भानेश्वर मंदिर

मोहोळ शहर, ता. मोहोळ, जि. सोलापूर

प्राचीन काळी चंद्रमौळी या नावाने ओळखले जाणारे मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. याच गावात योगसाधनेला महत्त्व देणारा शिवपूजक असा ‘नागेश संप्रदाय’ स्थापन करणाऱ्या नागनाथांचे वास्तव्य होते. या परिसरात शंकराची अनेक प्रसिद्ध स्थाने आहेत. भानेश्वर मंदिर हे त्यातीलच एक. हे मंदिर यादवकालीन आहे व ते रामदेवराय यादवांचा प्रधान मंत्री हेमाद्री याने बांधले असावे, अशी नोंद ‘सोलापूर गॅझेटियर’मध्ये आहे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर परिसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मोहोळ या शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. हे शहर व परिसर इ.स. ९० ते इ.स. ३०० पर्यंत सातकर्णी राजवटीखाली होते. पुढच्या काळात चालुक्यांनी, तसेच यादवांनी येथे राज्य केले. इ.स. १३४७ मध्ये हा परिसर बहामनी सत्तेच्या अंमलाखाली आला. विजापूरच्या अदिलशाहीचा काळही या तालुक्याने पाहिला. तेराव्या शतकात झालेल्या युद्धांची मोठी झळ मोहोळला बसली होती. इ.स. १३९६ ते १४०८ अशी सलग १२ वर्षे पडलेल्या ‘दुर्गादेवीच्या दुष्काळा’त मोहोळ अक्षरशः ओस पडले होते. ते वसण्यास पुढचे पाव शतक लागले, अशी माहिती गॅझेटियरमध्ये देण्यात आली आहे. अशा संकटांत या शहरास धीर देण्याचे कार्य येथील संतांनी आणि धार्मिक स्थळांनी केले. भानेश्वर मंदिर हे त्यातीलच एक प्रमुख मंदिर होय.
मोहोळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले हे प्राचीन हेमाडपंती स्थापत्यरचनेचे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. जमिनीपासून सुमारे आठ ते दहा फूट उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येण्यासाठी अकरा पायऱ्या आहेत. पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठे चौथरे व त्यावर अनेक प्राचीन मूर्ती आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे विविध नक्षी व शिल्पांनी सुशोभित आहे. या प्रवेशद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी नऊ द्वारशाखा आहेत. यापैकी प्रत्येक बाजूला दोन स्तंभशाखा व तीन वेलबुट्टी शाखा आहेत. या द्वारशाखांच्या खालील बाजूला द्वारपालांची लहान लहान अनेक शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या डाव्या व उजव्या कडेला ज्या उभ्या पट्ट्या असतात त्यांना द्वारशाखा असे संबोधले जाते. मंदिर अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांच्या मते भारतीय मंदिरांमध्ये या द्वारशाखा एक ते नऊ असू शकतात. त्यांच्या संख्येनुसार त्यांची वेगवेगळी नावे आहेत. एकशाखी दाराला स्मरकीर्ती, दोन शाखांच्या दाराला सुप्रभा, तीन (सुभगा), चार (गांधारी), पाच (नंदिनी), सहा (मालिनी), सात (हस्तिनी), आठ (मुकुष्टली) आणि नऊ शाखांच्या दाराला पद्मिनी असे म्हणतात. यापैकी आठ शाखांचे दार सहसा नसते व नऊ शाखांचे दार हे दुर्मिळ समजले जाते. या प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस चक्रनक्षी व ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. ललाटबिंबाच्या वर उत्तरांगेवर नक्षीदार तोरण आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. बंदिस्त सभामंडपात चार मोठे दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांचे स्तंभपाद, स्तंभदंड व स्तंभशीर्ष हे विविध आकारांत आहेत. सभामंडपात चार स्तंभांच्या मध्यभागी भूमीपासून किंचीत उंच वर्तुळाकार रंगशिला आहे. नृत्यादी सेवेच्या कार्यक्रमासाठी या रंगशिलेचा मंच म्हणून पूर्वीपासून वापर केला जात असे. गर्भगृहाकडे तोंड करून ही सेवा अर्पण केली जात असताना सभोवती उभे किंवा बसलेले भक्त तिचा आस्वाद घेऊ शकतात, अशी तिची रचना आहे. रंगशिलेच्या पुढे अंतराळासमोर असलेल्या चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार व मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार यांच्या रचनेत साम्य आहे. या दोन्ही प्रवेशद्वारांवरील द्वारशाखांवर सुंदर रंगकाम केल्यामुळे त्यावरील शिल्पे व कलाकुसर सुंदर भासते. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी एक मोठ्या आकाराची प्राचीन शिवपिंडी आहे. या शिवपिंडीच्या पुढील भिंतीवरील देवकोष्टकात अखंड पाषाणात कोरलेली शंकर-पार्वतीची परिवार मूर्ती आहे. त्यात शंकर व पार्वती नंदीवर आसनस्थ आहेत व शेजारी गणपती आणि कार्तिक स्वामीही आहेत. याशिवाय मंदिरातील अनेक देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती व शिल्पे आहेत.
मंदिरात रोज नित्यनेमाने पूजा-आरती केली जाते. दर सोमवारी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी असते. शिवरात्र व महाशिवरात्रीला गावाबाहेरूनही भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. महादेवाच्या पिंडीवर व नंदीवर अभिषेक केले जातात. वर्षभर येथे कोणते ना कोणते उत्सव सुरू असतात. विशेषतः त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी केला जाणारा दीपोत्सव विशेष असतो. या दिवशी संपूर्ण मंदिरात दिव्यांची आरास केली जाते. हे मंदिर दररोज केवळ सकाळी सहा ते सात व सायंकाळी सहा ते सात या वेळेसाठीच भाविकांसाठी खुले असते.

उपयुक्त माहिती

  • माहोळ बस स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर
  • सोलापूर जिल्ह्यातील अनेक शहरांतून माहोळसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : पुजारी, मो. ८०८७९८२०१५
Back To Home