भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंगे आहेत. भीमाशंकर हे त्यातील सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. सह्याद्रीच्या पश्चिम रांगेतील एका उंच डोंगरावर, गर्द जंगलात भीमाशंकर वसलेले आहे. या तीर्थक्षेत्रापासून भीमा नदी उगम पावते. असे सांगितले जाते की, भीमा नदीचे मूळ उगमस्थान हे ज्योतिर्लिंगात आहे, परंतु तेथे ती गुप्त होते आणि मंदिरापासून पूर्वेकडे दीड किलोमीटर अंतरावर ती पुन्हा प्रकटते. ती जेथून प्रकटते त्या वनास डाकिनीचे वन असे म्हणतात. भीमाशंकरास ‘मोटेश्वर महादेव’ या नावानेही ओळखले जाते.
भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला दाट जंगल आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वारातून दगडी पायऱ्यांचा मार्ग आपणास मंदिराकडे नेतो. या मार्गावर दोन्ही बाजूंना धार्मिक साहित्य, तसेच प्रसादाच्या दुकानांच्या रांगा आहेत. मंदिराकडे जाण्यासाठी २०० पायऱ्या उतरून जावे लागते. आत गेल्यावर उंच कळस असलेले महादेवाचे विशाल देवालय समोर दिसते. घनगर्द अरण्याने वेढलेल्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर शोभून दिसणारे हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीनुसार बांधण्यात आले आहे.
मूळ मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूर्वीचे होते. कालांतराने त्या मंदिराचा जीर्णोद्धार, तसेच नवे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे मूळ मंदिर आता पाहावयास मिळत नाही. मात्र मंदिराच्या ताशीव दगडी शिळांनी घडवलेल्या भिंती, कलात्मक नक्षीकाम केलेले खांब, त्यावर कोरलेल्या दशावताराच्या मूर्ती हे सारे मनमोहून घेणारे आहे. मंदिराच्या भिंतीवर ब्रह्मा, गणपती, परशुराम आदी देवतांच्या मूर्ती आहेत. दर्शन रांगेतून पुढे पुढे सरकताना मंदिराच्या कलात्मकतेचा आस्वाद घेता येतो. आत नंदीदेवाची मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वारही अतिशय प्रेक्षणीय असून, त्यावरील पट्टीमध्ये श्रीगणेशाची सुबक मूर्ती कोरलेली आहे. पाच पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. गाभाऱ्यात शिवशंकराची पिंड आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे. येथील शिवलिंगामध्ये एक उभा छेद असून शिव व शक्ती असे दोन भाग आहेत. गाभाऱ्यात समोर पार्वती देवीची मूर्ती आहे.
मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेर पाच मण वजनाची लोखंडी घंटा आहे. ही घंटा थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी मंदिरास भेट दिली, अशी नोंद आहे. या घंटेवर १७२७ असे इंग्रजी आकडे आहेत. नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. असे सांगितले जाते की, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तसेच बाळाजी विश्वनाथ पेशवे हे या मंदिरात दर्शनासाठी आले होते.
भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबाबत विविध पौराणिक कथा आहेत. शिवपुराणानुसार, कुंभकर्णाचा भीम नावाचा मुलगा होता. त्याचा जन्म कुंभकर्णाच्या मृत्यूनंतर झाला होता. आपल्या पित्याचा वध भगवान रामाने केल्याचे त्याला समजल्यानंतर तो सूडभावनेने पेटला. रामाशी युद्ध करून जिंकणे कठीण असल्याचे त्याला माहीत होते. तेव्हा त्याने ब्रह्मदेवाची उपासना सुरू केली. खडतर तप केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले व विजयी भव असे वरदान दिले. त्यानंतर भीमाने लोकांवर अनन्वित अत्याचार सुरू केले. त्यामुळे देवतागणही त्रस्त झाले. अखेर सर्व देवतांनी भगवान शंकराचा धावा केला.
शंकराने भीमाचा जेथे वध केला ते स्थान म्हणजेच भीमाशंकर. हे स्थान देवतांसाठी पूजनीय बनले व त्यांनी भगवान शंकरास येथे शिवलिंग स्वरूपात प्रकट होण्याची प्रार्थना केली. त्यानुसार भगवान येथे शिवलिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले. प्राचीन काळापासून शिवभक्तांसाठी हे स्थान अत्यंत पवित्र असे मानले जाते. पूर्वी भीमाशंकरहून ओतूर येथील कपर्दिकेश्वर मार्गे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर अशी यात्रा केली जात असे.
भीमाशंकर हे भाविकांप्रमाणे पर्यटक, तसेच वनअभ्यासक यांच्यासाठीही महत्त्वपूर्ण स्थळ आहे. हे ठिकाण घनदाट अरण्याने वेढलेले असून, १९८४ साली त्यास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. या जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या हे प्राणी आढळतात अशी नोंद आहे. या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यप्राणी म्हणून घोषित करण्यात आलेल्या शेकरूची वस्ती. ही उडणारी घार केवळ याच जंगलात आढळते. या शिवाय भीमा नदीचे उगमस्थान असलेले गुप्त भीमाशंकर हे ठिकाण, तसेच कोकणकडा, नागफणी, बॉम्बे पॉईंट, हनुमान तळे, महादेव वन ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत. कोकणकड्याची उंची साधारणतः ११०० मीटर आहे. वातावरण स्वच्छ असेल, तर येथून अरबी समुद्रही दिसतो. नागफणी हे या अरण्यातील सर्वांत उंच ठिकाण असून, कोकणातून हे शिखर नागाच्या फण्यासारखे दिसते. भीमाशंकरवर वनविभागाचे निसर्ग परिचय केंद्रही आहे.
भीमाशंकरला महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. लाखो भाविक त्यावेळी दर्शनासाठी येतात. भाविकांना पहाटे ४.३० ते रात्री ९.३० पर्यंत मंदिरात देवदर्शन करता येते. भीमाशंकरला जाण्यासाठी खेड, मंचर येथून रस्ता आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातूनही भीमाशंकरला जाता येते. ही वाट डोंगरातील आहे. त्यावर एके ठिकाणी असलेला शिडीघाट हा गिरीभ्रमण करणाऱ्यांना नेहमीच खुणावत असतो.