रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील भैरवनाथ मंदिरात भैरी, भवानी व जोगेश्वरी या तीनही देवता एकाच ठिकाणी स्थित आहेत. परिसरातील ८४ गावांचे दैवत असलेल्या या जागृत देवस्थानावर ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे. शेकडो वर्षांपासून येथे होणारी भैरीदेवाच्या लाटेची जत्रा हे येथील वैशिष्ट्य आहे. यावेळी सुमारे ४० फूट लांबीची देवाची लाट बगाडावर फिरवली जाते. या लाटेसाठी तेवढेच मोठे व उंच बगाड मंदिरासमोर आहे. ते राज्यातील उंच बगाडांपैकी एक म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ही आगळीवेगळी जत्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये अनेक लहान-मोठ्या नद्या उगम पावतात. काळ आणि घोड या त्यापैकीच दोन पश्चिम वाहिनी नद्या. या नद्यांच्या संगमावर माणगाव तालुक्यातील ऐतिहासिक गोरेगाव हे लहानसे शहर स्थित आहे. संगमानंतर घोड नदी (किंवा गोडी नदी) पुढे सावित्रीला जाऊन मिळते. त्याआधी तिच्यावर गोरेगाव नावाचेच धरण आहे.
या गावाच्या नावाबाबत अख्यायिका अशी की शिवाजी महाराजांच्या काळात घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरण्यासाठी कुंभेघाट आणि देवघाट हे दोन मार्ग प्रचलित होते. या मार्गांवर असलेले घोडेगाव हे मोठे व्यापारी केंद्र म्हणून त्या काळी उदयास आले. तेथे घोड्यांचा मोठा व्यापार होत असल्याने गावाचे नाव घोडेगाव पडले. नंतर या नावाचा अपभ्रंश होऊन गोरेगाव हे आजचे नाव प्रचलित झाले. गावाच्या पश्चिमेकडे टेकडीवर घोडेघूम नावाचे एक यापेक्षाही प्राचीन खेडेगाव आहे. घूम हा गुमचा अपभ्रंश आणि गुम म्हणजे गाव. पूर्वीच्या काळी मुळचे घोडेगाव (किंवा गोरेगाव) हे घोडेघूम असावे. मात्र व्यापार वाढीस लागल्यानंतर व्यापारी, प्रवासी, उतारू यांना सोयीचे व्हावे, यासाठी नवे गाव टेकडीखाली वसले असावे. इ.स. १५० साली टोलेमीच्या वर्णनांमध्ये आढळणारे ‘हिप्पोकुरा’ हे गोरेगावच असावे, असे सांगितले जाते. शिवकालीन इतिहासात गोरेगाव हे जंजिरा संस्थानच्या हद्दीत होते. जंजिरा संस्थानमधील जे १२ महाल त्याकाळी प्रसिद्ध होते, यातील एक महाल गोरेगावातही आहे. अगदी अलिकडे, १९३१ साली प्रसिद्ध झालेल्या ‘कुलाबा भूवर्णन’ या ग्रंथामध्ये गोरेगाव मोठे व्यापारी केंद्र असल्याचा उल्लेख आहे. तर १९५४ साली प्रसिद्ध झालेल्या ‘कुलाबा वर्णन’ या ग्रंथामध्ये त्या काळात गोरेगावमध्ये पाच ते सहा भातगिरण्या असल्याचा संदर्भ आहे. येथील हातमागावर विणलेली ‘सालवटी’ लुगडी महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. त्याचप्रमाणे घोंगड्या, तांब्या-पितळेची भांडी घडविणारे कारखानेही गोरेगावात असल्याचा उल्लेख ‘कुलाबा वर्णन’मध्ये आढळतो.
मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरेपासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोरेगावमध्ये भैरवनाथाचे हे प्रसिद्ध मंदिर आहे. गोरेगावची ग्रामदेवता म्हणूनही या देवस्थानाला मान्यता आहे. मंदिर भरवस्तीत असल्यामुळे त्याभोवती फारशी मोठी जागा नाही. आजुबाजुला बैठी आणि माडीची कौलारू घरे आहेत. मंदिरासमोर असलेल्या चौकामध्ये ‘बगाड’ आहे. पूर्वीच्या काळी हे बगाड लाकडी होते. कालांतराने बगाडाची लाकडे खराब झाल्यानंतर मध्यभागी नवा मुख्य लाकडी खांब उभारून त्याभोवती सिमेंटचे बगाड उभारण्यात आले. राज्यातील काही उंच बगाडांपैकी हे एक मानले जाते. यात्रेवेळी याच बगाडावर ‘काळभैरवाची लाट’ फिरविली जाते.
