मोठे राम मंदिर

टिळक रोड, अकोला, जि. अकोला

अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीराजराजेश्वर मंदिराएवढेच प्रसिद्धीस प्राप्त झालेले एक मंदिर म्हणजे मोठे राम मंदिर. संत गजानन महाराजांचे परमशिष्य बच्चूलाल अग्रवाल यांनी १९०६ मध्ये या मंदिराची उभारणी केली. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील रामपंचायतन मूर्तींची प्रतिष्ठापना साक्षात् शेगावचे गजानन महाराज यांच्या हस्ते झाली आहे. ज्या शिळेवर बसून गजानन महाराजांनी हे मंदिर उभारण्यास अनुमती दिली होती, ती पवित्र शिळाही या मंदिरात जतन करून ठेवण्यात आलेली आहे. या मंदिरात रामनवमी महोत्सव शोभायात्रेसह साजरा केला जातो.
‘आधुनिक महाराष्ट्राचे महिपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतकवी दासगणू यांनी इ.स. १९३९ मध्ये रचलेल्या ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथाच्या बाराव्या अध्यायात या मंदिराच्या उभारणीची कथा देण्यात आली आहे. ती अशी की साधारणतः सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी अकोला येथे बच्चुलाल अग्रवाल हे धनाढ्य व्यापारी राहात असत. एके दिवशी गजानन महाराज अचानक त्यांच्या निवासस्थानी येऊन ओट्यावर बसले. अग्रवाल यांनी महाराजांची किर्ती ऐकलेली होती. त्यांना पाहून त्याला मोठा आनंद झाला. त्याने महाराजांची षोडशोपचार पूजा केली. मंगलस्नान घालून पितांबर, शाल नेसवली. जरीचा रूमाल मस्तकी बांधला. तसेच महाराजांना गोफ, सलकडी, मुद्रिका आदी अनेक दागिने घातले. नेवैद्यास जिलेबी ठेवली. तसेच दक्षिणा म्हणून दहा हजार रुपये ठेवले.
यानंतर अग्रवाल यांनी महाराजांस सांगितले की ‘येथे राममंदिर बांधावे अशी माझी इच्छा आहे. माझे मनोरथ पूर्ण करा.’ यानंतर महाराजांनी त्याला, जानकीजीवन तुझी इच्छा पूर्ण करतील, असा आशीर्वाद दिला. असे सांगण्यात येते की त्या वेळी अकोल्यातील राजेश्वर मंदिरासमोरील पटांगणात महाराजांची सभा झाली होती. त्या सभेनंतर ते कुरूमचे मुस्लिम संत मेहताब शाह अवलिया यांच्यासह अग्रवाल यांच्या निवासस्थानी आले होते. मंदिर उभारण्यास अनुमती दिल्यानंतर महाराजांनी ते कोठे उभारावे हेही सांगितले होते. आताच्या टिळक मार्गावरील त्याच जागेवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. गजानन महाराज त्या वेळी ज्या शिळेवर बसले होते, ती शिळाही या मंदिरात ठेवण्यात आलेली आहे. याबाबत आख्यायिका अशी की मंदिर उभारणीला शंभर वर्षे पूर्ण झाली, त्या वर्षी अग्रवाल यांच्या नातवाला गजानन महाराजांचा स्वप्नदृष्टान्त झाला. वाड्यातील ती शिळा मंदिरात आणण्याचे निर्देश महाराजांनी दिले. त्यानंतर मूळ शेगाव येथील एका मुस्लिम बांधवाच्या छकड्यातून ही शिळा वाजत-गाजत या मंदिरात आणण्यात आली. या शिळेवर दिसणारे ठसे हे गजानन महाराजांच्या बोटांचे आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. या मंदिराच्या दुमजली वास्तूवरील मुख्य प्रवेशद्वारावर घुमटाकार शिखर आहे. त्यानजीक दोन्ही बाजूला मेघडंबरी आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या खालील दोन्ही बाजूस सिंह व द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वारावर नक्षीदार कमान व ललाटबिंबस्थानी गणेशाचे शिल्प आहे. मंदिराला भक्कम लाकडी दरवाजा आहे. मंदिराच्या उभारणीत लाकडाचा अधिक वापर केल्याचे दिसून येते. या लाकडावर कोरीव नक्षीकामही आहे. नगारखानासदृश्य मंडपातून आत आल्यावर आणखी एक मंडप लागतो. या मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात सुंदर गणेशमूर्ती आहे. या मंडपात भाविकांच्या सुविधेसाठी आसनव्यवस्था आहे.
