बिरबलनाथ महाराज मंदिर

मंगरूळपीर, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम

मंगरूळ गाव हे आज मंगरूळपीर प्रमाणेच मंगरूळनाथ म्हणूनही ओळखले जाते. सतराव्या शतकात इराणमधील तूस या प्राचीन शहरातून येथे आलेल्या शाह बद्रुद्दीन म्हणजेच हयात कलंदर या पीरामुळे मंगरूळला ‘मंगरूळपीर’ अशी ओळख प्राप्त झाली. तर संत बिरबलनाथ महाराज या योगतपस्व्याच्या नावामुळे या शहराच्या नावास नाथ हा प्रत्यय लागला. संत बिरबलनाथ महाराज हे संत गजानन महाराज, पितांबर महाराज, भाईजी महाराज, मौनी महाराज यांचे समकालीन होते. त्यांना मंगरूळपीरचे ग्रामदैवत मानण्यात येते. त्यांचे मंदिर शहरातील मध्यवस्तीत वसलेले आहे.

बिरबलनाथ महाराज हे नाथपंथीय तपस्वी होते. आठव्या ते बाराव्या शतकात उदयास आलेल्या या संप्रदायाचा उगम आदिनाथ परमेश्वर शिवापासून झाला, अशी सांप्रदायिक श्रद्धा आहे. त्यामुळे शैव परंपरेतील या संप्रदायास ‘नाथपंथ’ असे नाव पडले. आंध्र प्रदेशातील श्रीशैल कर्दलीबन ही नाथ संप्रदायाची उदयभूमी व आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र ही प्रथम लीलास्थळे मानली जातात. गुरू गोरक्षनाथ हे या संप्रदायाचे प्रवर्तक होते आणि मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) हे त्यांचे गुरू होत. सिद्धत्व प्राप्त करण्यासाठी योगमार्गाचा वापर करणे हे या पंथाचे ध्येय आहे. नाथयोगी ‘नाथ’ हे परमपद मानतात व त्याच्या प्राप्तीसाठी योगाचरण करतात. संप्रदायाची दीक्षा घेतल्यावर साधक आपल्या नावापुढे ‘नाथ’ ही उपाधी लावतात. बिरबलनाथ हे याच परंपरेतले तपस्वी होते. त्यांची साधनापद्धती आणि वेषभूषा नवनाथ संप्रदायप्रणीत होती.

वाशिम जिल्हा गॅझेटियरमधील माहितीनुसार, बिरबलनाथ महाराज हे मूळचे पंजाबचे होते. असे सांगितले जाते की इ.स. १८५० च्या सुमारास, वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचे येथे आगमन झाले. त्यांचे तेजस्वी रूप व निर्मळ वर्तणूक पाहून ग्रामस्थांनी त्यांना येथे वास्तव्य करण्याची विनंती केली. गावातील महादेव मंदिरात त्यांनी आश्रय घेतला. या मंदिरात त्यांनी त्यावेळी धुनी पेटवली. या धुनीविषयी असे सांगितले जाते की त्या भागात पाऊस पडत असला तरी धुनीच्या आजूबाजूला कधीच पाऊस पडत नसे. ती पेटतीच राही. ही धुनी आज पावणेदोनशे वर्षांनंतरही पेटती आहे. संत गजानन महाराज आणि त्यांची २४ वर्षे सेवा करणारे कोंडोलीचे पितांबर महाराज हे बिरबलनाथ महाराज यांचे समकालीन होत. असे सांगण्यात येते की त्यांची आणि बिरबलनाथ महाराज यांच्या भेटी होत असत. मंगरूळपीरमधील लक्ष्मी-नारायण मंदिराची स्थापना बिरबलनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आली होती. गावात सर्वधर्मसमभाव प्रस्थापित करत त्यांनी अनेक विधायक कामे केली. माघ शुद्ध पौर्णिमा शके १८५०, शनिवार, ता. ४ फेब्रुवारी १९२८ रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांनी येथे जिवंत समाधी घेतली. येथील आख्यायिकेनुसार, तो काळ ब्रिटिश सत्तेचा होता. बिरबल महाराज हे समाधी घेत असल्याचे समजल्यानंतर तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी सरकारी यंत्रणेसह येथे आले. त्यांनी बिरबलनाथांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांचा समाधी घेण्याचा निश्चय ठाम होता. त्यांनी समाधी घेतली, त्यावेळी महाराजांच्या मठाकडे २५ एकर जमीन होती, अशी नोंद महाराष्ट्र सरकारच्या वाशिम गॅझेटियरमध्ये आहे.