मजबुत लाकडी खांब आणि मातीची कौले असलेले हे मंदिर आपले प्राचीन वैभव टिकवून आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची संरचना आहे. जमिनीपासून तीन पायऱ्या चढून मंदिराच्या अर्धखुल्या सभामंडपात प्रवेश होतो.
सभामंडपात जमिनीजवळ असलेल्या दगडी स्तंभपादावर लाकडी स्तंभ उभे आहेत. या सभामंडपात डावी व उजवीकडे भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजुला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात मध्यम आकाराच्या वज्रपिठावर डावीकडून शिवपिंडी, नंदी, गणपतीची मूर्ती, मध्यभागी भैरवनाथ महाराज, भवानी माता आणि जोगेश्वरी माता यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. या मूर्तींच्या मागील बाजूस सूर्यदेवाची मोठी प्रतिमा आहे. मूर्तींच्या डावीकडे शितलामाता व चांदोरकरीण माता यांच्या लहान मूर्ती आहेत. त्यापुढे काळकाई माता व सोमजाई माता यांच्या मूर्ती आहेत.
या मंदिराचे सर्वांत मोठे आकर्षण आहे ती चैत्रातील यात्रा. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीस होणाऱ्या भैरवनाथाच्या या यात्रेसाठीच्या तयारीला रामनवमीपासूनच सुरुवात होते. गोरेगाव व परिसरातील ८४ गावांतील ग्रामस्थ एकत्रित येऊन या यात्रेच्या तयारीला लागतात. गोरेगावच्या पूर्वेकडील जंगलातून ग्रामस्थ देवाच्या लाटेचा (ऐन वृक्षाचे खोड) शोध घेतात. त्यासाठी पसंत आलेल्या वृक्षाची पूजा करून मग त्याची तोड केली जाते. त्यासाठी सर्व ग्रामस्थ एक दिवस आधीच जंगलात वस्ती करतात. दुसऱ्या दिवशी पूजाविधी करून लाटेला नैवद्य दाखवून रानातच महाप्रसाद केला जातो. त्यानंतर सुमारे ४० फूट लांब असलेली देवाची लाट खांद्यावर घेऊन ग्रामस्थ पायी चालत गावात येतात. यात्रेच्या दिवशी पहाटे भैरीदेवाला सोन्याचा मुखवटा चढविला जातो आणि भवानी, जोगेश्वरीची ओटी भरली जाते. जत्रा सुरू झाल्यानंतर परिसरातील ८४ गावांमधून मानाच्या ‘काठ्या’ वाजतगाजत मंदिराकडे येतात. सायंकाळच्या सुमारास निघणाऱ्या पालखीत देवाचा सोन्याचा मुखवटा व भैरीदेवाचे भाऊ गोंदीरबुवा यांची प्रतिमा असते.
येथून जवळच असणाऱ्या टेकडीवर पिरबाबा दर्गा आहे, तेथे पालखी घेऊन पिरास हाक मारली जाते. या उत्सवाला हजर राहण्याचे आवाहन करून पालखी पुढे जाते. त्यानंतर पालखी मंदिराजवळ आल्यावर बगाडावर लाट चढवायला सुरुवात होते. परंपरेप्रमाणे पूजाविधी झाल्यानंतर येथील मानकऱ्यांकडून मंदिरासमोर असलेल्या उंच बगाडावर लाट फिरविली जाते. चल भैरी, चल रे चल, हर हर महादेव अशा घोषणा, ढोल-ताशे व घंटांचा निनाद सुरू असतो. तीन किंवा पाचवेळा ही लाट फिरविली जाते. मानाच्या पालख्या व अनेक उंच काठ्या यामध्ये नाचविल्या जातात. येथील पिरबाबा दर्ग्यातील पिराचाही यावेळी विशेष मान असतो. विशेषतः जिल्ह्यातील मराठा, कोळी, आगरी, गवळी, कुणबी, भंडारी, खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार या समाजांमध्ये भैरीदेवाला (भैरवाला) विशेष स्थान आहे. यात्रेमध्ये गाऱ्हाणे घातले की भैरवनाथ आपल्या मनोकामना पूर्ण करतो, अशी भाविकांची धारणा आहे. दररोज सकाळी सहा ते दुपारी दीड व सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत या मंदिरात भाविक दर्शनासाठी येऊ शकतात.