येथील सभामंडपाला कमानीच्या आकाराची चार प्रवेशद्वारे आहेत. दुमजली सभामंडपातील सर्व नक्षीदार स्तंभ हे महिरपी कमानींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. या कमानींवर तसेच छतावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. या सभामंडपात आजही जुन्या काळातील काचेचे दिवे आहेत. सभामंडपापुढे लाकडी रेलिंग व त्यापुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहासमोरील देवळीत हनुमान विराजमान आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत आणि शत्रूघ्न यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या वज्रपिठावरील चांदीच्या पत्र्यावर नक्षीदार कलाकुसर आहे. मुख्य मूर्तींशिवाय वज्रपिठावर गजानन महाराज, सालासर बालाजी तसेच हनुमान यांच्या लहान मूर्तीही आहेत. गर्भगृहातील भिंतींवर रामायणातील प्रसंग असलेल्या प्रतिमा आहेत.
मंदिरातील सभामंडपाजवळ गजानन महाराजांच्या गादीचे दर्शन घडते. येथे त्यांची एक प्रतिमाही ठेवण्यात आलेली आहे. काही पावलांवरच असलेल्या देव्हाऱ्यात रामदेवबाबा पीर यांचे स्थान आहे. या देव्हाऱ्याच्या डावीकडे गजानन महाराजांचे गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या मध्यभागी गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीवर दररोज अत्तराचा लेप लावण्यात येतो. दर गुरुवारी या मूर्तीला शृंगारही केला जातो. या मूर्तीसमोरच अग्रवाल यांच्या जुन्या वाड्यातील शिळा आहे. या गर्भगृहाच्या डावीकडे असलेल्या देव्हाऱ्यात राणी सतीचे स्थान आहे. या मंदिरातील भोजन कक्षात भाविकांसाठी प्रसाद बनवण्यात येतो. मंदिराच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. या मजल्यावर उत्सवांप्रसंगी भोजनपंगती लागतात.
मंदिरात दररोज पहाटे ५.३० वाजता काकडआरती, सकाळी ७ वाजता शृंगारआरती, सकाळी ११ वाजता भोग आरती, सायंकाळी ७ वाजता शृंगारआरती तर रात्री १० वाजता शयनआरती होते. दिवसातून दोन वेळा येथे नेवैद्य दाखवण्यात येतो. येथे हनुमान जयंती, रामनवमी, ऋषीपंचमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गजानन महाराज प्रकटदिन आदी उत्सव साजरे केले जातात. उत्सवांदरम्यान सकाळी ६ वाजता यजमानांच्या हस्ते मंदिरातील भोगमूर्तींवर अभिषेक व पूजा केली जाते. नैवद्यानंतर आरती झाल्यावर ब्राह्मणभोजन होते. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. रामनवमी हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. या उत्सवाआधी आठ दिवसांपासून भजन-कीर्तन, रामायण पठण, गोपालकाला कीर्तन, एकादशी कीर्तन आदी कार्यक्रमांना सुरूवात होते. रामनवमीच्या दिवशी सकाळी भोगमूर्तींवर अभिषेक करण्यात येतो. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रामजन्माचे कीर्तन केले जाते. रामजन्म झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण केले जाते. या दिवशी पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत हजारो भाविक रांगा लावून दर्शन घेतात. उत्सवांव्यतिरिक्त दररोज सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी १२.३० पर्यंत व सायंकाळी ४.३० पासून रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.
श्रीराम व हरिहर संस्थानातर्फे या मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. ‘अकोला डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’च्या १९७७च्या सुधारित आवृत्तीनुसार, या मंदिराच्या मालकीची ७०० एकर जमीन आहे. मंदिराला लागून असलेल्या इमारतीतील चित्रपटगृह, लॉजिंग-बोर्डिंग व दुकानांच्या भाड्यातून मंदिरास मासिक तीन हजार रूपये मिळतात. बच्चुलाल गोंदुलाल अग्रवाल यांच्या ट्रस्टतर्फे या मंदिराशेजारी नंतरच्या काळात हे चित्रपटगृह व दुकानांचे गाळे बांधण्यात आले होते.

उपयुक्त माहिती:

  • अकोला एसटी स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून अकोल्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home