भुवनेश्वर मंदिर

चिंचवली-नारंगी, ता. अलिबाग, जि. रायगड

हिंदू धर्मशास्त्रात स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ ही तीन भुवने सांगितलेली आहेत. या तिन्ही जगांचा स्वामी म्हणजे भुवनेश्वर. या नावाने संबोधल्या जाणाऱ्या महादेवाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर अलिबाग तालुक्यातील चिंचवली-नारंगी येथे आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीचे बांधकाम असलेल्या या मंदिरातील शिवशंकरावर पंचक्रोशीतील हजारो भाविकांची श्रद्धा आहे. दर सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या उत्सवप्रसंगी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत अनेक भाविक या मंदिरातील शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून अभिषेक करण्यासाठी येतात.

मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेला रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका हा पर्यटनासोबतच अनेक ऐतिहासिक स्थळे व प्राचीन मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. त्यापैकी खारेपाटण विभागातील चिंचवली-नारंगी येथील भुवनेश्वर मंदिर हे स्वयंभू शिवलिंगासाठी ओळखले जाते. स्वयंभूलिंग किंवा स्वयंभुवलिंग हे सर्वांत पवित्र मानले जाते. कारण ते निसर्गतः उत्पन्न झालेले असते व अनादी काळापासून ते अस्तित्वात असते. येथील स्वयंभू शिवलिंग रुजीव पाषाणाचे म्हणजे भूमीत एकजीव व्हावे, अशा पद्धतीने रुजलेल्या, एकजीव झालेल्या पाषाणाचे आहे. फार प्राचीन असलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार अठराव्या शतकात अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात झाला आहे. १८३७ साली तत्कालीन ब्रिटिश सरकारने या मंदिराला दिवाबत्तीसाठी दरवर्षी १५ रुपयांची सनद बहाल केल्याचीही नोंद आहे.

अलिबाग तालुक्यातील खारेपाटण विभाग प्रसिद्ध आहे तो तब्बल सहा वर्षे चाललेल्या चरी येथील ऐतिहासिक शेतकरी संपासाठी. खोत आणि सावकारांच्या जुलमी राजवटीविरोधात १९३३ ते १९३९ या कालावधीत पुकारलेला जगातील सर्वात मोठा शेतकरी संप, अशी या संपाची इतिहासात नोंद आहे. कोकणातील खोती पद्धतीचा विरोध करण्यासाठी शेतकरी व कामगार नेते नारायण नागू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण विभागातील शेतकरी मोठ्या धैर्याने त्यावेळी एकवटले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक बैठका या भुवनेश्वर मंदिरात झाल्या व आंदोलनाची रुपरेषा ठरविली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या संपाला जाहीर पाठिंबा दिला होता. असे सांगितले जाते की या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक शेतकरी नेत्यांसह डॉ. आंबेडकरही येथे आले होते. आपले व कुटुंबाचे अन्नपाण्याचे हाल होत असूनही तब्बल सहा वर्षे शेतकऱ्यांनी शेतीत पिक घेतले नव्हते. शेतकऱ्यांच्या या निग्रहापुढे इंग्रज सरकारला तेव्हा झुकावे लागले होते. या संपानंतर देशात कुळकायदा लागू झाला व जमिनी भूमिहीन शेतकरी व मजूर यांच्या मालकीच्या झाल्या.

कार्लेखिंड ते रेवस या मार्गावर नारंगी गावापासून दोन किमी अंतरावर चिंचवली येथे डोंगरपायथ्याशी निसर्गसमृद्ध परिसरात भुवनेश्वर महादेवाचे मंदिर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. जमिनीपासून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराची मुखमंडप, मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना आहे. मंदिराच्या मुखमडंपासमोर दीपस्तंभ व दोन्ही बाजुला तुळशीवृंदावने आहेत. महाशिवरात्र व कार्तिकी पौर्णिमेला या दीपस्तंभावर दीप प्रज्वलित केले जातात. मुखमंडपातील आठ पायऱ्या चढून मंदिराच्या अर्धखुल्या स्वरुपाच्या मंडपात प्रवेश होतो. या मंडपात भाविकांच्या सोयीसाठी आसने व पत्र्याची शेड टाकलेली आहे. मंडपातून मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपात एका कोपऱ्यात हवनकुंड व मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची लहान मूर्ती आहे.

सभामंडपातून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या प्रवेशद्वाराची घडीव दगडातील भिंत ही सुमारे चार ते साडेचार फूट रुंदीची आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर अखंड पाषाणातील नंदीची वैशिष्ट्यपूर्ण भलीमोठी मूर्ती आहे. या नंदीचे पुढचे दोन्ही पाय दुमडलेले आहेत. मागचा डावा पाय त्याने पोटाखाली घेतला असून उजवा पाय गुडघ्यातून वाकवलेला आहे. त्याच्या अंगावर विविध अलंकार व घुंगुरमाळा आहेत. नंदीच्या कपाळावरही कोरीव नक्षीकाम आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींवर असलेल्या दोन देवकोष्टकांपैकी उजवीकडील देवकोष्टकात गणपतीची प्राचीन मूर्ती आहे. या मूर्तीसमोर पितळेची मूषकमूर्ती आहे. डावीकडील देवकोष्टकात काळभैरवाची मूर्ती आहे.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबस्थानी गणपतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी अखंड पाषाणातील स्वयंभू शिवपिंडी आहे. ही पिंडी चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहे. या पत्र्यावरील कलाकुसरीमुळे ही पिंडी सुंदर व आकर्षक भासते. पिंडीभोवती वेटोळे घातलेला धातूचा नाग आहे. छताला लटकविलेल्या अभिषेक पात्रातून शिवलिंगावर अभिषेक होत असतो. शिवलिंगासमोर असलेल्या भिंतीवरील वज्रपिठावर शिवशंकरांचा पितळी मुखवटा व पार्वती मातेची मूर्ती आहे. उत्सवप्रसंगी हा मुखवटा शिवलिंगावर ठेवण्यात येतो. या मंदिराच्या गर्भगृहावरील मुख्य शिखराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोलाकार शिखराच्या खालच्या बाजुला कमळपुष्पाची रचना आहे. त्यामध्ये शिखर, त्यावर आमलक व कळस आहे. या शिखराच्या चारही बाजूंनी लहान लहान शिखरे आहेत.

मुख्य मंदिराच्या मागील बाजुला श्रीदत्ताचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील वज्रपिठावर त्रिमुखी श्रीदत्तमूर्ती आहे. दत्तजयंतीला येथे मोठा उत्सव होतो. भुवनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला मोठी जत्रा असते. तालुक्यात ती कलिंगडाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी येथे नवसपूर्तीनिमित्त तुला केली जाते. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दररोज शेकडो भाविक भुवनेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  • अलिबागपासून १८ किमी अंतरावर.
  • रेवस बंदर व मांडवा बंदर येथून १० किमी अंतरावर
  • एसटी बस तसेच कार्लेखिंड येथून सहा आसनी रिक्षा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात.
  • संपर्क : सुभाष मिरकर, मो. ७७९८१४९०६५
Back To Home