथऱ्यावर शिवशंकराची ध्यानस्थ मूर्ती विराजमान आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. पाच पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असणाऱ्या या मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या प्रकारच्या या मुखमंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंकडील भिंतींवरील संगमरवरी फरशांवर भगवद्गीतेतील श्लोक कोरलेले आहेत. येथील बंदिस्त सभामंडपातील भिंतींवरील संगमरवरी फरशांवर लक्ष्मीनारायण, शिवशंकर, राधा-कृष्ण, दुर्गामाता आदींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत व त्याखाली या देव-देवतांच्या महतीचे वर्णन केलेले आहे. सभामंडपाच्या भिंतींतील सर्व स्तंभांवर गजराजांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
सभामंडपाच्या पुढील बाजूला गर्भगृहाला प्रदक्षिणा घालण्यासाठी दोन दरवाजे आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर लाकडी रेलिंग बसविले आहेत. भाविकांना येथून गर्भगृहातील देवतांचे दर्शन घेता येते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मोठी मूर्ती व त्याखाली गरुडाचे शिल्प आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण व सीतामातेच्या शुभ्र संगमरवरात घडवलेल्या रेखीव मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डावीकडे त्यांना वंदन करणाऱ्या हनुमानाची मूर्ती आहे. वज्रपिठावर दोन्ही बाजूंना सिंहांची तर मागील स्तंभांवर गजराजांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या मुखमंडपाला लागून एक खुला मंडप आहे. या मंडपाशेजारी असलेल्या पिंपळवृक्षाजवळ लहानसे शिवालय आहे. या शिवालयाच्या बाहेरील बाजूस एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती व मंदिरात शिवपिंडी आहे. या मंदिराच्या गर्भगृहावर उरुशृंग पद्धतीचे व सभामंडपावर आकाराने लहान होत जाणाऱ्या चौकोनी शिळांची शिखरे आहेत. बिर्ला राममंदिरात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना देवदर्शन घेता येते. येथे शनिवार, रविवारी तसेच सुटीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात. हिंदू नववर्षानिमित्त अकोल्यातील संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा निघते. शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून प्रारंभ होणाऱ्या या शोभायात्रेचा समारोप बिर्ला राम मंदिरात होतो. या शोभायात्रेत हजारो भाविक पारंपारिक वेशभूषेत सहभागी होतात.
रामनवमी हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असतो. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येते. मंदिरही फुलांनी सजवले जाते. दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर महाआरती होते. या दिवशी संपूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो. या उत्सवानिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही येथे अन्नकूटाचे आयोजन करण्यात येते.