भुलेश्वर मंदिर

यवत, ता. पुरंदर, जि. पुणे

पुण्यापासून साधारणतः ५० किमी अंतरावर माळशिरसनजीक यवत गावाच्या डोंगरावर एक हजार वर्षांपूर्वीचे भुलेश्वर मंदिर आहे. ही भव्य व अनन्यसाधारण वास्तू पुरातत्त्व खात्याने ‘राष्ट्रीय संरक्षित स्थळ’ म्हणून घोषित केली आहे.

असे सांगितले जाते की, आज जेथे हे मंदिर आहे, तेथे शंकर तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. त्याच वेळी पार्वती भिल्ल स्त्रीच्या रूपात येऊन तेथे नृत्य करू लागली. त्यामुळे शंकरांची तपश्चर्या भंग झाली. पार्वतीचे सुंदर रूप पाहून शंकर तिच्यावर मोहित झाले. त्यानंतर पार्वतीसोबत ते कैलासावर गेले आणि विवाहबद्ध झाले. शंकर पार्वतीला पाहून आपली तपश्चर्या विसरले म्हणून या देवस्थानाला ‘भुलेश्वर’ नाव पडले.

स्वतः पांडवांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. त्याचा जीर्णोद्धार पुढे १२३० मध्ये यादवकालीन राजा कृष्णदेवराय याच्या कार्यकाळात झाला. त्यानंतर पहिले बाजीराव पेशवे व साताऱ्याचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्र स्वामी यांनी १७३७ मध्ये एक लाख रुपये खर्चून मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी येथे तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन शिखरे बांधली गेली. सरदार दामाजी गायकवाड यांनी जीर्णोद्धाराच्या कामाकरिता २५ हजार रुपये दिल्याची, तसेच वसईच्या यशस्वी मोहिमेनंतर चिमाजी आप्पांनी भुलेश्वर महादेवास मुकुटाकरिता १२५ रुपये आणि सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद आहे. असे सांगितले जाते की, राजमाता जिजाऊ छोट्या शिवरायांना घेऊन भुलेश्वर मंदिरात नियमितपणे येत असत.

प्राचीन काळात बांधकामामध्ये सर्वसाधारणपणे तांबड्या रंगाच्या बेसाल्ट दगडाचा वापर होत असे; पण या मंदिरासाठी काळ्या बेसाल्टचा वापर झाला आहे. दाक्षिणात्य होयसळ वास्तुशैलीप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आयताकृती व पाकळ्यासदृश आहे; परंतु मंदिराची बाहेरील रचना जैन मंदिरांच्या वास्तुशैलीसारखी दिसून येते.

हे मंदिर चार मीटर उंच चौथऱ्यावर बांधण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. नंदीमंडप, अर्धखुला मंडप, अंतराळ व गर्भगृह, अशी मंदिराची मुख्य रचना आहे. नंदीमंडपातील दोन मीटर उंचीच्या नंदीवर सुबक कोरीव काम केलेले आहे. सभामंडपात उंच चौथऱ्यावर कासव कोरलेले आहे. सभामंडप व गाभाऱ्याला असलेल्या दोन्ही दरवाजांवर सुंदर कोरीव काम दिसते. सभामंडपाच्या भिंतींवर वादक, अप्सरा यांची शिल्पे आहेत. खालच्या भागात सिंह आणि हत्तींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत; तर वरच्या भागात रामायण, महाभारत व विष्णुपुराणातील प्रसंग आहेत. त्यामध्ये द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही शिल्पे ठळकपणे दिसतात. स्तंभांवर विविध आकृत्या व उलट्या नागाचे फणे कोरले आहेत.

गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यांत या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन ग्रंथांमध्ये या गणेशाचा उल्लेख ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्रनामांत या देवतेस विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी अशा विशेषणांनीही संबोधण्यात आले आहे.

गाभाऱ्याच्या दरवाजावर पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचतत्त्वे कोरलेली दिसतात. द्वारपट्टीवर गणपतीचे शिल्प आहे. गाभाऱ्यातील शिवलिंगावर पितळी मुखवटा आहे. मुखवट्याखाली आणखी तीन लिंगे आहेत. ही ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके असल्याचे मानले जाते. पिंडीखालील भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते.

येथील कोरीवकामात कुंभ, कमळे, कीर्तिमुख, मकर, पाने-फळे ही शुभचिन्हे वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती हा शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. विशेष म्हणजे दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते; पण येथील दक्षिण दरवाजावर भरत-शत्रुघ्नाच्या प्रतिमांशेजारी डाव्या बाजूस दोन उंट दिसतात.

प्रदक्षिणा मार्गावर दोन स्तंभांमधल्या वरच्या भागात गणेश, शंकर, ब्रह्मा, कार्तिकेय, विष्णू, इंद्र हे स्त्रीरूपात कोरलेले पाहायला मिळतात. त्यांची नावे गणेशनी, माहेश्वरी, ब्रह्मी कुमारी, वैष्णवी व इंद्राणी, अशी आहेत. मंदिराचे शिखर नागर शैलीचे आहे आणि त्यावर पशु-पक्षी व सरपटणारे प्राणी कोरलेले आहेत. घुमटाशेजारी असणाऱ्या मिनारांवरही नक्षीकाम व देव-देवता कोरलेल्या आहेत.
यादव साम्राज्याचा अंत झाल्यानंतर परकीय आक्रमकांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरे, शिल्पे यांची नासधूस झाली; त्यात भुलेश्वर मंदिराचाही समावेश होता. त्यावेळी येथील शिल्पांचेही अतोनात नुकसान झाले; पण शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अजूनही कायम आहे.

उंच डोंगरावर उभ्या असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी जुना पायरी मार्ग आहे. त्याशिवाय मंदिराजवळ आता थेट वाहने जाऊ शकतील, असा नवा रस्ता तयार करण्यात आला आहे. श्रावण महिन्यात भुलेश्वर महादेवाची पालखी काढली जाते. श्रावणातील दर सोमवारी यात्राही भरते. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवतजवळ असलेल्या या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने भेट देतात. भाविकांना या मंदिरात सकाळी ५ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत देवदर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • पुण्यापासून ५२ किमी; तर सासवडपासून २८ किमी
  • पुणे, सासवडहून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या पायथ्याशी जाण्यासाठी व्यवस्था
  • निवास व न्याहारीच्या सुविधेचा अभाव
Back To Home