कणकवली अर्थात कनकवल्लीचे नाव धार्मिक विश्वात गौरवाने घेतले जाते ते येथील परमहंस भालचंद्र महाराज यांच्यामुळे. अखंड मौनधारी व दिगंबरावस्थेतील या सत्पुरुषाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कणकवलीमध्ये त्यांचे समाधीस्थान आहे. या स्थानाभोवती विविध देवतांची मंदिरे आहेत. हा संपूर्ण परिसर भालचंद्र महाराजांचे तपश्चर्यास्थान म्हणून प्रसिद्ध होता. आज भालचंद्र महाराजांचा मठ म्हणून तो ख्यातकीर्त आहे. असे सांगितले जाते की भालचंद्र महाराज हे साक्षात्कारी योगीपुरुष होते. अनेकांना त्यांच्या चमत्कारांची प्रचिती आल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते.
भालचंद्र महाराज यांचा चरित्र इतिहास असा आहे की त्यांचा जन्म ८ जानेवारी १९०४ रोजी म्हापण येथे झाला. परशुराम व आनंदीबाई ठाकूर असे त्यांच्या माता–पित्याचे नाव होते. लहानपणीच त्यांच्या माता–पित्याचे निधन झाले. त्यानंतर मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना अपयश आले. या आपत्तींमुळे महाराजांना वैराग्य आले. याच अवस्थेत एके दिवशी कोल्हापूर येथे गेले असता, त्यांना गारगोटीतील एक साक्षात्कारी पुरुष भेटले. त्यांनी महाराजांना सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील संत साटम महाराजांकडे जाण्यास सांगितले. तेथून ते वयाच्या २२ व्या वर्षी, १९२६ मध्ये कणकवलीला आले. प्रारंभी ते जुन्या मोटारस्टँडवर वा काशीविश्वेश्वराच्या मंदिरापाशी बसत. त्यांना देहभान नसे. दिगंबरावस्थेतच ते असत. लोकांना त्यांची ओळख नसल्याने ते त्यांना हाकलून देत; परंतु ते जात नसत. कोणी खायला दिले तर खात, कोणी विडी–सिगारेट दिली तर फुंकून टाकत. हालअपेष्टा सोसत ते तेथे राहात होते. त्यांची ही अवस्था समजताच साटम महाराज स्वतः कणकवलीला आले व त्यांनी भालचंद्र महाराजांची महती आणि आध्यात्मिक उंची समाजाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर लोकांना महाराजांच्या सामर्थ्याची प्रचिती येत गेली आणि त्यांच्याभोवती भक्त–भाविक जमा होऊ लागले. महाराजांच्या समाधीच्या दर्शनाने संकटे दूर होतात व सुखशांती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
येथील भाविकांकडून महाराजांच्या सामर्थ्याबद्दलची एक कहाणी अशी सांगण्यात येते की एकदा कणकवलीमध्ये एक सर्कस आली होती. ती फारशी चालत नव्हती. त्यावेळी त्या सर्कशीच्या मालकाला महाराजांबद्दल माहिती मिळाली. त्याने भक्तिभावाने एकदा महाराजांना नेऊन सर्कशीत बसविले. त्या दिवशी सर्कशीला अचानक अनेक लोक आले व त्याला खूप फायदा झाला. तेव्हापासून तो त्यांचा भक्त बनला. त्या सर्कशीतील धर्मराज नावाची एक व्यक्ती महाराजांची शिष्य बनली. त्यांनी महाराजांच्या नावाचे देऊळ व आश्रम बांधला. धर्मराज महाराजांप्रमाणेच फलाहारी महाराज, राज अहमद हुसेनशहा पटेलबाबा असे काही महाराजांचे निकटचे शिष्य होते. मुंबईत लालबाग येथील हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहासाठी महाराजांना पाचारण करण्यात आले होते. तेथे हरिनामाचा घोष सुरू असताना १६ डिसेंबर १९७७ रोजी महाराजांचे निर्वाण झाले. १८ डिसेंबर १९७७ रोजी त्यांच्या पार्थिवास सध्याच्या मठातील मध्य गर्भगृहात वेदमंत्रांच्या घोषात समाधी देण्यात आली.
भालचंद्र महाराज कणकवलीत आल्यानंतर त्यांनी जेथे तपश्चर्या केली होती, तेथेच त्यांच्या मठाची उभारणी करण्यात आली. स्थानिक भाविक सांगतात की या ठिकाणी पूर्वी अगदी छोट्या घुमटीसारखी जागा होती व आजूबाजूला अळूचे शेत होते. आता तेथे संगमरवरी फरशा लावलेला भालचंद्र महाराजांचा मठ आहे. हा मठ रस्त्यालगतच आहे. मठासमोरील रस्त्यावर दर्शनार्थींना सावली मिळावी यासाठी लांबलचक अशी पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. या शेडखाली अनेक पूजासाहित्याची दुकाने आहेत. मठाच्या आवारास मोठे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास चौकोनी नक्षीदार स्तंभ आहेत व त्याच्या छतावर मध्यभागी देवकोष्ठक आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस छोट्या मंदिरांच्या प्रतिकृती आहेत. मंदिराच्या प्रशस्त आवारास गजपृष्ठाकाराचे पत्र्याचे छत बसवण्यात आले आहे.
