
भीमादेवी हे शाकंभरी देवीचे एक रूप असल्याची मान्यता आहे. काश्मीर प्रांतात राक्षसांनी उच्छाद मांडला तेव्हा आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी देवीने शक्तीशाली भीमादेवीचा अवतार घेतला. मुख्यतः उत्तर भारतात पूजल्या जाणाऱ्या या देवीची हरयाणा व राजस्थान या राज्यांत अधिक मंदिरे आहेत. हरयाणा राज्यातील चंदीगड येथील दहाव्या शतकात बांधलेले भीमादेवी मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. असेच रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील फाळणी गावाजवळील जंगलात असलेले भीमादेवी पीठ मंदिर प्रसिद्ध आहे.
हे मंदिर २००३ साली बांधून पूर्ण झाले व त्याच वर्षी मूर्तीची प्रतिष्ठापना करून ते भाविकांसाठी खुले कऱण्यात आले. या मंदिराची अख्यायिका अशी की राजस्थान येथील संन्यासी नरेंद्र देवजी महाराज यांना स्वप्नदृष्टांत देऊन भीमादेवीने आपण महाराष्ट्रातील रायगडच्या जंगलात आहोत व तेथे आपले मंदिर बांधावे, असे सांगितले. देवीच्या आदेशाने नरेंद्र देव फाळणी गावातील जंगलात पोहोचले. स्वप्नात दिसलेल्या जागी खोदकाम करताच देवीची मूर्ती जमिनीत सापडली. त्यांनी मूर्ती सापडलेल्या जागी मंदिर बांधले व भीमादेवी पीठ स्थापन केले.
माणगाव तालुक्यात नांदवी–आंबेत मार्गावर भीमादेवी पीठ आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळाला लागून मंदिराची भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला मारूती मंदिर व त्याशेजारी उपप्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे गणपती मंदिर व त्याशेजारी आणखी एक उपप्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रांगणात येण्यासाठी दहा पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस चौथरे व त्यावर पाषाणी व्याघ्र शिल्पे आहेत. मुख्य प्रवेशद्वार व लगतची मंदिरे यांचे छत समतल आहे व त्यावर तीन पिरॅमिडसारखी पायऱ्या पायऱ्यांची निमुळती होत गेलेली चौकोनी शिखरे,
त्यावर कळस व ध्वजपताका आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो.
पुढे बंदिस्त स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपास समोरील बाजूने एक व डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी दोन अशी एकूण पाच प्रवेशद्वारे आहेत. प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे सभामंडपाच्या समोरील प्रवेशद्वारासमोर तिन्ही बाजूने चढता येईल, अशा पायऱ्यांची रचना आहे. सभामंडपात प्रत्येक प्रवेशद्वारासमोर प्रत्येकी दोन चौकोनी नक्षीदार स्तंभ आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा व प्रकाश येण्यासाठी वातायने आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला संगमरवरी द्वारपाल शिल्प आहे. गर्भगृहास समोर, डाव्या व उजव्या बाजूला असे एकूण तीन दरवाजे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावरील मखरात भीमादेवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तींच्या हातात चंद्रहास खड्ग, नरमुंड, डमरू व शंख आहेत. देवीच्या डोक्यावर नक्षीदार मुकुट व अंगावर विविध
दागिने आहेत. मूर्तीशेजारी त्रिशूल आहे.
गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणामार्ग आहे. प्रदक्षिणामार्गावरील गर्भगृहाच्या बाह्यभिंतीत नऊ देवकोष्टके आहेत. या देवकोष्टकांत शैलपुत्री, ब्रम्हचारीणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कांत्यायनी, कालगौरी, महागौरी व सिद्धीदात्री यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. सर्व देवकोष्टकांच्या दोन्ही बाजूस पर्णलता नक्षी आहेत.
मंदिराच्या छतावर आठ शिखरे आहेत. यातील चारही कोनांवर चार व उजव्या व डाव्या बाजूच्या प्रवेशद्वारावर दोन अशी सहा लघूशिखरे आहेत. ही शिखरे पिरॅमिडसारखी चौकोनी व त्यावरील स्तूपिकांवर कळस आहेत. सभामंडपाच्या छतावरील शिखर तीन थरांचे, चौकोनी व त्यावरील स्तूपिकेवर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी उंच व वर निमुळते होत गेलेले आडव्या धारेची नक्षी असलेले शिखर, त्यावर आमलक व कळस आहे.
शांत वातावरण असलेल्या मंदिराचा सभोवताल हिरव्यागार घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. मंदिरांत चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्री उत्सव हे दोन मुख्य वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्यावेळी जिल्ह्यातील शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. प्रत्येक नवरात्रीत दहा दिवस मंदिरात भजन, किर्तन, संगीत व प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.