भावई देवी मंदिर

वरेरी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

देवीच्या बाजूला दोन उभे हत्ती, त्या हत्तींच्या सोंडेमध्ये पाण्याने भरलेल्या दोन घागरी व ते हत्ती घागरीमधले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत, अशा स्वरूपाची देवीची मूर्ती ही अभिषेकलक्ष्मी वा गजलक्ष्मी म्हणून संपूर्ण देशात प्रचलित आहे; परंतु कोकणात मात्र अशा स्वरूपाची मूर्ती ही भावई देवी म्हणून ओळखली जाते. याच भावई देवीचे प्राचीन मंदिर देवगड तालुक्यातील वरेरी गावात आहे. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी ही देवी अत्यंत जागृत आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

भावई देवी हे श्रीदेवी भगवतीचेच एक रूप. कोकणात, त्यातही खासकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्ष्मीच्या मूर्तीसमवेत गजप्रतिमा आवर्जून असतात. गजलक्ष्मी ही राष्ट्रकुट घराण्याची कुलदेवता होती. राष्ट्रकुटांचा काळ हा साधारणतः इसवी सन पूर्व ७५० ते ९८३ हा आहे. अनेक वर्षे या राष्ट्रकुटांची सत्ता कोकण प्रांतावरही होती. ‘कल्ट इमेजेस ऑफ कोंकण- ए स्टडी थ्रू ट्रॅडिशन्स, रिलिजियस बिलिफ्स अँड आयकॉनॉग्राफी’ या शिल्पा हडप यांच्या अभ्यासप्रबंधात असे म्हटले आहे की कोकणातील ज्या गावात गजलक्ष्मीची प्राचीन मूर्ती आढळते, ते गाव राष्ट्रकुटांच्या काळातील असावे, असे मानता येते. गजलक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा प्राचीन काळापासून होत असे. राष्ट्रकुटांची सत्ता लयास गेल्यानंतर ती कमी होत गेली वा थांबली. मात्र आजही अनेक गावांत गजलक्ष्मी ही भावई देवीच्या रूपात पुजली जाते. वरेरी हे त्यातीलच एक गाव आहे.

भावई देवी वरेरी गावची ग्रामदेवता आहे. या देवीचे मंदिर ४०० ते ५०० वर्षे प्राचीन असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. मंदिराभोवतीने सर्वत्र भातशेती केली जाते. त्यामुळे पावसाळ्यातील दिवसांत या मंदिराभोवती हिरवा गालिचा अंथरल्याचा भास होतो. मंदिरासमोर असलेल्या आटोपशीर प्रांगणात एका चौथऱ्यावर अष्टकोनी तुलशी वृंदावन आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपाच्या दोन्ही बाजूस स्तंभांना लागून असलेल्या चौथऱ्यांवर देवीचे वाहन सिंहाची शिल्पे आहेत. मुखमंडपातील स्तंभ खालील बाजूस चौकोनी व वर दंडगोलाकार आहेत. येथील सभामंडप हा खुल्या स्वरूपाचा आहे व बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपातील सर्व स्तंभ हे एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत.

अंतराळाचे लाकडी प्रवेशद्वार नक्षीकामाने सुशोभित आहे. येथील द्वारशाखांवर पानाफुलांची बारीक नक्षी कोरलेली आहेत. गर्भगृहात एका वज्रपीठावर देवीची काळ्या पाषाणातील उभी द्विभूज मूर्ती आहे. या देवीच्या एका हातात शस्त्र व दुसऱ्या हातात अमृतपात्र आहे. डोक्यावर मुकुट, अंगावर भरजरी वस्त्रे व अलंकार आहेत. देवीच्या पाठशिळेवर खालच्या बाजूस दोन सिंह आहेत. देवीच्या शिरोभागी दोन्ही बाजूस सोंड उंचावून घागरी धरलेले, दोन पायांवर उभे असलेले हत्ती आहेत. मूर्तीच्या मागे पानाफुलांची नक्षी असलेली सोनेरी प्रभावळ आहे. लक्ष्मी तसेच हत्ती ही आपल्याकडे संपत्ती व ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. भारतीय संस्कृती कोशातील उल्लेखानुसार, लक्ष्मीचा पृथ्वीशी आणि हत्तींचा मेघाशी संबंध सांगितलेला आहे. त्याप्रमाणेच मेघांद्वारे धरतीला केलेला जलाभिषेक या मूर्तीतून दाखविण्यात आलेला आहे. या मूर्तीच्या समोर पाच तरंगहस्त आहेत.

या मंदिराच्या गर्भगृहावर तीन थर असलेले शिखर आहे. खालच्या चौकोनी थरात नक्षीकाम व लहान शिखर आहेत. वरील दोन अष्टकोनी थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके व त्यात विविध देवतांची शिल्पे आहेत. त्यावर आमलक व त्यावर पाच थरांचा कळस आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराबाहेर असलेली एक मोठी आडवी शिळा. या शिळेबाबत अशी आख्यायिका आहे की मंदिर परिसरातील सर्व देवतांनी ती शिळा स्वतःसाठी निर्माण केली आहे. रात्रीच्या वेळी या सर्व देवता या आसनावर बसून विचारविनिमय करतात. मंदिर परिसरातील एका गुहेत शिवमंदिर आहे. याशिवाय अनभव देव, बाराचा चाळा, तसेच स्थानिक देवतांचे पाषाणही येथे आहेत.

मंदिरात दरवर्षी कार्तिक कृष्ण एकादशीस हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. या काळात मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते. अनेक गावांतील भजन मंडळी, तसेच कीर्तनकार व प्रवचनकार यावेळी येथे येतात. तसेच नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, होळी, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, डाळप स्वारी आदी उत्सवही या मंदिरात साजरे होतात. या उत्सवांच्या वेळी मुंबई, पुण्यासह गुजरात व कर्नाटकमधूनही भाविक देवीच्या दर्शनाला येतात.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून १७ किमी, तर खारेपाटणपासून ५० किमी अंतरावर
  • देवगड व तळेरे येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home