या आवाराच्या मध्यभागी तीन पायऱ्या असलेल्या एका उंच चबुतऱ्यावर दोन दीपस्तंभ आहेत. त्यांच्या मधोमध दोन वृंदावने आहेत. त्यापुढे काही अंतर सोडून परमहंस भालचंद्र महाराज यांचे समाधीस्थान आहे. या मठास मोठा समतल छत असलेला व अर्धखुल्या प्रकारचा सभामंडप आहे. या सभामंडपाच्या बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपाच्या उजव्या बाजूस एका मोठ्या लाकडी देव्हाऱ्यामध्ये भालचंद्र महाराजांची मूर्ती आहे. या देव्हाऱ्यावर बारीक नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहात एक उंच व प्रशस्त असे वज्रपीठ आहे. त्यावर चारी बाजूंना असलेले छोटेखानी चौरसाकार खांब एकमेकांस अर्धवर्तुळाकार कमानीने जोडलेले आहेत. त्यावर सुशोभित घुमट आहे. या छोट्या देवळात मधोमध चांदीचा अष्टकोनी चौथरा आहे व त्यावर त्यासारखाच लहान चौथरा आहे. तेथेच महाराजांच्या पादुकाही आहेत. त्यामागे गजासनावर बसलेली, मस्तकावर मंदिल व अंगावर शाल ल्यालेली, महाराजांची तेजस्वी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे. आसनाच्या दोन्ही बाजूंना गज आहेत व मागे असलेल्या प्रभावळीच्या मधोमध फणा उभारलेली नागप्रतिमा आहे. महाराजांच्या मूर्तीच्या वरच्या बाजूला चांदीचे छत्र आहे.
या मठाच्या शेजारी महाराजांचे तपश्चर्या स्थान आहे. या स्थानावर त्यांची एक मूर्ती आहे. येथेच एका बाजूला लाकडी सोफा आहे व त्यावर महाराजांच्या तसबिरी ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला एक छोटासा पलंग आहे. तेथे महाराजांच्या मोठ्या तसबिरी आहेत. या तपश्चर्यास्थानास खेटून प. पू. पुंडलिक साबाजी कामत महाराज यांचे समाधीस्थान आहे. या मंदिराच्या दर्शनीभिंतीच्या मधोमध महाराजांची धूम्रपान करतानाची मोठी तसबीर लावण्यात आलेली आहे. मठाच्या प्रवेशद्वाराजवळ मंदिराच्या बाहेर एक रक्षापात्र ठेवण्यात आले आहे. भालचंद्र महाराज धूम्रपान करीत असत. त्याच्या स्मृती म्हणून भाविकांकडून येथे उदबत्त्यांसोबतच पेटत्या सिगारेट खोचून ठेवल्या जातात. त्या खोचण्यासाठी रक्षापात्राच्या चारी बाजूंस छोट्या नळकांड्या बसवण्यात आल्या आहेत.
भालचंद्र महाराजांच्या प्रवासासाठी त्यांच्या भक्तांनी घेतलेली एक खास अँबेसिडर गाडी या मठाच्या आवारात जतन करून ठेवण्यात आलेली आहे. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या छताचा पत्रा काढून त्या ठिकाणी महाराजांना बसण्यासाठी खास प्रकारचे आसन तयार करून घेण्यात आले होते. ही गाडी आजही सुस्थितीत दिसते. महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले काही भक्त सांगतात की महाराजांना गाडीतून प्रवास करणे आवडत असे.
या मठाच्या समोर काशीविश्वेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या दुमजली मंदिराच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर करण्यात आला आहे. या मंदिरात एक आयताकृती लांबच लांब सभामंडप व सभामंडपात पुढच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. या सभामंडपात अनेक लाकडी स्तंभ आहेत व त्यावर दुसऱ्या मजल्यावरील सज्जाचा भार आहे. येथील गर्भगृहासमोर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आहेत. गर्भगृहात मध्यभागी अखंड काळ्या पाषाणाचे शिवलिंग व त्याच्या मागे विठ्ठल–रुख्मिणीच्या मूर्ती आहेत.
या मंदिराच्या शेजारी श्रीदत्त व हनुमान यांचीही मंदिरे आहेत. वार्षिक उत्सवांमध्ये आषाढ पौर्णिमेला येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठा असतो. याशिवाय अश्विन वद्य द्वादशीला गुरुद्वादशी उत्सव, मार्गशीर्ष शुक्ल तृतीया ते सप्तमी या काळात भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, पौष वद्य द्वितीया ते षष्ठी या काळात महाराजांचा जन्मोत्सव सोहळा तसेच महाशिवरात्रीला येथे मोठे उत्सव साजरे केले जातात. दररोज दुपारी १.३० ते २.३० या वेळेत अन्नदान केले जाते. याशिवाय भाविकांना निवासासाठी मंदिर संस्थानातर्फे दोन सुसज्ज भक्त निवास बांधण्यात आलेले आहेत.