मंगरूळपीरच्या मध्यवस्तीत बिरबलनाथांचे हे इतिहासकालीन स्थान वसलेले आहे. बिरबलनाथ महाराजांच्या सूचनेनुसार बांधण्यात आलेल्या लक्ष्मी-नारायण मंदिरालगतच्या चौकोनाकार प्रवेशद्वारातून महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. आत आधुनिक बांधणीचा, अनेक खांब व कमानी असलेला मोठा सभामंडप आहे. त्यात एका बाजूस महाराजांची अविरत पेटत असलेली धुनी आहे. या धुनीचा धूर सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी खास चिमणीची व्यवस्था करण्यात आली आहे. सभामंडपात मध्यभागी गर्भगृह आहे. संगमरवरी फरशांनी आतून-बाहेरून सुशोभित केलेल्या या गर्भगृहास समोरून व डाव्या बाजूला असे दोन दरवाजे आहेत. येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात बिरबल महाराजांचे समाधी घेण्याआधी काढलेले जुने छायाचित्र लावलेले आहे. गर्भगृहात मध्यभागी महाराजांच्या समाधीचे स्थान आहे. त्यावर संत बिरबल महाराज यांची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. यासमोर महाराजांच्या पादुकांचे दोन जोड आहेत. समाधीस्थानाच्या मागच्या बाजूच्या भिंतीवरील देवळीत बिरबलनाथ महाराजांची आराध्यदेवता असलेल्या दुर्गादेवीची मूर्ती विराजमान आहे. लालसिंह देवीसिंग रघुवंशी हे बिरबलनाथांचे शिष्य होते. त्यांचे स्थानही या मंदिरात आहे. गर्भगृहाच्या वर मराठा स्थापत्यशैलीतील शिखर आहे. मंदिर परिसरात लक्ष्मी-नारायण आणि महादेव यांची पुरातन मंदिरे आहेत. महादेवाच्या मंदिरात शिवलिंग विराजमान आहे. त्याचप्रमाणे येथे भैरवनाथ, गणेश, तसेच चतुर्थी नामक देवतेची मूर्तीही आहे.

या मंदिरात दुपारी १ ते सायंकाळी ४ हा कालावधी वगळता सकाळपासून रात्री उशिरापर्यंत महाराजांचे दर्शन घेता येते. येथे माघ पौर्णिमेपासून महाशिवरात्रीपर्यंत अशी दहा दिवसांची जत्रा असते. बिरबलनाथांनी समाधी घेतल्यानंतर पुढच्याच वर्षापासून म्हणजे १९२९ पासून येथे यात्रोत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला. माघ पौर्णिमेस महाराजांचा अभिषेक होऊन या उत्सवाची सुरुवात होते. पंचमीच्या दिवशी महाप्रसाद असतो, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा व गोपाळकाला केला जातो. हजारो भाविकांच्या उपस्थितीत भरणाऱ्या या यात्रेच्या काळात येथे खंजेरी भजन स्पर्धेसारखे विविध धार्मिक, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात्रेतील दुकाने मंदिरापासून एक ते दीड कि.मी. अंतरावरील बालदेव मैदानात मांडली जातात.
उपयुक्त माहिती:

  • मंगरूळपीर बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • वाशिम येथून ४७ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून मंगरूळपीरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क: मंदिर कार्यालय, मो. ९४२१७४५३२५

बीरबलनाथ महाराज मंदिर

मंगरुलपीर, ताल. मंगरुलपीर, जिला. वाशिम

Back To Home