छत्रपती शिवरायांची कुलदेवता म्हणून तुळजापूरची तुळजाभवानी महाराष्ट्राला परिचित आहे. तुळजाभवानी मातेची विविध रूपांतील शेकडो मंदिरे देशभरात आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे व भारतातील ५१ शक्तिपीठे विशेष प्रसिद्ध आहेत. शाक्तपंथीयांची ही देवता महाराष्ट्रात गावोगावी पूजली जाते. कोल्हापूर, माहूर, तुळजापूर व वणी येथील देवीची मंदिरे प्रसिद्ध आहेत. असेच एक जागृत आणि निसर्गरम्य स्थान मराठवाड्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगफाटा येथे आहे. नांदेड-नागपूर महामार्गालगत, हिरव्यागार वनराईने नटलेल्या एका उंच टेकडीवर हे मंदिर आहे.
हे मंदिर अलीकडील काळात बांधले असले तरी येथील मूर्ती हजारो वर्षे प्राचीन असल्याचे येथील पुजारी सांगतात. देवीबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी घनदाट अरण्याचा भाग असलेल्या या परिसरात एक शाक्त पंथीय संन्यासी देवीची उपासना करीत होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी प्रत्यक्ष रूपात त्याच्यासमोर प्रकट झाली व तिने त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या संन्याशाने आपण कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करावे व दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात, असा वर मागितला. भक्ताच्या मागणीनुसार देवी मूर्तीरूपात येथे स्थापन झाली.
रानात बोरीच्या झाडाखाली एका चौथऱ्यावर भवानी मातेची मूर्ती, पादुका, शिवलिंग व भैरवनाथाची मूर्ती असे या देवस्थानाचे मूळ स्वरूप होते. या ठिकाणी २००३ मध्ये गावकऱ्यांनी साधेसे मंदिर बांधले. सन २०११ साली मंदिराच्या शिखराचे बांधकाम करण्यात आले. सन २०१४ साली मंदिरास पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात आल्याने शासन निधीतून मंदिराचा जीर्णोद्धार व परिसराचा विकास करण्यात आला.
गावापासून जवळ नांदेड-नागपूर महामार्गालगत एका उंच टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिराला असलेल्या तटबंदीत एक मोठे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर सुमारे अकरा प्रशस्त पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांवर सलग तीन स्वागतमंडप आहेत. डाव्या व उजव्या बाजूचे मंडप कमी उंचीचे आहेत, तर मधला मंडप अधिक उंचीचा आहे. दोन्ही बाजूच्या मंडपांवर प्रत्येकी एक आमलक आहे आणि मधल्या मंडपावर तीन आमलक आहेत. सर्व आमलकांवर कळस आहेत. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. तसेच चौथऱ्यावर दीपस्तंभ आहेत. प्रांगणात यज्ञकुंड आहे. येथे तटबंदीलगत भवानी देवी व हनुमान यांच्या शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहेत. मूर्तीजवळ भाविकांनी नवसाची वस्त्रे बांधली आहेत. संपूर्ण हिरवाईने नटलेला हा मंदिराचा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत आहे.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपासमोर दोन्ही बाजूला दोन सिंह शिल्पे आहेत. मुखमंडपात समोरील बाजूला दोन नक्षीदार गोलाकार स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत.
सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा उंच असल्याने प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला शंख, चक्र, गदा धारिणी चतुर्भुज नारायणी द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे, तर ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. सभामंडपास उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन केले आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभांवर ढाली व तलवारी आहेत.
गर्भगृहात वज्रपीठावरील पितळी मखरात भवानी मातेची महिषासुरमर्दिनी स्वरूपातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या हातात त्रिशूल, तलवार व नरमुंड आहे. देवीच्या पायाखाली महिषासुर आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. देवीवर पंचफणेश्वर नागाने छत्र धरले आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला पितळी सिंहशिल्पे आहेत. मूर्तीच्या मागील पितळी प्रभावळीत मकरतोरण, गजतोरण, पर्णलता व पुष्पलता नक्षी आहे, तसेच वर कीर्तिमुख आहे.
देवीची मूर्ती पूर्वाभिमुख असल्याने वर्षातील काही दिवस सूर्योदयाची किरणे देवीस तेजाभिषेक घालतात. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.
मुखमंडपाच्या छतावर चौकोनी घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व आमलकावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे अष्टकोनी शिखर आहे. यातील प्रत्येक थरात आठ देवकोष्ठके व त्यात विविध देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक असून त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
या मंदिरापासून काही अंतरावर महादेवाचे तटबंदी असलेले शिवपिंडीसदृश वर्तुळाकार मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मुखमंडपात समोरील बाजूला दोन स्तंभ आहेत आणि छताची मागील बाजू सभामंडपाच्या भिंतीवर तोलली आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार प्रांगणापेक्षा उंचावर आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात प्रवेशद्वारासमोर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृह सभामंडपापेक्षा खोल आहे, तसेच ते भिंतीविरहित व खुल्या स्वरूपाचे आहे. गर्भगृहात खाली उतरण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. गर्भगृहात मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे आणि जलधारा धरलेले अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. मंदिराच्या छतावर महादेवाची ध्यानस्थ स्वरूपातील सुमारे वीस फूट उंच मूर्ती आहे. पूर्वी येथील शिवपिंडी भवानी देवीच्या मंदिरात होती, मात्र अलीकडील काळात नव्या मंदिराची स्थापना करून शिवपिंडी येथे स्थापित करण्यात आली. मंदिराजवळ वन विभागाने विकसित केलेले बालोद्यान आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची साधने उपलब्ध करून दिली आहेत. मंदिराच्या मागे सांस्कृतिक कार्यासाठी सभागृह व मंगल कार्यालय आहे.
शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यावेळी सलग दहा दिवस मंदिरात दर्शनाला व नवस फेडायला येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. यावेळी भाविक देवीची खणानारळाने ओटी भरून साडीचोळी व सौभाग्य अलंकार अर्पण करतात. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा असे सलग दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ, प्रवचन, महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाशिवरात्री, श्रावण मास, मार्गशीर्ष मास, चैत्र पाडवा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी वर्षभरातील सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात.