भामचंद्र डोंगर / महादेव मंदिर

ता. चाकण, जि. पुणे


पंधरा दिसामाजी साक्षात्कार झाला।
विठोबा भेटला निराकार।।
भामगिरी पाठारी वस्ति जाण केली।
वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।

पंधरा दिवसांच्या अखंड समाधीनंतर तुकाराम महाराजांच्या मुखातून हा अभंग आला ते ठिकाण होते भामगिरी म्हणजेच भामचंद्र डोंगर. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा डोंगर वारकरी संप्रदायासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासूनच तीर्थक्षेत्र म्हणून तो ओळखला जात होता. अर्थात, त्याचा पुरावा म्हणजे येथील दगडात कोरलेल्या गुहा आणि मंदिरे. त्यापैकीच एक भामचंद्र भगवान अर्थात भामचंद्र महादेव मंदिर.

भामचंद्र डोंगर सह्याद्रीच्या मुख्य रांगांपासून स्वतंत्र उभा आहे. पूर्व-पश्चिम पसरलेल्या या डोंगराच्या खालचा भाग वृक्षवल्लीने नटलेला आणि वरच्या भागात कातळाचा उभा कडा आहे. डोंगराच्या पायथ्यापासून भीमा नदी वाहते. त्यामुळेच या डोंगराला भामचंद्र असे नाव पडले आहे. या डोंगराच्या पश्चिमेला असलेल्या नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे त्याला ‘नवलाख्या डोंगर’, असेही म्हटले जाते. पुण्यापासून ४० किलोमीटर आणि पिंपरी-चिंचवडपासून २० किलोमीटरवर असलेल्या शिंदे-वासुली गावातून भामचंद्र महादेव मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. डोंगराच्या पायथ्यापासून जंगलातील अवघड पायवाटेने मंदिराकडे जाताना वरून देहू गावाचे विहंगम दर्शन होते.

पायथ्यापासून चालत अर्ध्या तासाच्या अंतरावर डोंगरावर एक सपाटी आहे. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. या चौथऱ्याबाबतची अख्यायिका अशी की तुकाराम महाराजांचे शिष्य वासकर महाराज या चौथऱ्यावर बसून कीर्तन करत असत. कीर्तनात ते एवढे दंग होऊन जात की त्यांना कशाचीच भ्रांत नसे. असेच एकदा कीर्तन सुरू असताना जोराचा पाऊस सुरू झाला. असे म्हणतात की त्यांच्या किर्तनात व्यत्यय नको म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांच्यावर छत्र धरले होते. या चौथऱ्यापासून १० मिनिटे पुढे गेल्यानंतर कड्यालगत उंचीवर कातळात खोदलेले पाण्याचे टाक आहेत. येथील पाणी चवीला मधुर व अत्यंत गार असते. त्यापुढे काही अंतरावर भामचंद्र महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.

मंदिरासमोर पिंपळाचे एक मोठे झाड असून त्याचीही भक्तिभावाने पूजा केली जाते. मंदिराचे प्रवेशद्वार उभ्या कड्यातच आहे. कातळात कोरलेल्या या मंदिराची सभामंडप व गाभारा, अशी‌ रचना आहे. सभामंडपात चार खांब असून त्यावर कोरीव नक्षीकाम आहे. दगडी छतावरही नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात नंदी आसनस्थ आहे. येथे इतरही देवी-देवतांच्या पाषाणातील मूर्ती आहेत. गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे आणि त्याच्या मागे पार्वतीची मूर्ती आहे. येथे दरवर्षी भामचंद्र ‌महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मंदिराच्या बाजूलाच भागीरथी कुंड असून, त्यातील पाणी शंकराला अभिषेक करण्यासाठी वापरले जाते.

मंदिराच्या बांधकामाचे ठोस संदर्भ उपलब्ध नाहीत. काहींच्या मते ही वास्तू पांडवकालीन आहे; तर काही जण या लेणी सातवाहन काळातील असल्याचे सांगतात. या महादेव मंदिरासह संपूर्ण भामचंद्र डोंगराला राज्य सरकारने २०११ मध्ये संरक्षित वारशाचा दर्जा दिला आहे.

मंदिराजवळच तुकाराम महाराजांची ध्यान करण्याची जागा आहे. साधारणतः दहा बाय सहा फूट आकाराच्या या गुहेत तुकारामांनी १५ दिवस अखंड ध्यान केले होते, असे सांगितले जाते. गुहेतील भिंतीवर तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. मूर्तीच्या आजूबाजूला साप व विंचू यांची आकृत्या कोरलेल्या आहेत.
याबाबत आख्यायिका अशी की, १५ दिवस झाले तरी तुकाराम महाराज घरी न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा परिसरात त्यांचा शोध घेत होते. मार्गात जो जो भेटेल त्याला ते तुकारामांबद्दल विचारत होते. एका वाटसरूकडून तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर असल्याचे कान्होबांना समजले. तेथे पोचल्यावर तहानभूक हरपून तुकोबा ध्यान लावून बसल्याचे त्यांनी पाहिले. सतत एका जागेवर बसल्याने त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ बनवायला सुरुवात केली होती. त्यांच्या आजूबाजूला सर्प, विंचू फिरत होते; परंतु तुकोबांना या कशाचीच तमा नव्हती. पंधराव्या दिवशी तुकोबांना साक्षात्कार होऊन देवाने त्यांना दर्शन दिले. ज्या ठिकाणी देव व तुकाराम यांची भेट झाली, त्या ठिकाणी कान्होबांनी एकावर एक दगड रचले. त्यानंतर त्यांची मूर्ती तयार केली. मूर्तीच्या मागे विंचू, साप व वाघ यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. सध्या गुहेत जी मूर्ती दिसते, ती हीच मूर्ती आहे.

हे स्थान वन परिक्षेत्रात येत असल्याने या तीर्थक्षेत्राच्या जीर्णोद्धार प्रक्रियेला मर्यादा येतात. मात्र, सप्ताह समिती आणि देणगीदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता भक्तांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. काही वर्षांपासून साधनाभ्यास आणि चिंतनासाठी वारकरी या डोंगरावर येत असल्याने पुणे जिल्हा परिषदेनेही डोंगरावर पायाभूत सुविधा, वीज आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी व तुकाराम बिजेच्या दिवशी येथे यात्रा भरते.


उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून ४० किमी; तर देहूपासून १२ किमी
  • देहू-आळंदीपासून अनेक वारकरी पायी दर्शनाला येतात
  • भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहने जाऊ शकतात
  • पायथ्यापासून साधारणतः ४५ मिनिटे पायी अंतर
  • पाण्याची व्यवस्था आहे, मात्र निवास व
  • न्याहारीची सुविधा नाही
Back To Home