भंडारा डोंगर

देहू, ता. हवेली, जि. पुणे


इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले देहू हे गाव संत तुकाराम महाराजांमुळे प्रसिद्ध आहे. या देहूगावाजवळील भंडारा डोंगराचेही वेगळे वैशिष्ट्य आहे, कारण या डोंगरावर तुकाराम महाराजांना वयाच्या विसाव्या वर्षी पांडुरंगाचा पहिला साक्षात्कार घडला. असे सांगितले जाते की येथेच त्यांच्या बहुतांश अभंगांची निर्मिती झाली, त्यांची गाथाही येथेच आकाराला आली.

देहूपासून साधारण पाच किमी अंतरावर भंडारा डोंगर आहे. प्रपंच सोडून इथेच आध्यात्मिक साधनेत रमणाऱ्या आपल्या पतीसाठी, तुकाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे जिजाबाई शिदोरी घेऊन त्यांना शोधत येत असे. असे सांगतात की तुकारामांना शोधता शोधता जिजाबाईंच्या पायत बाभळीचा काटा रुतला. मस्तकापर्यंत वेदना गेली. त्यांना चालवेना. त्या आडरानात कुणी मदतीला येण्याची शक्यताही नव्हती. अशा वेळी एक बाळगुराखी त्यांच्या मदतीला आला. त्याने अगदी सहजपणे त्यांच्या पायात रुतलेला काटा काढून दिला. प्रत्यक्ष पांडुरंगानेच गुराख्याच्या रुपात येऊन तिच्या पायातील काटा काढला, अशी मान्यता आहे. हा प्रसंग मांडणारे मंदिरही डोंगरावर उभारण्यात आले आहे. तुकाराम महाराजांचे मंदिरही आहेच.

संत तुकाराम जेव्हा इथे येत तेव्हा येण्याची वाट इतकी सुकर नव्हती. भल्या पहाटे उठून तुकाराम महाराज आपली आध्यात्मिक साधना, भजन, लिखाण, चिंतन करण्यासाठी येथे जात असत. त्या वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात लागलेल्या अविकल्प समाधीने तुकाराम महाराजांची थेट विठ्ठलाशी भेट झाली अशी श्रद्धा आहे.

देहूगावातील संत तुकाराम महाराज व आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला येणारे अनेक भाविक या भंडारा डोंगरावरही दर्शनाला येतात. भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पायथ्यापासून मंदिरापर्यंत उत्तम रस्ता आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी गाथा पारायणासाठी येतात. भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे होत असतात. येथे येणाऱ्या सर्व भाविकांना तसेच वारकऱ्यांना सप्ताह काळात भंडारा म्हणजेच महाप्रसाद दिला जातो.

या ठिकाणाबाबत आख्यायिका अशी, छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले होते. त्यांच्यासोबत शेकडो मावळे होते. एवढ्या मावळ्यांना प्रसाद म्हणून तुकाराम महाराजांनी पत्नी जिजांनी सोबत दिलेल्या शिदोरीतले दोन दोन घास दिले. छत्रपतींसह शेकडो मावळे तो पोटभर प्रसाद घेऊन तृप्त झाले, पण तरीही तुकाराम महाराजांच्या शिदोरीचे भंडार संपले नव्हते. त्यावेळी मावळ्यांसाठी तुकाराम महाराजांनी जणू काही अन्नभांडारच उघडून दिले होते. त्याच कथेचा आधार घेऊन असे सांगितले जाते की या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही. म्हणून या डोंगराला ‘भंडारा’ असे नाव दिले असल्याचे सांगतात. शिवाय, येथेच तुकाराम महाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार उघडून देऊन या डोंगराचे नाव वेगळ्या अर्थाने सार्थ केले.

भंडारा डोंगरावर जाणारा घाट रस्ता नागमोडी वळणे घेत जेव्हा माथ्यावर पोहोचतो तेव्हा तिथून दिसणारा निसर्ग, अनुभवता येणारा गारवा आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे आपण वेगळ्याच विश्वात पोहोचतो. येथे तुकाराम महाराजांचे एक मंदिर असून, काही वारकरी मंडळी त्याची देखभाल करतात. मंदिरात तुकाराम महाराज, विठ्ठल-रखुमाई, गणपती, शिवलिंग अशा मूर्ती आहेत. डोंगरावरील प्रसन्न वातावरण आपल्या मनाला नवी ऊर्जा देऊन जाते.

भंडारा डोंगराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात झाला असल्याने या ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. भंडारा डोंगर येथे तुकोबांचे भव्य असे मंदिर आकार घेत आहे. यामध्ये तुकोबांच्या जीवनातील दहा प्रसंगांचे वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे.

उपयुक्त माहिती:

  • देहू येथील तुकाराम मंदिरापासून ५ किमी अंतरावर
  • अनेक वारकरी देहू ते भंडारा डोंगर असा पायी प्रवास करता
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • भक्तनिवास व प्रसादाची सुविधा
Back To Home