भटाई देवी मंदिर

भदाने, ता. जि. धुळे

कृषी प्रधान देशात जलस्त्रोतांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळेच नैसर्गिक जलस्रोत सुरक्षित आणि सुस्थितीत राहावेत म्हणून जलस्रोतांना देवस्थानांचे संरक्षण लाभले. जलस्रोतांचे महत्त्व जनसामान्यांना पटावे यासाठी ते महत्त्व अधोरेखित करणाऱ्या अख्यायिका, प्रथा, परंपरा देवीदेवता या देवस्थानांशी जोडल्या गेल्या. अशाच एका अख्यायिकेशी जोडलेले भटाई देवीचे प्राचीन प्रसिद्ध मंदिर धुळे तालुक्यातील भदाने गावात आहे. जागृत देवी नवसाला पावणारी आहे तिच्या कृपेने संततीहिन स्त्रियांना मातृत्वाचा लाभ होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराबाबत अख्यायिका अशी की नऊ पुत्रांची माता देवी भटाई भ्रमण करीत असताना या ठिकाणी आली तेव्हा तिला तहान लागली होती. तिने आपल्या भटू या ज्येष्ठ पुत्रास पाणी आणण्यास सांगितले. आईच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी भटू जवळच असलेल्या विहिरीवर गेला पात्र विहिरीत बुडवून पाणी घेऊन आला. मात्र त्याच्या पात्रात पाण्यासोबत एक मासा आला असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. देवीने पाणी पिण्यासाठी ते पात्र हातात घेतले तेव्हा तिची नजर माशावर पडली. आपल्या पुत्राच्या वेंधळेपणामुले आपल्याला जीवहत्येचा बट्टा लागला असता हे लक्षात येताच देवीचा संताप अनावर झाला तीने आपल्या पुत्रास आपल्या नजरेसमोरून दूर होण्याची आज्ञा केली

आईचा विरह सहन करण्यापेक्षा जीवन संपवलेले बरे असे वाटून भटुने पाणी आणलेल्या विहिरीत तो मासा परत सोडला तेथेच प्राण त्यागले. राग शांत झाल्यावर देवीला आपल्या पुत्राला शाप दिल्याचा पश्चाताप झाला जी स्त्री या विहिरीच्या पाण्याने अंघोळ करून माझ्या दर्शनास येईल, तीला संतती प्राप्ती होईल, असा वर तिने या विहिरीस दिला. आजही अनेक संततीहिन स्त्रिया या विहिरीत अंघोळ करून त्यानंतर देवीच्या दर्शनाला जातात. असे सांगितले जाते की येथे भटाई देवीच्या नवसाने संततीप्राप्ती होते त्या मुलांची नावे भटू किंवा भटी ठेवावी लागतात, हा येथील अलिखित नियम आहे

भदाने गावाकडून मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा दोन चौकोनी नक्षीदार स्तंभ त्यावर सज्जा असलेली स्वागत कमान आहे. सज्जावर मध्यभागी मेघडंबरीत गणपतीची मूर्ती वर नक्षीदार शिखर आहे. येथून काही अंतरावर आल्यावर मंदिराच्या पेव्हरबलॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. भटाई देवीचे हे मंदिर सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. सन १९८४ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार केल्यानंतर मंदिरास आजचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. आठ गोलाकार स्तंभांवर उभ्या असलेल्या मुखमंडपाचे छत मध्यभागी उताराचे दोन्ही बाजूस समतल आहे. मुखमंडपात यज्ञकुंड आहे. मुखमंडपातून सात पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या बाजूला काही प्राचीन शिल्पे पाषाण आहेत

खुल्या पद्धतीच्या सभामंडपात बाह्य बाजूस प्रत्येकी नऊ चौकोनी स्तंभ आहेत. सभामंडपात मध्यभागी काळ्या पाषाणातील कासवमूर्ती आहे. पुढे अंतराळ त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पानाफुलांच्या नक्षीकामाने सुशोभित तीन द्वारशाखा आहेत. बाह्य द्वारशाखेची ललाटपट्टी अर्धचंद्राकार आहे. गर्भगृहात वज्रपिठावर भटाई देवीची द्विभुज मूर्ती आहे. देवीच्या डाव्या हातात त्रिशूल उजवा हात अभय मुद्रेत आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट आहे. देवीच्या मूर्तीस ऊरोभागी दोन खळगे आहेत. या खळग्यांत मूर्तीच्या बाजूला ठेवलेले लाडूच्या आकाराचे दोन गोटे लावून मुल होण्याबाबत कौल घेतला जातो. उजव्या बाजूचा गोटा पडल्यास संततीप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मूर्तीसमोर पितळी पादुका मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. प्रभावळीत दोन्ही बाजूस खाली मयुर त्यावरील भागात पानाफुलांच्या नक्षी आहेत. वर मध्यभागी कमळ दोन्ही बाजूस गजराज आहेत. प्रभावळीच्या वर छत्र आहे. मंदिराच्या छतावर सहा थरांचे शिखर आहे. पायाकडील चौकोनी थराच्या चारही कोनांवर संतमूर्तीं बाजूने कमळ दल नक्षी आहेत. दुसऱ्या अष्टकोनी थरात प्रत्येक बाजूस उठाव शैलीतील महिरप त्यात दोन्ही बाजूस गजशिल्पे आहेत. तिसऱ्या, चौथ्या पाचव्या थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक देव कोष्टकावर कोष्टकाच्या दोन्ही बाजूस असलेल्या नक्षीदार स्तंभांवर उठाव शैलीतील शिखर आमलक आहेत. शिखरात सहाव्या थरात एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस ध्वज पताका आहेत

मंदिरापासून काही अंतरावर पाण्याची विहीर आहे. याच विहिरीत देवीपुत्र भटूने प्राण त्यागले होते, असे सांगितले जाते. दगडी कठडा असलेल्या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विहिरीत आतल्या भिंतीत देवकोष्टक त्यात देव प्रतिमा आहेत. विहिरीच्या काठावर दोन पाषाण मूर्तीं आहेत. ते देवीचे पुत्र भटू गोटू असल्याचे सांगितले जाते. संततीप्राप्तीची कामना असणाऱ्या स्त्रियांनी या विहिरीत अंघोळ करून ओलेत्या अंगाने देवीचे दर्शन घेतल्यास संततीप्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

देवीच्या मंदिरात चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्रौत्सव, शाकंभरी नवरात्र, दसरा दिवाळी आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व उत्सव कुलाचारांच्या वेळी देवीस प्रिय असलेला वरणबट्टी वांग्याच्या भाजीचा नैवद्य दाखविला जातो. भटाई देवीला कल्याणाची देवी मानली जाते. घरातील सुखशांती, आरोग्य आणि समृद्धी त्यासोबतच शेतीव्यवसायात यश मिळवण्यासाठी या देवीची भाविकांकडून उपासना केली जाते. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक या मंदिराच्या प्रांगणात विस्तवावर भाजलेले रोडगे, वरण, भाजी बट्टे असा प्रसादाचा नैवेद्य करतात. हा नैवेद्य प्रथम भटाईमातेला त्यानंतर भटूभटीला दिला जातो, अशी प्रथा आहे

उपयुक्त माहिती

  • धुळे शहरापासून ३० किमी, तर साक्री येथून २५ किमी अंतरावर
  • धुळे येथून एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : गोरंक श्रीराम, अध्यक्ष, मो. ९९२२१९२०५६
  • भैय्या गोयकर, सचिव, मो. ८६९८९१६११७
Back To Home